प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसात मराठवाडयात तुरळक ठिकाणी खूप हलका ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 04 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे सोयाबीन पिकावरील चक्री भुंगा व पाने खाणारी अळी याच्या व्यवस्थापनासाठी नोवाल्यूरॉन 5.25% + इंडोक्झाकार्ब 4.5% 850 मिली किंवा बीटा सायफ्ल्यूथ्रीन + इमिडाक्लोप्रीड 350 मिली किंवा थायामिथॉक्झाम + लॅमडा सायहॅलोथ्रीन 125 मिली प्रति हेक्टर फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.बाजरी पिकात तणांचे नियंत्रण करावे.ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. कमाल तापमान 31 अं.से., किमान तापमान 17 ते 19 अं.से. आणि सकाळची आर्द्रता 75 ते 88 टक्के ऊस पिकावरील खोड किडीच्या वाढीस अनुकूल आहे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी झाडांना काठीचा आधार द्यावा.काढणीस तयार असलेल्या डाळींब बागेतील फळांची काढणी करून घ्यावी. वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या डाळींब झाडांना काठीचा आधार द्यावा. चिकू बागेतील तणांचे नियंत्रण करावे. वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या चिकू झाडांना काठीचा आधार द्यावा.
भाजीपाला
सध्याचे दमट व ढगाळ वातावरण यामुळे टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॉबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
नविन लागवड केलेल्या फुल पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या गुलाब व निशीगंध फुलांची काढणी करावी.
चारा पिके
चारा पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
तुती रेशीम उद्योग
रेशीम कीटक संगोपन गृह शेडनेट हाऊसचे असल्यास त्यात तापमान व आर्द्रता मर्यादित ठेवणे अवघड जाते. हिवाळयात रुम हिटर किंवा शेगडीच्या साहाय्याने तर उन्हाळयात डेझर्ट कुलर च्या साहाय्याने तापमान नियंत्रणात 22 ते 28 से. ग्रे. ठेवावे. रेशीम कीटक कोषावर आल्यास चोही बाजूने दूपारच्या वेळी शेडनेटवर करून हवा खेळती ठेवावी (1 मि. प्रति सेकंद याप्रमाणे) तिसऱ्या वाढींच्या अवस्थेत किंवा नंतर उझी माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता शेडनेटच्या वरील बाजूस पत्रालगतचे सर्व छिद्र बूजवून घ्यावेत. दरवाज्यातून तूती पाने/फांद्या सरळ आत न आणता दरवाज्यालगत एक अंधार खोली तयार करून त्यावर नायलॉन जाळी अच्छादन करावे. प्रथम तेथे फांद्या ठेवण्याची व्यवस्था करावी एक ते दिड तासानंतर संगोपन गृहात फांद्या न्याव्यात. जमिनीवरील सर्व खाच खळगे व भेगा बूजवून फरशी किंवा सिमेंट काँक्रीटचा खोबा करून घ्यावा. प्रत्येक कोषाच्या पिकानंतर आठ दिवसाचा खंड ठंवावा.
सामुदायिक विज्ञान
घराच्या योजनेत वरच्या मजल्यावर किंवा गच्चीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा उपयोग केला जातो. चढउतार आरामदायी होण्यासाठी या पायऱ्यांची रूंदी 3 फुट, खोली 11 ते 19 इंच आणि उंची 8 ते 9 इंच असावी.