Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कपाशीतील बोंड सड : कारणे व उपाय योजना

कपाशीमध्ये मागील एक – दोन वर्षांपासून बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत हिरव्या बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या दिसून येत आहे. त्याची कारणे व त्यावर करावयाच्या उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत.

बोंड सडण्याचे प्रकार व कारणे:

बोंड सडण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात

१) बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग : या प्रकारात मुख्यतः काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषांवर जगणारे सूक्ष्मजीव तसेच काही प्रमाणात बोंडावरील जिवाणू करपा कारणीभूत असतो. साधारणतः बोंडे परिपक्व व उमलण्याच्या अवस्थेत असे प्रकार आढळून येतात. बहुतेक वेळा बोंडावर बुरशींची वाढ झाल्याचे दिसते. सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि हवामानातील अधिक आर्द्रता असे घटक ह्या प्रकारच्या बोंड सडण्याला पोषक असतात.

२) आंतरिक बोंड सडणे रोग : ही समस्या प्रामुख्याने संधिसाधू व कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणारे रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात अंर्तवनस्पतीय रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होतो. अशी बोंडे बाहेरून निरोगी दिसतात. मात्र, ती फोडली असता आतील रुई पिवळसर-गुलाबी ते लाल-तपकिरी रंगाची होऊन सडल्याचे दिसते. अगदी विकसित अवस्थेतील बियासुद्धा सडल्याचे आढळते. बोंडावर पाकळ्या चिकटून राहिल्याने बोंडाच्या बाह्यभागावर ओलसरपणा राहतो. अशा ठिकाणी जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. पावसाळ्यात होणारा संततधार व रिमझिम पाऊस, सतत ढगाळ हवामान, हवेतील अधिक आर्द्रता, कळ्यांवर व विकसित होणाऱ्या बोंडावरील रसशोषणारे ढेकूण यांचा प्रादुर्भाव अशा घटकांमुळे आंतरिक बोंड सडण रोगाची समस्या आढळते.

उपाय योजना :

१. बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच संधिसाधू जिवाणू व बुरशींची वाढ होणार नाही.

२. पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रसशोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात.

३. पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घ काळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडण रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्लू.पी.) २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी.

४. बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी,  पायराक्लोस्त्रोबीन (२०% डब्ल्यू.जी.) १० ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन (५% डब्लू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) २० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५% ई.सी.) १० मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२% डब्लू डब्लू) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४% एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १० मिली किंवा प्रोपीनेब (७०% डब्लू.पी.) २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

५. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९००० यावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

संदर्भ  : केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

Exit mobile version