आपल्या रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणार्या अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी आपल्या शेतातून भागविता येतात का? कुठलेही रसायन, खत न वापरता शेती करता येते का, या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर मिळते, रामभाऊ महाजन यांच्या स्वावलंबी जीवनशैलीतून. खाद्यतेलापासून ते कापडापर्यंतच्या गोष्टी ते घरीच नवितात. त्यामुळेच बाजारात कापसाचे भाव पडले तरीही त्यांच्या चेहर्यावर नाराजी दिसत नाही.
बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडील पयान घाटाजवळचे मलकापूर तालुक्यातील दाताळा गाव. गावाची लोकसंख्या १३ हजारांच्या आसपास. १९८४ पासून ४ एकर शेती सेंद्रिय पद्धतीने करणारे रामभाऊ गोपाळ महाजन याच गावातील. १९५३ साली आठवीमध्ये असताना त्यांनी मॅकॅले शिक्षणपद्धतीचा निषेध म्हणून शिक्षणाचा त्याग केला. त्यानंतर निसर्गाशी जुळवून घेत त्यांनी स्वत:च शिक्षण पूर्ण केले.
१९५५ पासून विनोबा भावे यांच्या भूदान चळवळ तसेच सर्वोदय चळवळीमध्ये सहभागी होऊन श्रमाधिष्ठित जीवनशैलीचा त्यांनी पुरस्कार केला. आपल्या एकूण जमिनीपैकी चार एकर शेत भूदान चळवळीला दान केले. त्यानंतर परिसरातील उमाळी, तळणी आदी गावांत ठाकूरदास बंग यांच्यासमवेत शिबिरे आयोजित केली आणि ग्रामस्वराज्याची संकल्पना मूर्तरूपात आणण्यासाठी प्रयत्न केले. जेव्हा रासायनिक शेतीचे अपाय त्यांना कळाले तेव्हापासून म्हणजे १९८४ पासून ते संपूर्ण चार एकर शेती सेंद्रिय पद्धतीने करतात. ‘मला उत्पादनासाठी किंवा नफ्यासाठी शेती करायची नसून तर माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कसायची आहे’, असे ते सांगतात.
सर्व गरजा शेती उत्पादनातून दरवर्षी ते मिश्र पीकपद्धती वापरतात. ज्वारी, कापूस, उडीद, मूग, चवळी, भुईमूग, तीळ, गहू या पिकांचे उत्पादन ते घेतात. खाद्यतेलाची गरज ते तीळ व भुईमुगाच्या तेलापासून भागवतात; तसेच कापसापासून घरीच सूत काढून नागपूर येथून कापड तयार करून आणतात. त्याचप्रमाणे २० जडीबुटींपासून आरोग्यदायी चहा पावडर तयार करतात. अशाप्रकारे शेतातील उत्पादनांपासून ते गरजा भागवितात.
एक किलो कापसापासून अडीच मीटर कापड
कापसापासून ते घरीच चरख्यावर सूत काढतात. प्रथम कापसापासून सरकी व रुई जळगाव येथील सूतगिरणीमधून वेगवेगळी काढून आणतात. त्यानंतर रुईपासून सूत काढून धागा बनवितात. या धाग्यांचे बंडल नागपूरला नेवून त्यापासून कापड तयार करतात. संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला कापूस असल्यामुळे त्यांनी तयार केलेल्या कपड्यांंना मागणीही प्रचंड आहे. एक किलो कापसापासून अडीच मीटर कापड तयार करतात, तसेच ४० ग्रॅम सरकीही मिळवितात. ही सरकी गायीला ढेप म्हणून खायला देतात. शेतातील संपूर्ण कापूस घरीच ठेवीत त्यापासून सूत, धागा बनविण्याचे काम अहोरात्र करतात. संपूर्ण विदर्भात कापूस उत्पादक शेतकर्यांंमध्ये भाव न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर असला, तरी महाजन यांच्या चेहर्यावर आनंद दिसला. ते म्हणतात,‘‘एक किलो कापूस मला २५० रुपये देतो, तर एक क्विंटल २५ हजार रुपये, केवळ मेहनत असते, ती सूत कताई, धागा बुनाई आणि कापड तयार करून आणण्याची.’’
बियाणे आणि खतेही घरचीच
गहू, ज्वारी, भुईमूग, सरकी, सोयाबीन, उडीद, मूग आदींचे बियाणेही ते घरीच बनवितात. उत्पादन काढल्यानंतर त्यामधून चांगल्या प्रतीचे दाणे बाहेर काढतात. त्यावर कुठल्याही प्रकारची रासायनिक क्रिया न करता तेच दाणे बियाणे म्हणून पेरतात. घरचे बियाणे वापरले म्हणून उत्पादन कमी आल्याचा अनुभव आजतागायत त्यांना आलेला नाही. त्याचप्रमाणे महाजन खतेही घरच्याघरीच तयार करतात. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला दुपारी गाईच्या शिंगामध्ये दुभत्या गावरान गाईचे शेण ठासून भरीत ही शिंगे तीन बाय तीन आकाराच्या खड्ड्यात गाडतात. खड्ड्यात आधी गाईचे शेण अंथरले जाऊन शिंगाच्या वर माती टाकली जाते. अशाप्रकारे ही शिंगे चैत्र पौर्णिमेपर्यंत गाडलेल्या अवस्थेत ठेवली जातात. त्यानंतर यामधील खत बाहेर काढून हे खत गरजेनुसार पाण्यात मिसळवितात. मिसळलेले खत पहिला पाऊस पडल्यानंतर शेताचे सपाटीकरण करून लागवड करण्याच्या ठिकाणी शिंपडतात. हा प्रयोग ते गत १५ ते २० वर्षांपासून करीत आहेत. हे खत ते प्रति एकर २५ ग्रॅमप्रमाणे वापरतात. त्यानंतर बंदिस्त टाकीत झटपट खतही ते बनवितात. त्यासाठी एक किलो गायीचे शेण, एक लिटर गोमूत्र, दोन लिटर पाणी आणि १० ग्रॅम गूळ यांचे मिश्रण करतात. हे मिश्रण एका बंदिस्त भांड्यामध्ये आठ दिवस ठेवून २० पट पाण्यात मिसळवितात. हे मिश्रण हातपंपामध्ये घेऊन पिकाच्या बुंध्याजवळ पिकावर पडणार नाही याची काळजी घेत शिंपडतात; तसेच पीक एक महिन्याचे झाल्यानंतर १० किलो गाईचे शेण, अर्धा किलो मध, गावरान गायीचे १ पाव शुद्ध तूप यांचे मिश्रण करीत त्यापासून ‘अमृतपाणी’ बनवितात. महाजन हा फंडा २० वर्षांपासून उपयोगात आणत आहेत. हे अमृतपाणी २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाला बुंध्याजवळ पाणी दिल्यास पीक जोमाने येते, असा त्यांचा अनुभव आहे.
माव्यावर घरगुती उपाय
पिकावर मावारोग आल्यास शेतकरी चिंताग्रस्त होऊन जातो. मात्र, महाजन यांच्या शेतात मावारोग आला, तरी त्यांना चिंता नसते. कारण यावर उपायही त्यांनी घरीच शोधून काढला आहे. लसूण पाकळी सोललेली ४०० ग्रॅम, २५० ग्रॅम तिखट मिरची या दोहोंचेही पेस्ट तयार करून एका खोलगट भांड्यात टाकतात. यामध्ये समपातळीपर्यंत रॉकेल टाकून ते रात्रभर ठेवत सकाळी वस्त्रगाळ करतात. या मिश्रणात कपडे धुण्याच्या साबणाचा चुरा टाकून जेणेकरून हे मिश्रण पिकावर चिकटून बसेल, याची काळजी घेतात. मिश्रण गरजेपुरत्या पाण्यात फवारल्यास मावारोग पार पळून जातो व तुडतुडे, पांढरी माशीही पिकावर येत नसल्याचे महाजन सांगतात.
श्रमाधिष्ठित जीवनशैली
महाजन यांनी वयाची ७४ वर्षे नुकतीच पार केली आहेत. मात्र, अजूनही एखाद्या तरुण शेतकर्याप्रमाणे त्यांची दिनचर्या असते. सकाळी पाच वाजता उठून दिवसाची सुरवात करणारे महाजन आजही जात्यावर दळतात. त्यानंतर शेतात गेल्यानंतर गायीचे शेण-पाणी करणे, दूध काढण्याचे काम करतात. नंतर प्राणायाम करतात. ‘संपूर्ण अन्न सेंद्रिय शेतीचे असल्यामुळे मला कधी थकवा येत नाही, उत्साह कमी होत नाही’ असे ते सांगतात. श्रमाधिष्ठित जीवनशैली हे महाजन यांच्या आयुष्याचे सूत्र आहे. *
संपर्क : रामभाऊ गोपाळ महाजन
दाताळा, ता. मलकापूर, जि. बुलडाणा