Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

महाराष्ट्र चार वर्षांपूर्वीच एपीएमसी कायद्याच्या परिघातून मुक्त

त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमात बोलताना

ज्याची मुळे जमिनीशी जोडलेली असतात तो मोठ्या वादळामध्ये सुद्धा ठामपणे उभा राहू शकतो आणि  कोरोनाच्या काळामध्ये ठामपणे उभे राहिलेले आपले कृषी क्षेत्र याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटले. ते पुढे म्हणाले की देशाचे कृषी क्षेत्र आपले शेतकरी हे आत्मनिर्भर भारताचा आधार असून ते  मजबूत असले तरच भारताचा पाया मजबूत होईल. कृषी क्षेत्र कशाप्रकारे नवीन शिखरे गाठत आहे याचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे उदाहरण दिले जिथे फळे आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या परिघात मुक्त करण्यात आले होते.

या बदलामुळे महाराष्ट्रातील फळे आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत बदल झाला आहे याचे उदाहरण देण्यासाठी त्यांनी श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चे उदाहरण दिले हा  मुंबई-पुण्यामधील शेतकऱ्यांनी स्वतः भरवलेला आठवडी बाजार आहे यामध्ये सुमारे 70 गावातील साडेचार हजार शेतकरी अडते किंवा दलाल यांच्याविना स्वतः जाऊन आपले उत्पादन विकतात.

यावेळी पंतप्रधानांनी आपल्या नव्या पिढीला महापुरुषांबद्दल कथांच्या माध्यमातून माहिती देण्याचे आवाहन केले आणि कथाशास्त्र अधिक लोकप्रिय करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले. वैशाली व्यवहारे देशपांडे यांच्यासारखे अनेक जण मराठी भाषेत सुद्धा हा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

येत्या 28 सप्टेंबर रोजी असणाऱ्या शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीची तसेच पुढच्या महिन्यातील महात्मा गांधीजींच्या जयंतीची आठवण करून देत पंतप्रधानांनी या थोर पुरुषांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे आणि अंगीकारले पाहिजेत असे देखील आवाहन केले.  11 ऑक्टोबर रोजी असणाऱ्या भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की जेव्हा जयप्रकाश नारायण यांच्यावर पाटणा येथे प्राणघातक हल्ला झाला होता तेव्हा नानाजी देशमुख यांनी स्वतःवर तो वार झेलला आणि जेपींचे  प्राण वाचवले.

तसेच यावेळी पंतप्रधानांनी कोरोनासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करत मास्क वापरणे, चेहरा झाकून बाहेर पडणे, दोन मीटर अंतराचा नियम पाळणे आदी नियमांचे पालन करून स्वतःला तसेच कुटुंबाला निरोगी ठेवण्याचे आवाहन केले.

Exit mobile version