संकटातही बळीराजाची दिलदारी

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील रानसई फार्म. आंबा बागायतदाराचे नाव असीब शहाबाजकर.  आंब्याचे चांगले उत्पादन होऊनही काेरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने भलतचं संकट उभे राहिले.  यावर मात करण्यासाठी कृषी अधिकारी क्रांती चौधरी-मोरे यांनी एक शक्कल लढवली.  त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला, या ग्रुपचे नामकरण झाले “डायरेक्ट फ्रूट सप्लाय”.

या ग्रुप मध्ये त्यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्राहक यांचा समावेश करून घेतला आणि मग सुरू झाला आंब्याचा ऑनलाइन व्हॉट्सअप ग्रुप द्वारे व्यवसाय.  या ग्रुपवरच मागणी नोंदविली जाते.  मागणीप्रमाणे वाशी, नवी मुंबई ,खारघर, बेलापूर, पनवेल या भागातील विविध हाऊसिंग सोसायट्यांमध्ये असलेल्या ग्राहकांपर्यंत आंब्याच्या पेट्या पोहोचविल्या जातात. आंबे पोहोचविताना सोशल डिस्टंन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटायजर चा वापर हे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात.

हे आंबे जसे आंबा बागायतदार असीब शहाबाजकर यांनी विक्रीस दिले, तसेच पाली येथील शेतकरी श्री. परांजपे यांनी 100 डझन आणि उरण येथील शेतकरी घनश्याम धर्मा पाटील यांनी 110 डझन आंबे या व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून विक्रीसाठी दिले. आतापर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 5 हजार डझनापेक्षा जास्त आंबे विकण्यात आले आहेत.

सुरुवातीला काही डझन आंबे विकल्यानंतर या ग्रूपमधील डॉ.सतिश मोरे आणि अमोल मार्कंडे या सदस्यांनी सूचना केली की, आपण केलेल्या विक्रीतून एका डझनामागे फक्त दहा रुपये असे जमा करुन करोनाच्या या संकटात शासनाला मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला देवू या. या कल्पनेचा अधिक विस्तार झाला आणि या ग्रुपने आतापर्यंत झालेल्या आंबे विक्री झाल्यानंतर पहिले दहा हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी, नऊ हजार दोनशे रुपये जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे जिल्हा कृषी अधिकारी श्री. पांडुरंग शेळके, श्री. विजयकुमार साळवे यांच्या हस्ते सुपूर्द केले. याचबरोबर बेलापूर महानगरपालिकेला औषधे-गोळ्या घेण्यासाठी दहा हजार रुपये, गरिबांना अन्न वाटप करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला दहा हजार रुपये तर उरणमधील आदिवासींना बियाणे खरेदी करून देण्यासाठी मदत म्हणून पाच हजार रुपये दिले आहेत.

याच प्रकारे दुसरा आणखी एक व्हॉटस्अप ग्रुप तयार करण्यात आला. त्याचे नामकरण झाले “व्हेजिटेबल सप्लाय” ग्रुप. उरणमधील कंठवली आणि विंधने या गावातील बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू आणि शेतकऱ्यांचा भाजीपाला यांच्या विक्रीसाठी एकत्रित काम सुरू झाले.  साधारण दहा-बारा एप्रिल दरम्यान हा ग्रुप स्थापन करण्यात आला.  या भाजीपाला ग्रुपबरोबरच कृषी विभागाच्या आत्मा’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या महिला बचतगटांनाही समाविष्ट करून घेण्यात आले.  या महिला बचतगटांनी तयार केलेल्या कुरड‌्या, पापड्या, मसाले यांचीही विक्री या “व्हेजिटेबल सप्लाय” व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून सुरू करण्यात आली.  वाशी, नवी मुंबई, खारघर, बेलापूर, पनवेल या भागातील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये कुरडया, पापड्या, अंडी, मसाले, तुळशीचा पाला यासह वांगी, माठ, पालक, फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, सिमला मिरची, मेथी अशा प्रकारच्या भाज्या विक्री होऊ लागल्या. सध्या रोज जवळपास 200 किलो 300 किलो भाजीपाला विक्री होत आहे.

हा भाजीपाला, आंबे पोहोचविण्यासाठी याच भागातील स्थानिक आदिवासींना उत्पन्न मिळावे यासाठी त्यांचाच टेम्पो भाड्याने घेण्यात आला आहे.

काेरोनाच्या संकटात सर्व जग सापडले आहे. मात्र आपल्या सर्वांचा अन्नदाता शेतकरी उपाशी मरू नये यासाठी मनापासून काम करणाऱ्या कृषी अधिकारी क्रांती चौधरी-मोरे यांनी दाखविलेली कल्पकता, उत्तम असे मनुष्यबळ व्यवस्थापन, सोशल मीडियाचा अचूक वापर, उत्तम जनसंपर्क निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्यासह त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या, मार्गदर्शन देणाऱ्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी अर्चना नारनवर, विजयकुमार साळवे, क्रांती चौधरी-मोरे यांचे पती डॉ.सतिश मोरे आणि हा भाजीपाला, आंबे छोट्या टेम्पोने पोहोचविण्याचे काम करणारे तरुण शेतकरी सचिन खाणे, पुनित राठोड, राज मेहेकर आणि विविध हाऊसिंग सोसायट्यांमधील श्रीमती क्रांती चौधरी-मोरे यांच्या ग्राहक मैत्रिणी या सर्वांचे मिळालेले सहकार्य समाजाला प्रेरणादायक असेच आहे.

विशेष म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतरही हा उपक्रम असाच पुढे सुरु राहील, असा संकल्प या दोन्ही ग्रुपच्या सदस्यांनी केला आहे.

(मनोज शिवाजी सानप)

जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग