Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला : २ ते ६ नोव्हेंबर २१

छायाचित्र प्रतीकात्मक

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार  मराठवाडयातील उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात दिनांक 03, 04 व 05 नोव्हेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 नोव्हेंबर ते 09 नोव्हेंबर, 2021 दरम्यान किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर लागवड केलेल्या व वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. सुरुवातीस 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% (संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून फवारणी करावी. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून 15 ते 20 दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी करावी. रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी करावी. बागायती करडई पिकाची पेरणी 5 नोव्हेंबर पर्यंत करता येते. करडई पीक आंतरपीक पध्दतीत घेता येते. हरभरा + करडई (6:2 किंवा 3:1), गहू + करडई (3:1 किंवा 2:1) व जवस + करडई (3:1 किंवा 4:2) या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा.

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे.आंबा फळबागेत चांगला मोहोर लागण्यासाठी बागेस पाणी देऊ नये. द्राक्ष बागांची ऑक्टोबर छाटणी केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावी.काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 भाजीपाला

पुर्नलागवडीस तयार असलेल्या रब्बी भाजीपाला (वांगी, टोमॅटो, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी) पिकांची पुर्नलागवड करून घ्यावी व पुर्नलागवड केल्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

फुलशेती

पुढील काळात दीपावली सणामुळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते त्यामूळे आवश्यकतेनूसार फुलांच्या तोडणीचे नियोजन करावे.

पशुधन व्यवस्थापन

पशूधनात बाह्य परजीवी (ऊवा, पिसवा, गोचीड व चावणाऱ्या कीटकवर्गीय माशा) यांच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा वनस्पतीजन्य  कीटकनाशक (कडूनिंब तेल 15 मिली + कारंज तेल 15 मिली + 2 ग्रॅम मऊ साबण + 1 लिटर पाणी) हे द्रावण आठवडयाच्या अंतराने पशुधनावर, गोठ्यामध्ये सभोवताली साचलेल्या पाण्याचे डबके, खच खळगे/नाली व शेणाच्या ढिगाऱ्यावरती फवारावे. हे वनस्पतीजन्य कीटकनाशक कीटक रोधक व कीटक/गोचीडाचे जीवनचक्र तोडून त्यांची संख्या घटवण्यासाठी मदत करते.

सामुदायिक विज्ञान

सकाळचा नाश्ता एक महत्वाचे जेवण आहे कारण रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळच्या नाशत्यामूळे शरीराला लागणाऱी उर्जा तसेच आवश्यक पौष्टीक मुल्य चांगल्या आरोग्याकरिता आवश्यक आहे.

सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Exit mobile version