Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

रब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन; वाढेल तुमचे उत्पादन

रब्बी ज्वारी लागवडीसाठी मूलस्थानी जलसंधारण केल्यानंतर उताराला आडवी मशागत करून जमिनीतील चांगल्या ओलाव्यावर पेरणी करावी. जमिनीच्या खोली व प्रकारानुसार रब्बी ज्वारीच्या जातींची निवड करावी. माती परिक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी.

– रब्बी ज्वारीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी कोरडवाहू तंत्रज्ञान व नवीन जातींचा जाणीवपूर्वक वापर केल्यास उत्पादनात २०-२५ टक्‍क्‍यांनी वाढ होते.

– रब्बी ज्वारीसाठी मूलस्थानी जलसंधारण केल्यानंतर उताराला आडवी मशागत करून जमिनीतील चांगल्या ओलाव्यावर पेरणी करावी.

पावसाच्या ओलीवर १५ ऑक्टोबरपर्यंत ५ सें.मी. खोलीपर्यंत पेरणी करावी. प्रतिहेक्टरी १.४८ लाख रोपसंख्या ठेवावी. त्यासाठी पेरणी ४५ x १५ से.मी. अंतरावर करावी.

– जमिनीच्या खोली व प्रकारानुसार रब्बी ज्वारीच्या जातींची निवड करावी. उदा. हलक्‍या जमिनीसाठी अनुराधा, मध्यम जमिनीसाठी फुले चित्रा, फुले सुचित्रा, परभणी मोती व मालदांडी ३५-१ तसेच भारी जमिनीसाठी फुले वसुधा, फुले यशोदा, पी के व्ही क्रांती, परभणी मोती या जातींची निवड करावी.

– बागायती ज्वारीसाठी फुले रेवती, फुले वसुधा आणि हुरड्यासाठी फुले मधुर या जातींची लागवड करावी.

– पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधकाची (३०० मेश), त्यानंतर २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जीवाणूंची प्रक्रिया करावी. म्हणजे उगवण चांगली होऊन जोमदार पीक येते.

– एकरी २० किलो नत्र, १० किलो स्फुरद व १० किलो पालाश अशी खते द्यावीत. नत्र दोन हप्त्यात विभागून द्यावे. जमिनीत कमी ओलावा असल्यास पेरणीवेळी १० किलो नत्र द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे. स्फुरद १० किलो व पालाश १० किलो पेरणीच्या अगोदर द्यावे.

– जिरायती ज्वारीमध्ये पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने द्यावी. त्यामुळे तणांचे नियंत्रण व पिकाला मातीची भर दिली जाते. दुसरी कोळपणी पेरणीनंतर ५ आठवड्यांनी अखंड फासाच्या कोळप्याने करावी. तिसरी कोळपणी पेरणीनंतर ८ आठवड्यांनी जमिनीत पडणाऱ्या भेगा बुजवण्यासाठी दातेरी कोळप्याने करावी.

– बागायती ज्वारीस पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी. दुसरी कोळपणी ४ ते ५ आठवड्यांनंतर अखंड फासाच्या कोळप्याने करावी.

– कोरडवाहू ज्वारी फुलोऱ्यात असताना एखादे संरक्षित पाणी दिल्यास उत्पन्नात ३० ते ३५ टक्‍क्‍यांनी वाढ मिळते.

– बागायती रब्बी ज्वारीसाठी पाणी व्यवस्थापन करताना २८ ते ३० दिवसांनी पहिले पाणी, पीक पोटरी पडून फुलोऱ्यात असताना (७०-७५) दुसरे पाणी आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत (९०-९५) तिसरे पाणी द्यावे.

 

-डॉ. विजय अमृतसागर, डॉ. निळकंठ मोरे, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर

Exit mobile version