Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला : ९ जानेवारी २१ पर्यन्त

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. औरंगाबाद व जालना जिल्हयात  दिनांक 08 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.  विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 09 ते 15 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकास 180 दिवस झाले असल्यास कापसाची शेवटची वेचणी पूर्ण करून पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  रब्बी सूर्यफूल पिकात पानांवरील काळे ठिपके (अल्टरनेरीया) आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत झाडांना काठीने आधार द्यावा. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.   आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.    द्राक्ष बागेत डाऊनी मिल्डयूच्या व्यवस्थापनासाठी ॲमिसूलब्रुम 17.5 % एससी 0.375 मिली किंवा फ्युयोपिकोलाईड 4.44% + फोसेटिल एएल 66.67% संयूक्त बूरशीनाशक 2.5 ग्रॅम किंवा डायमिथोमॉर्फ 50% डब्ल्यूपी 0.50 ते 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी द्राक्षाची घडे जिब्रॅलिक ॲसिड 20 पीपीएमच्या द्रावणात बूडवावी.

भाजीपाला

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

सध्या पशूधनामध्ये एफ एम डी  (लाळ्या खुरकुत) या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. बाधित प्राण्यामध्ये उच्च ताप, संपूर्ण अंगावर पुरळ येऊन फुटतात, विशेष करून नाका तोंडात व खुरांवर पुरळ जास्त प्रमाणात आढळतात, तसेच  नैराश्य, अतिउत्साहीपणा, भूक न लागणे, वजन कमी होणे, वाढ मंद होणे आणि दूध उत्पादनात घट दिसून येते, जी बरे झाल्यानंतरही कायम राहू शकते. याच्या व्यवस्थापनासाठी एफ एम डी बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे केल्यास रोगाचा प्रसार रोखता येईल. लसीकरणामुळे रोग होण्यास प्रतिबंध होतो. जनावरांचे लसीकरण सुरुवातीला 3 महिन्यांच्या वयात करावे आणि नंतर बूस्टर लसीकरण दरवर्षी करणे आवश्यक आहे. थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. कोंबडयाच्या शेडमध्ये आवश्यकतेनूसार ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत.

सामुदायिक विज्ञान

शेतीतील हाताने करावयाचे खत पेरणी कार्य सुकर करण्यासाठी वनामकृवि  विकसित सुलभा बॅगचा उपयोग करण्यात यावा.

सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Exit mobile version