Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशीची फरदड टाळा

वनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

सध्या कापूस लागवडीखालील क्षेत्रामधील जवळपास ठिकाणी कपाशीची एक वेचणी झालेली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यात सर्वदूर पाऊस असल्यामुळे शेतक-यांना कपाशीवरील किड व रोगाचे वेळेवर व्यवस्थापन करता आले नाही. त्यामुळे कपशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात दिसून येत आहे. गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेता तिचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीकोनातून सद्यस्थितीत असलेल्या कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी आणि पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी खालील उपाययोजना तातडीने व काटेकोरपणे अवलंबिणे गरजेचे आहे.

पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ;

1) कपाशीची फरदड घेउ नये. वेळेवर कपाशीची वेचनी करुन डिसेंबर नंतर शेतामध्ये कपाशीचे पिक ठेवू नये.

2) हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळयामेंढया चरण्यासाठी सोडाव्यात.

3) हंगाम संपल्यावर ताबडतोब प-हाटीचा बंदोबस्त करावा. शेतात किंवा शेताजवळ प-हाटी रचुन ठेवू नये.

4) श्रेडरच्या सहाय्याने प-हाटीचा बारीक चुरा करुन कंपोष्ट खतासाठी उपयोग करावा.

5) जिनींग मिल व साठविलेल्या ठिकाणी कामगंध सापळयाचा वापर करावा.

यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे शेतकरी कपाशीची फरदड घेऊ शकतात. परंतु थोडया प्रमाणात होणा-या फायदयासाठी भविष्यात गुलाबी बोंडअळीचे संकट वाढू शकते, त्यामुळे कपाशीचे पिक हंगामाबाहेर न घेता फरदड घेण्याचा मोह टाळावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभागाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. संजीव बंटेवाडडॉ. अनंत बडगुजरडॉ. राजरतन खंदारेडॉ. संजोग बोकन आदींनी केले आहे. 

Exit mobile version