Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषि हवामान सल्ला; १८ ते २३ मे २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 18 मे रोजी औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात दिनांक 18 व 19 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 मे ते 29 मे, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची तर  किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकाची लागवड मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये करावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड जमिनीवर कापूस पिकाची लागवड करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली 60 ते 100 सेंमी असावी, जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 एवढा असावा.तुर या पिकास मध्यम ते भारी (30 ते 45 सेंमी खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. तुरीच्या पिकास चोपन व क्षारयुक्त जमिन मानवत नाही. तुर पिकाच्या वाढीस जमिनीचा सामु 6.5 ते 7.5 योग्य असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात.मुग/उडीद या पिकांच्या लागवडी करीता योग्य निचऱ्याची मध्यम ते भारी जमिन निवडावी. एकदम हलक्या प्रतिची मुरमाड जमिन या पिकास योग्य नाही. पाणी साठवूण ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.भुईमूग लागवडीसाठी मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेली जमिन निवडावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमिन निवडावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळीच्या मृग बाग लागवडीसाठी काळी व कसदार, भुसभुशीत गाळाची, पोयटयाची, पाण्याचा निचरा होणारी जमिन निवडावी. लागवडीसाठी क्षारयुक्त जमिनीची निवड करू नये.आंबा लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रतीची पाण्याचा चांगला निचरा होणारी, थोडीशी आम्लयुक्त जमिन निवडावी. चोपन व चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये. जुन्या आंबा बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास  याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिद्रात पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे.द्राक्षे बागेत फुलकिडयांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्क किंवा  स्पिनोसॅड 45% 2.5 मिलि किंवा फिप्रोनिल 80% 0.6 मिली किंवा इमामेक्टीन  बेन्झोएट 5% 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  पावसाची उघाड व वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी. द्राक्ष बागेत अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आल्यास 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून  पावसाची उघाड बघून फवारणी करावी.सिताफळ लागवडीसाठी मध्यम ते हलकी, उत्तम निचरा होणारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ व सामू 6.5 ते 8.0 दरम्यान असलेली जमिन निवडावी. भारी, पाण्याचा निचरा न होणारी जमिन निवडू नये. जुन्या सिताफळ बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास  याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोड लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे.

भाजीपाला

खरीप हंगामात भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी भाजीपाला पिकाच्या प्रकारानुसार जमिनीची निवड करावी. वांगी पिकावरील शेंडा व फळ पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा  क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% ईसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम  किंवा फेनप्रोपॅथ्रीन 30% ईसी 5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

पशुधन व्‍यवस्‍थापन

जनावरांना संतुलीत खाद्य द्या, भरपूर पाणी पाजवा यामुळे उन्हाळयातील ताण कमी होउन दुग्धोत्पादन कायम राहते. प्रथिने व उर्जायुक्त खाद्य जसे विविध प्रकारच्या ढेपी आणि भरडलेले कडधान्य यांचे मिश्रण सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस जनावरांना द्या सोबत 20-25 ग्रॅम खनिप ‍मिश्रण ही द्यावे. उन्हाळयातील ताण कमी होतो दुध उत्पादन टिकवून ठेवता येते.

सामुदायिक विज्ञान

इंग्रजी झेंडूंच्या फुलांची भुकटी पाण्यामध्ये उकळून त्यापासून रंग काढता येतो. हा रंग सुती, रेशमी आणि उनी धागे रंगविण्यासाठी अनुक्रमे 11%, 2% आणि 2% या प्रमाणात घेऊन वापरता येतो. इंग्रजी झेंडूच्या फुलांपासून रंग काढण्यासाठी व धागे रंगविण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ प्रमाणित करण्यात आला आहे. सुती धागे रंगविण्यापूर्वी, 10% हरडयाच्या द्रावणात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तुरटी, क्रोम, कॉपर सल्फेट आणि फेरस सल्फेट या रंगबंधकाचा वापर करून फिका ते गडद केशरी, गडद विटकरी अशा विविध रंगछटा मिळतात. धुणे, घासणे, घाम आणि सूर्यप्रकाश या सर्व बाबीसाठी रंगाचा पक्केपणा अतिशय चांगला आहे.

(सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Exit mobile version