Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला : १० ते १४ नोव्हेंबर २१

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. सुरुवातीस 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% (संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून फवारणी करावी. वेळेवर लागवड केलेल्या व वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून 15 ते 20 दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी करावी. रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी करावी. बागायती करडई पिकाची पेरणी करून तीन आठवडे झाले असल्यास पहिली कोळपणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत 50 ग्रॅम पालाश प्रति झाड खत मात्रा द्यावी. बागेत झाडांना मातीचा आधर देऊन आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.आंबा फळबागेत चांगला मोहोर लागण्यासाठी बागेस पाणी देऊ नये. द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला (वांगी, टोमॅटो, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी) पिकास खत मात्रा द्यावी. मिरची पिकावर रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

तोडणीस तयार असलेल्या फुलपिकांची तोडणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

दिवसेंदिवस किमान तापमानात होत असलेल्या घटीमूळे व पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.

सामुदायिक विज्ञान

रोजच्या आहारात 30 ग्रॅम पेक्ष जास्त साखर वापरू नये कारण जास्त साखरेमूळे जास्त कॅलरी मिळतात त्यामूळे वजन वाढते. वजन वाढल्यामूळे ऱ्हदयरोग आणि मधूमेह होण्याचा धोखा असतो.

सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Exit mobile version