एमबीए तरुणाची यशस्वी रेशीमशेती

उच्चशिक्षित तरूणाच्या यशाची अनोखी कहाणी

एमबीए करत असतानाच योगेश डुकरे याने आपण नोकरी न करता व्यवसाय करायचा असे ठरवले होते. व्यवसाय शोधताना घरच्या शेतीला पूरक होईल, असाही या भूमिपुत्राने विचार केला. आणि व्यवस्थापन क्षेत्रात उच्चशिक्षण घेतलेल्या तरूणाने चकचकीत तारांकित ऑफिसमध्ये कुणाच्या तरी हाताखाली नोकरी करण्यापेक्षा गावाकडे जाऊन रेशीमशेती करण्याचा व्यवसाय निवडला.

एके काळी बेरोजगार असलेले अनेक तरुण आज लहान-मोठ्या उद्योग व्यवसायाचे मालक झाले आहेत. अनेक बेरोजगारांच्या हाताला त्यांनी कामही उपलब्ध करून दिले आहे. शून्यातून त्यांनी साध्य केलेली प्रगती इतर हाताश व निराश झालेल्या आणि जे काही तरी व्यवसाय व उद्योग करू इच्छित आहेत अशा सर्व होतकरू तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. असाच एक उच्चशिक्षित तरुण उद्योजक योगेश डुकरे याची यशोगाथा ही प्रेरणादायीच आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिवराई गावच्या योगेशने एम.बी.ए. मार्केटिंग क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले आहे. एम.बी.ए.चे शिक्षण घेत असतानाच त्याने नोकरी न करण्याचा निर्णय घेतलेला होता; पण चांगल्या व्यवसायाला शिक्षणाची जोड असणे गरजेचे आहे याची जाणीवही त्याला होतीच.

भविष्याचा वेध घेऊन शिक्षण घेत असतानाच योगेशने शेतीकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली होती. सुट्टीच्या दिवशी तो शेतात जाऊन आईकडून शेतीतील बारकावे समजून घेऊन अजून यामध्ये नवीन कोणती पिके घेता येतील याचा विचार करत असे. वडील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असल्यामुळे त्यांना शेतीकडे पूर्णपणे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्याच्या आई घरची नऊ एकर शेती कामगारांच्यामार्फत कसून घेत असत व सुट्टीच्या दिवशी योगेश व त्याचे संपूर्ण कुटुंब शेतात जाऊन खत पेरणी, खुरपणी, फवारणी अशी कामे कामगारांसमवेत करत असत. एवढे कष्ट करून देखील उत्पन्न मात्र नाममात्र मिळत होते, ही बाब लगेच योगेशच्या लक्षात आली होती. एकेदिवशी तो पैठणला मित्रांसह सहज फेरफटका मारण्यासाठी गेला असता त्याने एका मित्राची रेशीम शेती पाहिली. त्यानंतर योगेशला रेशीम शेतीबद्दल उत्सुकता निर्माण झाली. लगेच त्याने मित्राकडून रेशीम शेतीबद्दलची संपूर्ण माहिती घेतली.

त्यानंतर योगेशच्या असे लक्षात आले की आपण जेवढे कष्ट ऊस, कापूस इत्यादी पिके घेण्यासाठी करत आहोत त्यापेक्षा कमी श्रमात आणि कमी कालावधीत रेशीम शेती ही हमखास उत्पन्न देणारी आहे. इंटरनेटवरून रेशीम शेतीबद्दल संपूर्ण माहिती मिळवली माहिती घेत असताना योगेशच्या लक्षात आले की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतसुद्धा रेशीम शेतीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामुळे योगेशचा हा पक्का निर्णय झाला की आपण रेशीम शेती करायची.

पण…? पुढे एक प्रश्न उभा होता, तो म्हणजे वडील परवानगी देतील का आणि लोक म्हणतील, एमबीएपर्यंत उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळाली नाही म्हणून शेती करतोय. पण हे सगळे विचार झटकून योगेशने आपली इच्छा वडिलांना बोलून दाखवली. वडिलांनीही त्याला रेशीम शेती करण्याची परवानगी दिली.

परवानगी तर मिळाली पण त्यासाठी लागणार्‍या शेडसाठी व तुतीच्या झाडांसाठी पूर्ण भांडवल तयार होत नव्हते. यामुळे योगेशने एक पर्यायी व्यवस्था केली त्याने गुरे बांधायच्या गोठ्यात छोटेखानी शेड तयार केले. सुरुवातीला 38 गुंठ्यात तुतीची झाडे लावली व रेशीम शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या पाच ते सहा महिन्यांत उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. योगेशला 38 गुंठे शेतीमध्ये 45 हजार रुपये प्रति महिना एवढे उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. यामुळे रेशीम शेतीबद्दलचा त्याचा आत्मविश्वास वाढला. लागलीच योगेशने रेशीम शेतीचा विस्तार वाढवायचे ठरवले; पण त्यासाठी नवीन मोठ्या शेडची आवश्यकता होती, त्यासाठी पुरेसे भांडवल नव्हते. शेती तर वाढवायची होती, पण पैशाची जुळवाजुळव होत नव्हती. रेशीम शेती वाढवल्यानंतर मिळणार्‍या उत्पन्नाची योगेशला कल्पना होतीच. यामुळेच तर त्याने भांडवल मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली होती; पण आठ ते दहा लाख रुपयांचे भांडवल काही केल्या मिळत नव्हते.

एके दिवशी कामानिमित्त योगेश लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या वैजापूर शाखेत गेला असता त्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेविषयी माहिती मिळाली. आणि योगेशला आपला रेशीम व्यवसाय वाढवण्यासाठी आशेचा किरण मिळाला. योगेशने लगेच वेळ न दवडता जिल्हा समन्वयकांना भेटून महामंडळाला लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता केली आणि कर्जाचा प्रस्ताव तयार करून बँकेत सादर केला. अल्पावधीतच योगेशच्या कर्जाचा प्रस्ताव मंजूर होऊन योगेशला आठ लाख 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले.

या मिळालेल्या कर्जाच्या रकमेतून योगेशने तीन एकर शेतीमध्ये तुतीची झाडे लावली आहेत. तसेच रेशीम निर्मिती प्रक्रियेसाठी 72 बाय 23 चे शेड तयार केले आहे. आता योगेशच्या रेशीम शेती व्यवसायाची व्याप्ती वाढली आहे. त्याच्याकडे आता दोन कामगार कायमस्वरूपी कामाला असतात. काढणीच्या वेळी अजून पाच कामगारांना योगेश काम देतो आहे, त्यामुळे आता योगेशच्या रेशीम शेतीचा व्यवसाय भरभराटीस लागला आहे. आता त्याला खर्च वजा महिन्याकाठी 80 ते 90 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. हे सर्व शक्य झाले ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीमुळेच असे योगेश आवर्जून सांगतो.

सौजन्य : अण्णासाहेब पाटील आर्थिक़ मागास विकास महामंडळ