Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

वेळीच रोखा लिंबूवर्गीय फळावरील कोळी किडीचा प्रादुर्भाव

सद्यपरिस्थितीत मराठवाडयातील काही भागात संत्रा, मोसंबी आदी लिंबूवर्गीय फळपिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. ही कोळी ही अष्टपाद वर्गातील महत्त्वाची अकिटकिय कीड असुन या किडीमुळे फळांचे नुकसान होऊन बरेचदा विकृत फळे तयार होतात. कोळीचा प्रादुर्भाव वर्षभर असला तरी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान जास्त असतो. विक्री योग्य फळाचे उत्पादनाच्या दृष्टीने या किडीच्या नियंत्रणास विशेष महत्त्व आहे. या किडीची ओळख करून योग्य व्यवस्थापन केल्यास भविष्यात होणारे आपले नुकसान टाळता येते.

किडीची ओळख :  ही कीड आकाराने अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे साध्या डोळ्याने दिसणे कठीण जाते. पानांच्या शिरा जवळ किंवा बरेचदा फळांच्या सालीवर बारीक खळग्यात या कीडीद्वारे अंडी घातली जातात. प्रौढ लांबट, पिवळे असून पिल्ले फिक्कट पिवळसर असतात. पिल्ले व प्रौढ कोळी आकाराचा फरक सोडल्यास सारखेच दिसतात. नीट बघितल्यास ती पानांवर व फळांवर जलद गतीने फिरताना दिसतात.

प्रादुर्भावाची लक्षणे : कोळी पाने व फळे यांचा पृष्ठभाग खरचटून वर येणारा रसशोषण करतात. त्यामुळे पानावर मोठ्या प्रमाणात पांढुरके चट्टे पडतात जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्टयाचा भाग वाळतो. कोळीचे फळावरील नुकसान तीव्र स्वरूपाचे असते. खरचटलेल्या जागी पेशींची वाढ खुंटते तपकिरी लालसर किंवा जांभळट रंगाचे चट्टे पडतात यालाच लाल्या किंवा मंगू असेही म्हणतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास अनियमित आकाराची फळे तयार होतात. आतील फोडींची वाढ बरोबर होत नाही, फळांची प्रत खालावते. फळे लहान असताना प्रादुर्भाव झाल्यास विकृत फळांचे प्रमाण जास्त असते.

किडीचे व्यवस्थापन : कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणी व नंतर उद्भवणाऱ्या लाल्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डायकोफॉल १८.५ ईसी २ मिली किंवा प्रोपरगाईट २० ईसी १ मिली किंवा इथिऑन २० ईसी २ मिली किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने देण्‍यात आली आहे. अधिक माहितीसाठी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९००० यावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

(संदर्भ: केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था,नागपूर)

Exit mobile version