सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणारी जितूभाईंची सेंद्रिय शेती

सकस, दर्जेदार अन्न शेतीतून पिकविण्याच्या दृष्टीने सायने (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील थोर गोसेविका स्व. जमनाबेन कुटमुटिया यांचे सुपुत्र जितेंद्रभाई कुटुमुटिया यांनी आपली जमीन सेंद्रिय कर्ब, लाभदायक जिवाणू व सुपीक घटक यांनी श्रीमंत केली आहे. त्यांचा “निसर्गप्रेम’ फार्म म्हणजे सेंद्रिय शेतीची खुली प्रयोगशाळाच झाली आहे. साधारणपणे २०१० पासून सुरु झालेल्या या त्यांच्या प्रयोगाला आता चांगले स्वरुप प्राप्त झालेले आहे. सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या जितेंद्र कुटमुटिया यांच्या प्रेरणादायी यशस्वी सेंद्रीय शेतीच्या प्रयोगाबाबत..

मालेगाव ते धुळे रस्त्याने मालेगावपासून दहा किलोमीटरवर रिलायन्स पेट्रोलपंपालगत “निसर्गप्रेम फार्म’ निर्माण केला आहे. स्थानिक लाकडांचा वापर असलेल्या प्रवेशद्वारातून शेताच्या मधोमध जाईपर्यंत दुतर्फा ग्लिरिसिडिया, फळझाडांच्या रांगांनी उन्हाळ्यातही गारव्याचा अनुभव येतो. शेवगा, आंबा, लिंबू, पपई, नीम, पिंपळ, चेरी आदी सात हजारांहून अधिक डेरेदार वृक्षराई बहरली आहे … इथे भर दुपारीही त्यावर पाखरांचा किलबिलाट मन वेधून घेते. गायींचे शास्त्रशुद्ध गोठे, जवळच काम करणाऱ्या सहकाऱ्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण निवासखोल्या आहेत… (आपल्या जैन कंपनीच्या विचारसरणीप्रमाणे, जितेंद्र कुटमुटिया हे देखील ते काम करणाऱ्यांना मजूर, सालदार आणि गायी राखणाऱ्यांना “सहकारी’’ म्हणतात.) निसर्गाच्या सहवासात परस्परांशी अनोखे सहजीवन निर्माण झालेले आहे. जितेंद्र कुटुमुटिया यांनी आपली 19 एकरची ही शेती “निसर्गप्रेम फार्म’ म्हणून विकसित केली आहे.

जितेंद्रभाई यांचे “शीतल ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड” सेंटर मालेगाव कॅम्पला आहे. त्यांची पुढची पिढी पुतण्या चेतन याच्याहाती हा व्यवसाय त्यांनी सुपूर्त केला. आपला संपूर्ण वेळ ते शेतीमध्ये घालविण्यासाठी कटिबद्ध झाले. आधुनिक पद्धतीने, कमी पाण्याच्या सेंद्रीय शेतीचे प्रयोग ते आपल्या शेतीत करीत आहेत. निसर्ग त्याचे काम चोखपणे करतो त्यात आपण ढवळाढवळ करू नये हा साधा सोपा विचार करून त्यांनी ही शेती करायला घेतली.  हा प्रयोग सुरु करण्यापूर्वी कुटमुटिया यांनी संपूर्ण १ वर्षे भारतातील कानाकोपऱ्यात जाऊन सेंद्रीय शेतीचा अभ्यास केला. त्यानंतर दीड एकरावर एक वर्षे त्यांनी प्रयोग केला आणि या यशानंतर त्यांनी थेट १९ एकरांवर २०१० ला प्रयोग सुरु केला. सेंद्रिय शेतीचे जितेंद्र कुटमुटिया यांचे हे सहावेच वर्षं. सेंद्रिय शेतीत त्यांनी कसे झोकून दिले याची पार्श्‍वभूमी म्हणजे त्यांनी अभ्यासले, की वस्तुसंग्रहालयात शिवकालीन योद्‌ध्याच्या अंगाखांद्यावर 50 ते 60 किलोचे चिलखत, ढाल, तलवार, टोप आदी जामानिमा असायचा. हे १२१ किलोचे वजन पेलण्याची प्रचंड शारीरिक क्षमता काळाच्या ओघात कशी कमी होत गेली असावी या प्रश्नाने कुटुमुटिया यांना अस्वस्थ केले. अभ्यासाअंती लक्षात आले, की याचे उत्तर निकस आहार… पोषक द्रव्ये मानवी आहारात मिळतच नाहीत. लोकांना विविध शारीरिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. शेतीत रसायनांचा बेसुमार वापर झाल्याने मातीची सुपीकता घटली आहे. सर्व विचार करता सेंद्रिय, सकस अन्नाची गरज पुढे आली आहे, त्या हेतूनेच आपण सेंद्रिय शेतीकडे वळल्याचे कुटमुटिया म्हणतात.

जितेंद्र कुटमुटिया यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

शेताबाहेरून निविष्ठा न आणता आपल्याच शेतीतील स्रोतांचा पिकांसाठी वापर

  • किडी शेतात येणारच; पण त्यांची हानी करण्याची पातळी ओळखून त्याप्रमाणे पुढील नियोजन
  • पक्ष्यांसाठी सात हजारांपर्यंत लहान-मोठ्या झाडांचा सांभाळ
  • पंचगव्याचा वापर केला जात नाही. मात्र शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात त्याबाबत जितेंद्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.
  • एक गाय- एक एकर हे समीकरण- म्हणजे एका गायीद्वारा एका एकरातील सेंद्रिय निविष्ठा पुरवल्या जाऊ शकतात.
  • एका एकरातील चारा तिला पुरेसा होतो. जितेंद्र यांनी सात देशी गायी घेतल्या, त्यापासून आता 25 गायींचा परिवार वाढला आहे. ते म्हणतात, की देशी गाईच्या एक ग्रॅम शेणात 33 कोटी जिवाणू आहेत, असे मी अभ्यासले आहे, त्यामुळे गाईत 33 कोटी देव आहेत अशी भावना रूढ झाली असावी.
  • कडधान्य व द्वीदल धान्याची आंतरपिके वाढवली

जैविक आच्छादन

जमिनीत तयार झालेले तण ते तसेच राहू देतात. तण देई धन असा आपला नारा आहे. शासन मात्र तण खाई धन असे वाक्य प्रसिद्ध करतात परंतु तण, पालापोचोळा मातीचे वस्त्र आहे. पिकांचे अवशेष, पालापाचोळा, गाजरगवत, तराटा आदी तणांचे जैविक मल्चिंग केले जाते, त्यामुळे झाडांच्या मुळाजवळ कायम वाफसा स्थिती असते. याच वातावरणात गांडुळांची संख्या वाढते. मातीचा सेंद्रिय कर्ब उंचावतो. भारताचा सरासरी कर्ब ०.६ आहे १ कर्ब असेल तर ती जमीन शेतीयोग्य म्हटली जाते आणि सांगण्यास आनंद वाटतो की, आमच्या शेतीचा कर्ब २.५ कर्ब आहे. म्हणजे ५ पटीने आमच्या शेतीत कर्ब अधिक आहे.

सुपिकतेसाठी ‘अमृतजल’

जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी जमिनीची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असते असे जितूभाई मानतात. सेंद्रिय कर्ब प्रमाणात वृद्धी होण्यासाठी शेतकऱ्यांनी काही सोप्या गोष्टी, काही प्रयोग केले तर खूप चांगला फायदा होतो. अमृतजल हा एक सर्वसामान्य शेतकऱ्यांना करता येण्यासारखा उत्तम प्रयोग आहे. अमृतजल कसे बनवायचे याबाबत ते सांगतात की, प्रथम 10 लिटर पाण्यामध्ये 1 किलो गाईचे शेण घ्या, त्यात 1 लिटर गोमुत्र आणि 50 ग्रॅम गुळ मिसळा. तयार झालेले हे द्रावण घड्याच्या काट्यांच्या दिशेने 12  वेळा गोल ढवळा, पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 12 वेळा असे दिवसातून तीन वेळा ढवळा. तीन दिवसांनी या द्रावणात 100 लिटर पाणी मिसळून ते द्रावण झाडांना द्यावे.

उत्पादन

  • लिंबू, आंबा, शेवगा ही तीन मुख्य पिके. त्यात हळद, मूग, कांदा आदी आंतरपिके घेतली आहेत. लिंबाचे प्रति झाड 500 लिंबू (एकूण झाडे एक हजार) या प्रमाणात उत्पादन मिळाले आहे. त्याचे सेंद्रिय लोणचे किलोला १६० रुपये दराने विकले आहे. निसर्ग प्रेम फार्म प्रॉडक्ट या ब्रॅण्डने हे उत्पादन विकले जाते. यावर्षी २००० किलो लिंबू त्यांच्या शेतात आली. पैकी १५५० किलोचे लोणचे तयार केले गेले. या त्यांच्या लोणच्याला देखील चांगली बाजारपेठ त्यांनी मिळविलेली आहे. सात्विक, शुद्ध सेंद्रीय पद्धतीने बनलेले हे लोणचे ग्राहक आवर्जून विकत घेतात. त्यांचे अजून एक वैशिष्ट्य असेही आहे की, झाडावरचे लिंबू ते तोडत नाहीत. झाडावरच परिपक्व झाल्यावर ते गळतात व तेच लिंबू गोळा केले जातात.
  • शेवगाची एकूण चार हजार झाडे –  आहेत.  शेंगा न काढता त्याचा पाला काढतात. त्याला वाळवून शेतातच यंत्राच्या सहाय्याने पावडर तयार केली जाते. ही पावडर ६०० रुपये किलो या दराने विकली जाते. शेवग्याच्या पाल्यात पोषणमूल्ये अधिक आहेत. शेवगा बी अडीच हजार रुपये या दराने ते विकतात. या फार्ममधून गेल्या वर्षी १ टन आंबा निघाला. गेल्या वर्षी गारपीट व वारावादळाचा सामना करावा लागला तरी इतका आंबा निघाला हे विशेष म्हणावे लागेल. आता यावर्षी आंब्याला चांगला मोहोर येण्यास सुरवात झाली आहे.
  • दुधीभोपळा चार-पाच किलो वजनाचा मिळाला होता. त्याची लांबी तीन फुटांपर्यंत होती. तीन फूट लांब असलेला भोपळा म्हणजे आश्चर्यच म्हणावे लागेल.

10 गुंठे क्षेत्रातून सेंद्रिय उत्पादनाचे मॉडेल

प्रयोग परिवाराचे संस्थापक प्र. अ. दाभोळकर यांची ही संकल्पना जितेंद्र यांनी प्रत्यक्षात आणली. कुटुंबाला लागणाऱ्या अन्नाची गरज तेवढ्या क्षेत्रातून भागू शकेल असा त्यामागे उद्देश आहे. यातून मिळणाऱ्या उत्पादनाचे पोषणमूल्य (न्युट्रीशनल व्हॅल्यू) उत्तम असते असे जितेंद्र कुटमुटिया म्हणाले. १० गुंठ्यामध्ये साडेसहा टन पपईचे उत्पादन घेतले. एक वर्षात सुमारे १ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले. पपईमध्ये वांगी, टोमॅटो आणि मिरची तसेच ५० केळीचे झाडं देखील लावली होती.
या पद्धतीत 10 गुंठ्यांत 180 बेड तयार केले जातात. 10 फूट लांब, तीन फूट रुंद व एक फूट उंच असा बेड असतो. माती, जैविक वस्तुमान व अमृतजल यांचा वापर त्यात होतो. एक फुटापर्यंत उंचीचा हा थर होतो. सहा विविध रसांचे बियाणे (तिखट, आंबट, गोड, तुरट, खारट इ.) बेडवर घेतले जाते. विविध पिके त्यात घेता येतात.

दुधीभोपळा, भाजीपाला, कांदा, कडीपत्ता, गवती चहा, कडधान्ये यांचेही ते उत्पादन घेत आहेत. यात दररोज दोन हजार लिटर पाण्याची गरज भासते. या शेती पद्धतीतून घराची गरज भागवून वार्षिक अतिरिक्त उत्पन्नही मिळते. हा प्रयोग बघण्यासाठी भारतभरातून तसेच ४० ते ५० देशातील अभ्यासक भेट देऊन गेले. विशेषतः इस्त्राईली अभ्यासकांना हे मॉडेल विशेष महत्त्वपूर्ण वाटते.

-किशोर कुळकर्णी