कृषिजीवन शेतकरी उत्पादक कंपनीची यशकथा

दिशादर्शक कृषिजीवन

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कृषिजीवन या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना 2014 साली झाली. जुन्नर तालुक्याची ओळख पारंपरिक भाजीपाल्याच्या लागवडीसाठी झाली असून त्याचाच लाभ घ्यायचा असे इथल्या शेतकर्‍यांनी ठरवले. स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात या शेतकरी उत्पादक कंपनीने कंपनीचे सभासद नसलेल्या शेतकर्‍यांना भाडेतत्वावर शेती औजारे देण्याचा व्यवसाय सुरू केला.

शेतीमाल उत्पादन, प्रक्रिया व या शेतकर्‍यांना काळाबरोबर बरीच सुधारणा केली आहे. कार्यक्षमता वाढवणे, खर्च कमी करणे, मजूर टंचाई, काढणीपश्चात नुकसान, बाजारपेठेची उपलब्धता यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला. कृषि अवजारांबरोबर कृषि उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कांदा व बटाट्याची बियाणे, नर्सरीसाठी टोमॅटो, मिरची, कोबी, वांगी, फ्लॉवर व मल्चिंग पेपर अशा निविष्ठांची विक्री सुरू केली.

लहरीवर तसेच इतर अडथळ्यांवर मात करत दर्जेदार शेतमाल पिकवणे सोपे नसते. कधी अवकाळी पाऊस, कधी मजुरांची टंचाई, तर कधी वाढत्या मजुरीला देण्याइतके पैसे नाहीत, या आणि अशा कितीतरी समस्या! याचा परिणाम काढणी व पेरणीवर होतो आणि शेवटी शेतकर्‍याच्या उत्पादन-उत्पन्नावर होतो. गेल्या काही वर्षांत पावसाचे ऋतुमानही बदलले आहे. वेळेवर पाऊस येणे, दिवाळी किंवा उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडणे, याला सामोरे जात असताना मोठ्या मेहनतीने कर्ज काढून पिकवलेला शेतमाल टिकवायचा कसा, हाही प्रश्न असतोच. शेतिक्षेत्रात आलेल्या अत्याधुनिक यंत्रांनी हे आणि असे अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटले.

जमिनीची मशागत, नांगरणी, पेरणी, काढणी या आणि अशा अनेक बाबी सहज आणि वेळेवर शक्य झाल्या. भाजीपाल्याच्या कागद आच्छादन, मल्चिंगचा वापर वाढला आहे, त्याचाही सकारात्मक परिणाम दिसतो आहे. अक्षरशः या यंत्रांनी ङ्गकृषिजीवनफ अधिक सुकर केले आहे. 2015 साली या कंपनीने ट्रॅक्टर, रोटावेटर, कल्टिवेटर, मल्चिंग पेपर आच्छादन मशीन घेतले आहे. ही यंत्रे 20 ते 30 टक्के सवलतीच्या दरात शेतकर्‍यांना भाडेतत्वावर दिली जातात. वेळेवर व व्यवस्थित काम झाल्याने उत्पादनावर त्यांचा चांगला परिणाम दिसतो आहे.

भाजीपाला हा नाशवंत शेतमाल आहे, त्यामुळे जलद कामे करणारी ही यंत्रे फायद्याचीच ठरत आहेत. पाचशे सदस्यसंख्या असलेल्या ङ्गकृषिजीवनफ शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये 25 स्वयंसहाय्यता गट व 20 सदस्यांचे छोटे गट आहेत. बारा संचालक तिचे काम सांभाळतात. या कंपनीचे काम पुणे जिल्ह्यापुरतेच मर्यादित नसून यवतमाळ बुलढाणा जिल्ह्यात ती कांद्याचे बीजोत्पादनही करत आहे. तसेच शेतकर्‍यांच्या शेतमालाची थेट विक्री ग्राहकांना करण्यासाठी ही कंपनी दोन विक्रीकेंद्रेही चालवत आहे. त्याचबरोबर डाळिंबे दुबईला पाठवून निर्यातीतही आपला शिक्का उमटवला आहे.

अपेडाद्वारे शेतकरी उत्पादक संस्थेची निर्यातदारांशी जोडणी करून निर्यातीला प्रोत्साहन दिले जात आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीअंतर्गत एकात्मिक कृषि विकास अंतर्गत या कृषि कंपनीला राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या माध्यमातून 60 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत साडेचार कोटी रुपयांपर्यंत उलाढाल करण्याचे तंत्र अवगत करून इतर कृषि उत्पादक कंपन्यांसमोर कृषिजीवनने आदर्श निर्माण केला आहे.

(सौजन्य : अपाम )

छायाचित्र प्रतीकात्मक