Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषि हवामान सल्ला; 9 ते १३ मार्च २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते ढगाळ राहील.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्‍या हरभरा पिकाची काढणी करावी. हरभ-याच्‍या परिपक्‍वतेच्‍या काळात पाने पिवळी पडतात, घाटे वाळु लागतात. त्‍यानंतर पिकाची कापणी करावी. अन्‍यथा पीक जास्‍त वाळल्‍यास घाटेगळ होऊन पिकाचे नुकसान होते. कापणीस तयार असलेलया करडईची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापणी सकाळी करावी म्‍हणजे हातांना काटे टोचत नाहीत आणि बोंडातील दाणेही गळत नाहीत; तसेच हातांना काटे टोचु नये म्‍हणून कपडा किंवा हातमोजे वापरावेत. ऊस पिकात उभ्या ऊसाची खालील पक्व तसेच वाळलेली पाने काढून सरीत आच्छादन करावे.उस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी डायकोफॉल 18.5% 2 मिली किंवा प्रोपरगाईट 20% 1 मिली किंवा इथिऑन 20% 2 मिली किंवा विद्राव्‍य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्‍यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. डाळिंब बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी.

भाजीपाला पिके

टोमॅटो पिकात नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी प्रादूर्भाव ग्रस्त पाने, फळे तोडून नष्ट करावीत. कामगंध सापळे व प्रकाश सापळे यांचा वापर करावा आवश्यकता वाटल्यास सायांट्रॅनिलिप्रोले १०.२६% १८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी शक्यतो सकाळी लवकर किंवा दूपार नंतर करावी. उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

फुल पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी.

पशुधन व्‍यवस्‍थापन

पशुधनास मुबलक स्वच्छ पाणी आणि सकस खाद्य उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी. पाण्यामधून गुळ अथवा ताण प्रतिरोधक औषधे (योग्य त्या मात्रेमध्ये) द्यावी. पशुधनाचे उष्ण्तेपासून संरक्षण करावे. पशुधनास दूपारच्या वेळी सावलीत बांधावे.

सामुदायिक विज्ञान

शरीरातील सर्व कामे व्यवस्थीत करण्याकरिता व आपल्या ऱ्हदयाचे ठोके व्यवस्थीत राहण्यासाठी मिठाचीगरज असते. मिठामुळे चव चांगली येते पण मिठाचा वापर कमी करावा. कारण जास्त मिठाचा वापर केल्याने रक्तदाब, ऱ्हदयरोग होतात. जास्त मिठामुळे हाडातील कॅल्शीयमचे शोषण होते. जागतिक आरोग्य संघटना यांनी प्रति दिवस 5 ग्रॅम पेक्षा कमी मिठाचा वापर करावा असे सुचविले आहे.

चारा पिके

मका पिकावरील लष्‍करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्‍यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी इमामेक्‍टीन बेन्‍झोएट 5 % 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता चारा पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

 

(सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Exit mobile version