Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला : दि. ५ मार्च २२ पर्यंत

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात 1 ते 2 अं.सें. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात दिनांक 02 ते 04 मार्च, 2022 दरम्यान ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग व जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 मार्च ते 12 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे  तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी करून घ्यावी. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8% 2.5 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 6 मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 3 मिली (संयूक्त किटकनाशक) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार ठिबक किंवा तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी पिकात घडांना काठीने आधार द्यावा. बागेतील वाळलेली व रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. केळी बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. आंबा फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एनएए 10 पीपीएम (प्लॅनोफिक्स 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी) ची फवारणी करावी. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंबा बागेत आवश्यकतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

कांदा पिकावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबिन + डायफेनकोनॅझोल 10 मिली + स्टीकर 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

पशुधनावर सध्या प्रचंड प्रमाणामध्ये पिसवांचा प्रादुर्भाव होत आहे. पिसवांचा प्रादुर्भाव आढळल्यास पशुधनास आहे त्या गोठ्यापासून काही काळासाठी दुर अंतरावर बांधावे. त्या गोठयातील जाळै/जळमटे स्वच्छ करावेत व या गोठयामध्ये 4% मिठाचे द्रावण सर्वत्र फवारावे. लागण झालेल्या पशुधनावरती 5% निंबोळी अर्क अथवा वनस्पतीजन्य किटकनाशकाचे द्रावण (15 मिली निंबोळी तेल + 15 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम साबण + 1 लिटर पाणी) फवारावे अथवा पशुवैद्यक तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली रासायनीक किटकनाशकाची फवारणी करावी. उन्‍हाळी हंगामात हवा गरम होऊन तापमान वाढते. पशुधनाच्‍या शेडच्‍या पत्र्यावर गवताचे किंवा ऊसाच्‍या पाचटाचे आच्‍छादन केल्‍यास शेडचा पत्रा तापत नाही. या प्रक्रियेमुळे शेडमधील तापमान योग्‍य राहण्‍यास मदत होते.

सामुदायिक विज्ञान

शरीरातील सर्व कामे व्यवस्थीत करण्याकरिता व आपल्या ऱ्हदयाचे ठोके व्यवस्थीत राहण्यासाठी मिठाचीगरज असते. मिठामुळे चव चांगली येते पण मिठाचा वापर कमी करावा. कारण जास्त मिठाचा वापर केल्याने रक्तदाब, ऱ्हदयरोग होतात. जास्त मिठामुळे हाडातील कॅल्शीयमचे शोषण होते. जागतिक आरोग्य संघटना यांनी प्रति दिवस 5 ग्रॅम पेक्षा कमी मिठाचा वापर करावा असे सुचविले आहे.

सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Exit mobile version