शेतात अपार कष्ट करून पीक घेतल्यावर कष्ट आणि खर्च यांचा मोबदला म्हणून अश्रूंशीच गाठ पडते तेव्हा शेतकरी हतबल होतो. हे का घडतं? शेतकरी आणि ग्राहक यांच्यातल्या मधल्या फळीमुळं आणि रसायनयुक्त कृषितंत्रामुळं हे घडतं. हे निफाड तालुक्यातील कोळगावमधल्या नीलेश तासकर या युवा शेतकऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यानं आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं ठरवलं. आज नीलेशची डाळिंबं बिग बास्केट आणि रिलायन्स फ्रेश मॉलमध्ये थेट विक्रीसाठी जातात. या थेट विक्रीतंत्राचा लाभ नीलेशला होतो आहे.
माझं शिक्षण वाणिज्य क्षेत्रात झालंय. एम.कॉम. झाल्यानंतर नाशिकमध्ये एका वित्तीय संस्थेत नोकरीही केली. त्यावेळी मिळणारा पगार परवडत नव्हता. विचार केला, हे पैसे आपण गावाकडच्या शेतीत सोनं पिकवूनही मिळवू शकतो. मग आपण दुसऱ्याची चाकरी का करायची? मी स्वाभिमानानं जगायचं ठरवलं. गावाकडं गेलो; वडिलांना निर्णय सांगितल्यावर त्यांनाही आनंदच झाला. कारण स्वाभिमानाचं जगणं हे शेतकरी कुटुंबाच्या जीवनशैलीचा एक भाग असतो.
आधुनिक पद्धतीनं शेती
सहा एकर शेतीवरच आमचं घर आहे. चार-पाच गायींचा सुसज्ज गोठा आहे. पारंपरिक शेतीत वडील सोयाबीन, कांदा, ऊस ही पिकं घेत. माझ्या मामांची डाळिंबाची बाग आहे, तिचं व्यवस्थापन पाहत असे. ते नैसर्गिक शेतीही करतात. आधुनिक पद्धतीनं शेती करायची ठरवल्यावर मामांकडं डाळिंब बागेचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. शेणखत वापरून शेती करायचं ठरवलं.
चार एकरवर डाळिंबाची लागवड करून त्यातील एका एकरवर रासायनिक खत आणि तीन एकरांवर सेंद्रिय खत वापरून शेतीचा प्रयोग केला. त्यावेळी लक्षात आलं, की रासायनिक खतं दिलेल्या बागेतल्या डाळिंबांवर तेल्या रोगानं आक्रमण केलं होतं; पण सेंद्रिय बागेतली डाळिंबं टवटवीत होतीच, त्यांची चवही अवीट होती. उत्पादनही भरघोस होतं. दर्जा आणि उत्पादन उत्तम राखायचं तर पुन्हा सेंद्रिय शेतीकडं सर्वांनी वळावं असा विचार आला. उरलेल्या क्षेत्रात ऊस व दुधी भोपळ्याची लागवड केली. दुधी भोपळ्याचं १३०० कॅरेट उत्पादन आलं.
टिश्यू कल्चरची रोपं
दोन वर्षांपासून वेगवेगळे प्रयोग करतोय; या कामासाठी मी खूप माहिती घेतली, पुस्तकं वाचली, सटाण्याचे रामदास पाटील व सांगली येथील अरविंद माळी यांच्याकडे राहून त्यांच्या बागा, लागवडीपासून काढणीपर्यंतचं तंत्र समजावून घेतलं. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची यंत्रणा उभी केली. २५ ते ३० हजार रुपये इतका खर्च आला. टिश्यू कल्चरची रोपं वापरल्यानं १० हजार रुपये खर्च आला. चार ट्रॉली भरून शेणखत दिलं. एका ट्रॉलीला ४ हजार रुपयांपर्यंत खर्च असतो.
सेंद्रिय पद्धतीने लागवड करताना शेतीची चांगली मशागत करून योग्य प्रकारे बागेची आखणी करून घेतली. त्यानंतर ठिबकद्वारे योग्य पाणी नियोजन करून डाळिंबाची लागवड केली. त्यानंतर झाडाला योग्य प्रमाणात शेणखत, मळी, निंबोणी पेंड अशी खतं घातली. त्यानंतर झाडांच्या मुळाला बुरशी, निमोटेड, मररोग असे रोग येऊ नयेत म्हणून ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, बसिलेस अशा औषधांची झाडांना ड्रिचींग केली.
झाडांच्या वाढीसाठी अनेक प्रकारच्या स्लरी दिल्या. त्यामध्ये गूळ, डाळीचं पीठ, गोमूत्र, सोयाबीन अशा स्लरी देत गेलो. १६ महिन्यांनी पहिला डाळिंबाचा बहर भरला. त्यावेळी सुरुवातीला शेणखत एकरी ४ ट्रॅक्टर, उसाची मळी, स्फुरद, पलाश हे क्सि करून झाडाला घातले. पाण्याचं योग्य नियोजन केलं. डाळिंब फळावरही अनेक रोग येत असतात. उदा. फळावर काळे डाग येणे, तेल्या रोग यासाठीही प्रतिबंधक उपाय योजले.
.‘सत्य उद्योगाने रोग लया जाती,
प्रकृति होती बळकट’
या महात्मा फुले यांच्या तत्वज्ञानाचा वापर सर्वांनीच करण्याची वेळ आलीय, विषमुक्त शेती करून चांगल्या प्रतीचं अन्नधान्य पिकवण्याची वेळ आलीय, असं मला वाटतं. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी कृषि – औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. ते स्वतः प्रगतिशील शेतकरी होते.
उत्पादनखर्च भरून येईल आणि शेतकऱ्याला किमान १५ ते २० टक्के आर्थिक लाभ होईल, अशा पद्धतीच्या शेतीसाठी उत्तम सिंचन आणि विक्रीव्यवस्था हवी, असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. आम्ही शेतकरी कुटुंबातले तरूण या विचारांचा अभ्यास करून आता चांगल्या प्रकारची शेती करण्याचा प्रयत्न करत आहोत, रसायनविरहित शेतीचे प्रयोग करत आहोत. त्याचबरोबर शेती हा व्यवसाय असून शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.
केवळ दोन वर्षांचा अनुभव गाठीशी असला तरी खूप काही शिकलोय. इतर प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मानानं वयानं आणि अनुभवानं लहान असलो तरी आता जबाबदारीची जाणीव झालीय. वाणिज्य क्षेत्रातलं शिक्षण घेतलं असल्यानं पीकविमा आणि थेट विक्री या दोन गोष्टींचं महत्व आधीच समजलंय.
या शिदोरीवर मी ‘समृद्ध डाळिंब बागायतदार’ हा ग्रुप तयार केलाय. ग्रुपवरून मी डाळिंब लागवडीची मोफत माहिती देतो आहे. आपली माती, जमीन, पाण्याचे स्त्रोत निर्मळ करत असतानाच ग्राहकांच्या आरोग्याचाही विचार करतोय. आमचा तरूण शेतकऱ्यांचा असा सकारात्मक विचारसरणीचा मोठा समूह तयार झाल्यास नक्कीच भविष्यात चांगला परिणाम पाहायला मिळेल. तो दिवस लांब नाही, असं वाटतं. फक्त गरज आहे ती शेतकऱ्यानं सजग होण्याची!
चार गोष्टी युक्तिच्या
चार नळ्यांनी ठिबक दिल्यानं पाणी सगळीकडं व्यवस्थित मुरत असल्याचा अनुभव आहे. पूर्ण तयारीनिशी डाळिंब बाग उभी केल्याचा फायदा झाला. लागवडीनंतर सात महिन्यांनी एका एकरात ५५० कॅरेट इतकं उत्पादन आलं. एके दिवशी बिग बास्केट मॉलचे अधिकारी माझी बाग पाहायला आले. त्यांनी ‘असा चांगला प्लॉट मी पाहिला नाही, हा माल माझ्याकडं उद्यापासून विक्रीसाठी पाठवा’ असं सांगितलं. खरं तर काळपुटी मातीत डाळिंब येत नाही, असा गैरसमज होता; पण माझा अनुभव वेगळा आहे. उन्हाळ्यात योग्य पाणी भरल्याखेरीज डाळिंबाला फुगवण येत नाही, असंही पाण्याचं गणित आहे. बिग बास्केटबरोबरच बिग बझार आणि रिलायन्स फ्रेश मॉलमध्येही माझा शेतमाल थेट विक्रीसाठी जातो. विक्रीसाठी दलाल किंवा मध्यस्थ टाळण्याचा मी प्रयत्न केला. हा सर्व माल मॉलच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातोय.
(-शिल्पा दातार)
(निवेदन : ही यशकथा कोरोना लॉक डाऊन काळाच्या काही महिने आधी लिहिण्यात आलेली आहे.)