वनामकृवितील किटकशास्त्रज्ञांचा व्यवस्थापनाबाबत सल्ला
मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रादूर्भाव काही ठिकाणी ऊस, मका, ज्वारी, कापूस इत्यादि पिकांवर झाल्याचे कृषि विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणे मार्फत आढळून आले होते. या किडीचा प्रादुर्भाव असाच वाढत राहीला तर ऊस मका व चारा पिकांवर या कीडीचा उद्रेक होउ शकतो. त्यामुळे या कीडीला वेळीच रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या कीडीबाबत शेतकरी बांधवांना याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
नाकतोडा किडी बाबत माहिती
नाकतोडे ही अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड असुन या कीडीचे प्रौढ व पिल्ले पानांच्या कडा कापून खातात व शेवटी फक्त पानाची शिराच शिल्लक ठेवतात. प्रादुर्भावग्रस्त नाकतोडयांची हेरोग्लॉफोगस बॅनियान (Hieroglyphus banyan) ही प्रजाती असल्याचे आढळून असुन नाकतोडयाच्या जीवनात तीन अवस्था असतात. अंडी, पिल्ले किंवा बाल्यावस्था आणि पूर्ण वाढ झालेली प्रोढावस्था. अंडी अवस्था ही जमिनीत असते. या कीडीची मादी साधारणत: १० ते ३०० अंडयांच्या पुंजक्याने ओलसर रेताड किंवा पडीक जमिनीत अंडी घालते.
जमिनीतील ओलावा व हवेतील उष्णतामान यावर अंडयाच्या अवस्थेचा काळ अवलंबून असतो. अंडयातून बाहेर पडलेल्या लहान पिल्लांना पंख फुटलेले नसतात. कीडीची ही अवस्था (बाल्यावस्था) ५ ते १० दिवस असते. तर पुर्ण वाढलेली प्रौढ अवस्था १ ते २ महिन्याची असते.
वरीलपैकी कोणत्याही स्थितीत किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्यावर जाईल, त्यावेळी लगेचच व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात.
व्यवस्थापनाच्या उपाययोजना
अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिलांना अटकाव करुन नियंत्रण करता येते. अंडी शोधुन सामुहीकरित्या नष्ट करावीत. सुरुवातीच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्याने नीमतेल २.५ लिटर प्रति हेक्टरी या प्रमाणे फवारणी केल्यास प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. मेटा-हायझीयम ॲक्रीडीयम व मायक्रोस्पोरीयम, पॅरानोसेमा लोकस्टी (पुर्वीचे नाव नोसेमा लोकस्टी) या जैविक किटकनाशकांचा वापर अनेक देशांत केला जातो.
या कीडीसाठी रासायनिक कीटकनाशकांची शिफारस केंद्रिय कीटकनाशक मंडळाकडून कुठल्याही कीटकनाशकाची शिफारस नाही, परंतू केंद्रिय किटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने टोळकीडींसाठी खालील काही कीटकनाशकांची शिफारस केली आहे, तीच कीटकनाशके नाकतोडयांसाठी सुध्दा प्रभावी ठरु शकतात.
यात मिथील पॅराथीआन २ टक्के भुकटी २५ ते ३० किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. किंवा क्लोरोपायरीफॉस २० ईसी २.४ मिली, क्लोरोपायरीफॉस ५० ईसी १ मिली, डेल्टामेथ्रीन २.८ ईसी १ मिली, डायफ्लूबेंझुरॉन २५ ईसी २५ डब्लुपी, लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी १ मिली, लॅमडा सायहॅलोथ्रीन १० डब्ल्यूपी, फिप्रोनिल ५ एससी ०.२५ मिली, मॅलाथिऑन ५० ईसी ३.७ मिली, मॅलाथिऑन २५ डब्लुपी ७.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
चारापिकांवर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी.
तरी नाकतोडयाचा मराठवाडयातील संभाव्य धोका लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून शेतक-यांनी या किडी बाबत जागरुक राहावे व प्रादुर्भाव दिसून येताच सजगपणे किडींचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.