मी प्रमोद गुणधर पाटील. कृष्णा नदीच्या काठावरील सांगली जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले अंकली हे माझे गाव. नदीकाठावर वसलेले गाव असल्यामुळे बहुतांशी शेती ऊस पिकाचीच. या गावात माझी अडीच एकर (100 गुंठे) शेती आहे. या अडीच एकर शेतीमध्ये उसाचे पीक घेतलं. सालाबादप्रमाणे सन 2019 मध्येही मी ऊसाची लागण केली होती. उसाचे पीकही जोमाने आले होते.
ऊस पिकासाठी खते, मेहनत व मजुरांचा रोजगार देण्यासाठी अंकली विकास सहकारी सोसायटी, अंकली यांच्याकडून 1 लाख रुपयांचे पीक कर्ज मी घेतले होते. पावसाळा सुरु झाला होता. कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम असणाऱ्या भागाजवळ शेती असल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढत होती. मनात पुराबाबत धास्ती होतीच. त्यातच अतिवृष्टी झाली. सांगली शहरासह आजूबाजूच्या परिसराला पुराचा वेढा पडला. माझ्या शेतात पाण्याची पातळी इतकी होती की, शेतातला ऊस दिसतच नव्हता. जवळपास 3 आठवडे माझ्या शेतात पाणी होते. त्यामुळे ऊस पीक पूर्णपणे कुजून गेलं.
या अस्मानी संकटासमोर काय करायचे ? असा प्रश्न पडला होता. याच वेळी महापूर व अतिवृष्टीमुळं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने पीक कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यानुसार पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु झाली. माझ्याही शेतावर शासकीय यंत्रणांनी पंचनामा केला. शासनानं नुकसान भरपाई म्हणून 99 हजार रुपये इतके पीक कर्ज माफ केलं. शासनाची 1 लाखाची कर्जमाफी मला लाख मोलाची ठरली. अंकली विकास सहकारी सोसायटी, अंकली येथील माझ्या नावासमोर कर्जमुक्तीचा शेरा पडला.
अतिवृष्टी आणि महापुरासारख्या अस्मानी संकटामुळं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाची ही मदत फार मोलाची ठरली. याबद्दल मी शासनाचा व माझ्या सोसायटीचा मन:पूर्वक आभारी आहे.