Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला, ६ ते ११ एप्रिल २१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी हिंगोली, परभणी, जालना व नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत विस्तारीत अंदाजानूसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 02 ते 08 एप्रिल  दरम्यान कमाल तापमान 34.0 ते 38.0 अं.से., 9 ते 15 एप्रिल दरम्यान कमाल तापमान 36.0 ते 38.0  अं.से., 16 ते 22 एप्रिल दरम्यान 36.0 ते 38.0 अं.से. तसेच 23 ते 29 एप्रिल 2021 दरम्यान कमाल तापमान 36.0 ते 39.0 अं.से. राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. ऊस पिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे. ऊस पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळिंब बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील फुटवे काढावे.कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे चिकू बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी.

भाजीपाला पिके

कमाल तापमानात होत असलेल्‍या वाढीमुळे भाजीपाला पिकास जमिनीच्‍या प्रकारानुसार दोन पाण्‍याच्‍या पाळयातील अंतर कमी करावे. भाजीपाला पिकास पाणी शक्यतो सुक्ष्म सिंचन पध्दतीने सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. भाजीपाला पिकात (मिरची, वांगी, भेंडी) रसशोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्झीफेन 5 % + फेनप्रोपॅथ्रीन 15 % 10 मिली किंवा डायमिथोएट 30 % 13 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे फुल पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. मोगरा फुलांची तोडणी सकाळी लवकर करावी.

  पशुधन व्‍यवस्‍थापन

उन्हाळयात पक्षांचे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे पक्षांच्या खाद्यातील उर्जेचे  प्रमाण कमी करुन इतर जीवनसत्व (प्रथिने, व्हीटॅमिन्स व खनिजे) व इलेक्ट्रोलाईटचे (सोडीयम, पोटॅशियम, क्लोराइड) चे प्रमाण वाढवावे. तसेच कोंबडयांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना 10 दिवसाच्या अंतराने  व्हीटॅमिन – ई  व सेलेनियम चे मिश्रण 10 ग्रॉम पाण्यातून 200 पक्षांना 3 दिवस द्यावे.

चारा पिके

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उन्‍हाळी हंगामासाठी लागवड केलेल्‍या चारापिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

सामुदायिक विज्ञान

बालसंगोपन हे अतिशय आव्हानात्मक कार्य आहे. त्यामुळे नवविवाहीत दाम्पत्यांनी पूर्व तयारीनिशी पालकत्वाची जबाबदारि स्विकारावी. अशी तयारी करत असतांना ते शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्टया सक्षम असावे. तसेच त्यांना बाल संगोपनासाठी शास्त्रोक्त माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

 (सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Exit mobile version