Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला, २१ ते २५ नोव्हेंबर २०२०

मराठवाडयाकरिता हवामान अंदाज व कृषि सल्ला

सद्यस्थितीत शेतीत पुढील प्रमाणे व्‍यवस्‍थापन करावे, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेच्‍या वतीने देण्‍यात आला आहे.

रब्‍बी पिके

रब्बी मध्ये पेरणी केलेल्या हरभरा व करडई पिकात तण नियंत्रणासाठी हलकी कोळपणी करून घ्यावी. ऊस पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिक हे कंद वाढीच्या अवस्थेत असून हळद पिकात पानावरील ठिपके हा रोग दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के अधिक  डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के एससी १० मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा व मोसंबी पिक फळ वाढीच्या अवस्थेत असून मृग बहार संत्रा / मोसंबी बागेत फळगळ होत असल्याचे दिसून येत असल्यास त्याच्या  व्यवस्थापनासाठी जीए ३  हे २० मीली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  तसेच  संत्रा / मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

डाळिंब पिक फळवाढीच्या अवस्थेत असून डाळिंब बागेत खोडावर फुटवे आले असतील तर ते फुटवे कडून घ्यावे. तसेच डाळिंब बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

फुलशेती वाढीच्या अवस्थेत असून फुल बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करून घ्यावे व काढणीस आलेल्या फुलांची काढणी करून घ्यावे.

भाजीपाला पिके

भाजीपाला पिक वाढीच्या अवस्थेत असून पुनर्लागवड केलेल्या भाजीपाला पिकात तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे.

चारा पिके

चाऱ्यासाठी रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून १५ दिवस झाले असल्यास पाणी  व्यवस्थापन करावे.  

पशु व्‍यवस्‍थापन

नवीन जन्मलेल्या गाय व म्हेस यांच्या वासरामध्ये विशेषतः म्हशीच्या नर वासरामध्ये टाक्सोकैरा व्हीटूलोरम या गोलकृमाची लागण होते. यासाठी जन्मलेल्या वासरास वयाच्या ७ व्या दिवशी वा त्यानंतर पायपटझीन या जंतनाशक औषधीची मात्रा देणे आवश्यक आहे. अन्यथा वासरामध्ये आवमीश्रीत दुगधरेणारी घट विष्टा टाकल्या जात व प्रसंगी मृत्यु ओढवतो.

 

हवामान अंदाज व कृषि सल्ला, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वनामकृवि, परभणी

 

 

 

Exit mobile version