Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी सल्ला : मौसमी पाऊस 75 ते 100 मिमी झाल्याशिवाय पेरणी करू नये

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग (30-40 किमी/तास) अधिक राहून पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी मौसमी पाऊस 75 ते 100 मिमी झाल्याशिवाय पेरणी करू नये.

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य मौसमी पाऊस (75-100 मिमी) झाला असल्यास (औरंगाबाद जिल्हा : औरंगाबाद,‍ सिल्लोड ; बीड जिल्हा : माजलगाव, परळी, केज, वडवणी ;  हिंगोली जिल्हा : औंढा नागनाथ, वसमत, कळमनूरी, सेणगाव, हिंगोली ; जालना जिल्हा : आंबड, परतूर, मंठा, ; उस्मानाबाद जिल्हा : लोहारा, भूम, परांडा,; परभणी जिल्हा : गंगाखेड, जिंतूर, मानवत, पालम, परभणी, पाथरी, पूर्णा, सोनपेठ, सेलू ; नांदेड जिल्हा : माहूर, लोहा, हिमायतनगर, अर्धापूर, भोकर, बिलोली, धर्माबाद, हादगाव, किनवट, मुदखेड, उमरी, ; लातूर जिल्हा : अहमदपूर, चाकूर, देवणी, जळकोट,) जमिनीतील ओलावा बधून वापसा आल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच  पेरणी करावी.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 जून ते 29 जून, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरी एवढे राहण्याची,  किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची तर पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकास हेक्टरी 30 किलो नत्र + 60 किलो स्फुरद + 30 किलो पालाश संपूर्ण खताची मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी. सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे स्फुरद न दिल्यास गंधक (मुलद्रवीय) 20 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे द्यावे. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते.खरीप ज्वारीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा शिफारस केली आहे. त्यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. खरीप ज्वारी पिकाची पेरणी  जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.बाजरी पिकास हलक्या जमिनीत 40:20:20 व मध्यम ते भारी जमिनीत 60:30:30 पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते.ऊस पिकात तणांचे नियंत्रण करावे. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी ऊसात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.हळद पिकास 150 किलो नत्र + 50 किलो स्फुरद + 50 किलो पालाश खताची मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्‍य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी. आवश्‍यकता असल्‍यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. डाळींब बागेत तणांचे नियंत्रण करावे. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी बागेतील साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.चिकू बागेत तणांचे नियंत्रण करावे. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी बागेतील साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून वापसा आल्यानंतर बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी.

फुलशेती

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून वापसा आल्यानंतर फुलपिकांची लागवड करण्यास हरकत नाही.

चारा पिके

मका या चारापिकासाठी 80:40:40 नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी खत मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी.

तुती रेशीम उद्योग

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तुतीची बेण्यापासून लागवड केली असेल अशा शेतात मोठया प्रमाणावर 20-25 % पर्यंत तुट राहते. मनरेगा योजनेअंतर्गत दुसऱ्या वर्षात 90 टक्के झाडांची संख्या असणे आवश्यक आहे त्यामुळे तुतीची लागवड बेण्याएवजी 3 महिने वयाच्या रोपांपासून करण्याची महाराष्ट्र शासनाने सक्ती केली आहे. लागवउ केल्यानंतर ठिबक सिंचनाची सुविधा केल्यास ढाडे मरण्याचे प्रमाण नगण्य राहते त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन अपेक्षित तुती पानांचे उत्पादन मिळते.

सामुदायिक विज्ञान

लाल रक्तपेशीच्या परिपक्वतेसाठी जीवनसत्व “ब-12” व फॉलीक ॲसीड समृध्द अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा.  (अ) जीवनसत्व ब-12 : दूध, दूधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी   (ब) फॉलीक ॲसीड: बाजरी, ज्वारी, गहू, सर्व डाळी व कडधान्ये, पालक आंबट चुका, भेंडी, गवार, तीळ, शेंगदणे, पत्ताकोबी, पूदीना, चमकूरा, काकडी, टोमॅटो, धने, मेथी इत्यादी.

सौजन्‍य -डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Exit mobile version