Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला : १९ ते २३ जानेवारी २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 18 व 19 जानेवारी रोजी किमान तापमानात घट होईल त्यानंतर 20 व 21 जानेवारी रोजी किमान तापमानात वाढ होऊन परत 21 जानेवारी नंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग जास्त झालेला आहे व पिकाच्या संवेदनशील अवस्थेनूसार पिकास पाणी देणे गरजेचे आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकास 180 दिवस झाले असल्यास कापसाची शेवटची वेचणी पूर्ण करून पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास व पीक फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाणी द्यावे. उन्हाळी भुईमूगाच्या पेरणीसाठी प्रथम शेत ओलवून पेरणी जानेवारी महिन्याच्या दूसऱ्या पंधरवाडयात करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 100 किलो बियाणे वापरावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती करडई पीक फुलावर असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये  पिकास हलके पाणी द्यावे तसेच पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

ढगाळ वातावरण, आर्द्रता यामूळे मृग बाग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल 10 मीली + स्टिकर प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.    द्राक्ष बागेत मणी क्रॅकिंग (द्राक्ष तडकणे) याच्या व्यवस्थापनासाठी बागेत हवा खेळती राहून मूबलक सूर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था करावी.

भाजीपाला

मागील काही दिवसातील ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहेत. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

वजन वाढत जाणाऱ्या पाळीव प्राण्यात प्रजनन क्रिया सुलभपणे पार पडते तर वजनात घट होत राहिल्यास वंधत्व प्रमाण वाढते. तेव्हा पाळीव प्राण्यांचे दर आठवडी शरीर वजन नोंदवा आपल्या कालवडी व पारडया अनूक्रमे 250 आणि 275 किलो शरीरवजनाच्या झाल्यास पहीला माज दाखवतात.

सामुदायिक विज्ञान

गर्भावस्थेत सुरूवातीच्या दोन महिन्यात गर्भाचे प्रमुख अवयव जसे की ऱ्हदय, मज्जातंतू नलिका, डोळे, नाक, कान, हात, पाय यांच्या प्राथमिक विकसनास सुरूवात होते. त्यामूळे अगदी सुरूवातीपासून गर्भवतीची सर्वतोपरी काळजी घेणे नितांत गरजेचे आहे.

(सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )

Exit mobile version