Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला : दिनांक २ ते ६ फेब्रुवारी २२

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणर नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सियस ने घट होण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार जमिनीतील ओलावा वाढलेला असून बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला असल्यामूळे पिकास पाणी देण्याची आवश्यकता नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 06 ते 12 फेब्रूवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  उन्हाळी भूईमूग पिकाची पेरणी केली नसल्यास पेरणी फेब्रुवारी ‍महिन्याच्या पहिल्या आठवडयात संपवावी. उन्हाळी भुईमूग पिकास पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे नंतर द्रव्यरूपी रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी) संवर्धके प्रत्येकी 10 मिली प्रति एक किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी पिकात घडांना काठीने आधार द्यावा. बागेतील वाळलेली व रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. आंबा मोहोर संरक्षणासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी म्हणजे भूरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.    द्राक्ष बागेत भूरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी सल्फर (40 एस.सी) या फॉर्म्यूलेशनचा 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून वापर करावा.

भाजीपाला

कांदा पिकावरील फुलकिडे यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 1 मिली किंवा फिप्रोनिल 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत. गोचीडांचा पशुधनावर प्रचंड प्रमाणामध्ये प्रादूर्भाव वाढला असल्यामूळे एकात्मिक किड व्यवस्थापन कार्यक्रम राबवणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये गोठयातील साफसफाई करून अंडी शेकोटीमध्ये जाळणे, पाच ठक्के निम अर्कची पशुधनावर फवारणी करणे व सदरील प्रक्रिया आठवडयाच्या अंतराने तिन वेळेस करावी.

सामुदायिक विज्ञान

मैदानी खेळ हे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायी असल्याने पालकांनी आपल्या बालकांना त्याकरिता प्रात्साहित करावे.

 सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Exit mobile version