तरुणाने उभारला टोमॅटो प्रक्रियेचा उदयोग

स्वयंरोजगारातून इतरांनाही रोजगार देणार्‍या तरूणाची कहाणी…

शिक्षण कमी असलं तर आपण एखादा चांगला उद्योग उभा केला पाहिजे, लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात स्वतःचा मोठा वाटा असला पाहिजे अशी पवन ची खूप इच्छा होती आणि ती पूर्णत्वास आली. पवनने स्वतःसाठी उद्योग उभा केलाच; पण या उद्योगावर काही कुटुंबंही उभी केली आहेत…

शेती हा भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीबरोबरच शेतिपूरक व्यवसायांची वाढ उत्तरोत्तर होत आहे, त्यासाठी शासन देखील प्रयत्न करत आहे. फक्त शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस आता राहिले नसून त्याच्याच जोडीला शेतिपूरक व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे. अर्थात शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी शेतीत पिकणार्‍या शेतमालावर प्रक्रिया करणार्‍या उद्योगांची आवश्यकता आहे.  नवी पिढी शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय करू इच्छित आहे. फूड प्रोसेसिंग म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग  असो अथवा पशुपालनाच्या माध्यमातून दैनंदिन उपजीविकेचे साधन निर्माण करणे, याकडे आता कमाईचे साधन म्हणून बघितले जात आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगावमधील कौलगे येथे राहणार्‍या पवन कोरटे या युवकाला देखील अशाच प्रकारचा उद्योग उभा करायची इच्छा होती. त्यासाठी लागणारा अनुभव त्यांनी एका फूड प्रोसेसिंग उद्योगामध्ये काम करून घेतला होता. पण स्वत:च्या बळावर त्यांना व्यवसाय उभा करायचा होता. घरची शेती असली तरी त्याचबरोबरीने एखादे फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करून त्यातून व्यवसाय उभा करायचा हे त्यांनी मनाशी पक्के केले.

फूड प्रोसेसिंग क्षेत्राला आज भरपूर मागणी आहे. त्यामुळे कच्च्या टॉमेटोवर प्रकिया करून त्याचा केच-अप बनवायचा हे त्यांनी ठरवले. पण हे करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री घेण्यासाठी भांडवलाची गरज लागणार होती. त्यातच त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या शासकीय योजनेची माहिती मिळाली. स्वत:च्या बळावर उद्योग करू इच्छिणार्‍या युवक, युवतींना भांडवल पुरवठा करण्याचे काम अण्णासाहेब पाटील महामंडळ शासकीय योजनेद्वारे करत आहे.

पवन कोरटे यानी आपल्या या अन्नप्रकिया उद्योगासाठी भांडवल उभे करण्याकरता कर्ज मागितले व त्यासाठी ते पात्र ठरले. एक लाखाचे कर्ज त्यांना टोमॅटो पल्प आणि क्रशर मशिनसाठी मंजूर झाले. घरच्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. आपल्या घराच्या मागे त्यांनी एक शेड उभारली आणि तिथे कच्च्या मालावर प्रकिया करण्यासाठी लागणारी यंत्रसाम्रगी ठेवली.  या कामात मदत करण्यासाठी त्यांनी दोन मदतनीस घेतले आहेत. सध्या उत्पादन केलेले केच्अप  सांगली, तासगाव आणि कर्नाटकमधील काही भागात जात आहे. मार्केटिंग स्वत: जाऊन करतात.

आज त्यांचा दर महिन्याचा दोन अडीच लाखाचा सेल होतो आहे. टॉमेटो एक ते दीड टन छोट्या टेम्पोमधून मागवले जातात, या कच्चा मालाचा 80 टक्के पल्पसाठी उपयोगात आणला जातो.  टोमॅटो केचअप बॉटल आणि कॅन दोन्ही आकारात दिला जातो. परंतु एवढ्यावरच समाधान मानणार्‍यांपैकी ते नाहीत, त्यांना हळूहळू आपला व्यवसाय अन्य पदार्थांवर प्रकिया करून वाढवायचा आहे. आज त्यांच्या टोमॅटो केचअप ला चांगली मागणी आहे.

त्यांनी अन्नप्रकिया करण्यासाठी शासनाकडून दिला जाणारा परवाना 2016 साली मिळवला होता.  पवनचे शिक्षण फक्त दहावीपर्यंतच झालेले होते; पण काहीतरी उद्योग उभा केला पाहिजे, लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात स्वतःचा मोठा वाटा असला पाहिजे अशी पवन ची खूप इच्छा होती आणि ही पूर्णत्वास आली.

उद्योग उभारायचा असेल तर त्यासाठी योग्यवेळेस भांडवल मिळणे गरजेचे असते.  अण्णासाहेब पाटील महामंडळामुळे  पवन कोरटे सारख्या तिशीच्या आत असलेल्या एका उद्यमशील उद्योजकाला योग्य दिशा मिळाली आहे.

(-सौजन्य : अपाम, महाराष्ट्र शासन )