Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषि हवामान सल्ला : १२ ते १६ मार्च २०२२

 दिनांक 12 मार्च नंतर मराठवाडयात तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 मार्च रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी  वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.)  राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 मार्च नंतर मराठवाडयात तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयातील सर्व तालूक्यात व जिल्हयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 मार्च, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

दिनांक 11 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्या हरभरा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. हरभ-याच्‍या परिपक्‍वतेच्‍या काळात पाने पिवळी पडतात, घाटे वाळु लागतात. त्‍यानंतर पिकाची कापणी करावी. अन्‍यथा पीक जास्‍त वाळल्‍यास घाटेगळ होऊन पिकाचे नुकसान होते. दिनांक 11 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्या गहू पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. गहू पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गव्हाची काढणी करून घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकात आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीनचे बिजोत्पादन घेत असल्यास शेतकऱ्यांनी शेतात वेगळी दिसणारी झाडे उपटुन टाकावीत. सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा थायामिथॉक्झाम + लॅम्डा सायहॅलोथ्रीन एकरी 50 मिली (2.5 मिली प्रति 10 लिटर) पाण्यात मिसळून फवारणी करावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून दिनांक 11 मार्च रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये. काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे, फळगळ दिसून येत असल्यास 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृगबहार लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून घ्यावी.  डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

वेलवर्गीय भाजीपाला पिकात नाग अळी/पाने पोखरणारी अळी चा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी    सायाट्रानिलिप्रोल 10.26% 18 मिली  प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात तणनियंत्रण करून पाणी  व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. फुल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

चारा पिके

चारा  पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

तुती रेशीम उद्योग

सेंदीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हैसूर यांच्या शिफारशीनुसार रेशीम किटकावरील उझी माशीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करणे गरजेचे आहे.उझीसाइड, स्टिकीटाय, निसोलायनेक्सचा जैविक उपाय व उझीट्राय या सर्व पर्यायांचा एकत्रित वापर केला तर 84% पर्यंत उझी माशीचे नियंत्रण होते. सर्व खिडक्या दरवाज्यांना नायलॉन वायरमेश जाळी लावणे आवश्क असून दरवाजे अपोआप बंद होण्याची व्यवस्था करणे  रॅकला चोहीबाजुने नायलॉन वायर मेशने अच्छादिन करणे त्याच बरोबर संगोपन गृह प्रवेश द्वारा बाहेर नायलॉन वायर मेशचा वापर करून 10 x 10 आकाराचे  अँटीचेम्बर तयार करणे म्हणजे शेतातून तुतीपाला आणल्यानंतर सरळ संगोपन गृहात न आणता 1 ते 2 तास  अँटीचेम्बर मध्ये ठेवावे.  अँटीचेम्बर अंधार खोली सारखे करावे म्हणजे उझी माशी बाहेरच्या बाजूस उडून निघून जाईल.

सामुदायिक विज्ञान

स्थानिक उपलब्धतेनुसार वनस्पतीच्या विविध स्त्रोतापासून रासायनिक रंगाला पर्यायी नैसर्गिक होळीचे रंग तयार करता येतात. पळसाची फुले, इंग्रजी झेंडूची फुले, मंजिष्ठा, हळद, मेहंदी, बीट,‍ आवळा आणि नीळ यांच्या घट्ट द्रावणामध्ये आरारूट मिसळून होळीचे नैसर्गिक रंग तयार करता येतात. पिवळा, केशरी निळा, हिरवा, काळा या रंगछटा विकसित केल्या गेल्या आहेत. हे रंग भुकटीच्या स्वरूपात असून कपडयावरल तसेच शरीरावरील रंग धुऊन काढण्यास अत्यंत सोपे आहेत.

सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Exit mobile version