Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

यशोगाथा आवळा शेतीतून साधली प्रगती

देशात सर्वत्र महिला सशक्तीकरणा संदर्भात विविध कार्यक्रम, आयोग, व इतर बाबींच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, यामधून अनेक महिला शेतकरी पुढे येत आहेत व यशस्वी ठरत आहेत. मनात जिद्द व चिकाटी असली कि परिश्रमाच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट साध्य करता येते याचे जिवंत उदाहरण म्हणजे सौ. हर्षना दुर्गाप्रसाद वाहणे यांनी आपल्या कल्पनेला आकार देत आवळ्याची शेती करून त्यातूनच वेगवेगळे तब्बल १० प्रकारचे पदार्थ तयार केले आहेत. त्या उत्पादनातून महिनावारी एक ते दीड लाखापर्यतचा शुद्ध नफा कमावून शेतीला पूरक जोडधंदाचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले आहे.

आवळा शेतीचा निश्चय

तुमसर तालुक्याच्या उत्तरेस झझारीया पिपरा हे कमी लोकवस्तीच गाव वसलं आहे. त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या उपजीविकेचे माध्यम फक्त शेती हाच एक व्यवसाय आहे. त्याच गावात सौ. हर्षना दुर्गाप्रसाद वाहणे यांची २० एकर पडित शेतजमीन आहे. त्याच शेतात आपल्या कल्पनेला दिशा देऊन सौ. हर्षना दुर्गाप्रसाद वाहणे यांनी आवळ्याची शेती करण्यास सुरुवात केली. पिपरा येथील पडित शेतजमिनीतून सुरुवातीला भाताची शेती करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. मात्र सिंचनाचा अभाव व पर्जन्यमान अतिशय कमी असल्याने भाताची शेती फायद्याची ठरली नाही. हर्षना वाहने या गृहिणी व पती दुर्गाप्रसाद हे कृषि अधिकारी असल्यामुळे शेतीकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यात गृहिणी असलेल्या हर्षना यांना निरनिराळे खाद्यपदार्थ तयार करण्याची आवड व प्राथमिकतेवर तयार केलेले ते पदार्थ घराशेजारील परिसरात विक्री करणे, त्यातून पडित शेतजमिनीतून शेती व्यवसायाला जोडधंदाची कल्पना डोक्यात आली.

आवळ्याची लागवड
एकून जमिनीपैकी १५ एकर पडित शेतात हर्षना यांनी आवळ्याची शेती करण्याच ठरविले. रामटेक जिल्हा.नागपूर येथील शासकीय हिवरा नर्सरीतून नरेंद्र व आनंद प्रजातीचे रोप मागवून २००७ साली आवळ्याची बाग तयार केली. त्यात नरेंद्र प्रजातीच्या ५,६,७,१० व आनंद प्रजातीच्या १ व 2 या प्रकारच्या आवळ्याची लागवड केली. लागवड १५ फुट अंतरावर केली.

सहा वर्षांनी उत्पादन
लागवडीच्या तब्बल सहा वर्षांनी आवळ्याची प्रथम उत्पादनाची तोडणी केली. या कालावधीदरम्यान त्यांनी आवळ्यात आंतरपीक म्हणून पपई पिकाची लागवड केली. पपई व्यापाऱ्यांना विक्री करतांना त्यांना प्रती किलो 8 ते ९ रुपये भाव मिळाला परंतु बाजारामध्ये तीच पपई प्रती किलो ४० ते ५० रुपये बाजार भावाने विक्री व्यापारी करीत होते, ते बघून त्यांना आवळ्याच्या बाजार भाव ची चिंता वाटली, यावर आवळ्यावरती प्रक्रिया करून पदार्थ तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली.

धनाचल फर्म ची सुरुवात
जीवनसत्वाचे गुणधर्म असलेल्या आवळ्याला ठोक बाजारात भाव नसल्याने त्यावर प्रक्रिया करून पदार्थ तयार करण्याच्या कल्पनेला त्यांनी आकारास आणले. त्यापासून स्वता वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचा निश्चय त्यांनी केला. हि कल्पना त्यांनी आपल्या पतीला बोलून दाखवली, त्यांचे पती हे कृषि विभागात नौकरीला होते, त्यांना हि कल्पना आवडली व पत्नीच्या कल्पनाशक्ती व जिद्दीला पाठबळ देऊन त्यांनी शेतातच छोटे फार्म तयार करण्याचे ठरविले. त्यांच्या परिवारातील दोन मुली धनश्री व आचल यांच्या नावातून जोडशब्द तयार करून धनाचल नाव उत्पादक कंपनीला त्यांनी दिले. तसेच आवळ्याच्या उद्योगातून तयार केलेल्या प्रत्येक पदार्थाचे नाव दोन्ही मुलींच्या नावातील सब्दाना जोडून तयार केल आहे.

फळप्रक्रिया बाबत प्रशिक्षण
बहुगुणी आवळ्याला बाजारात भाव नसल्याने आपल्याच शेतात प्रोसेसिंग प्लान्ट तयार करून आरोग्याला लाभदायी पदार्थ तयार करण्याची सुरुवात करण्याचे ठरविले. पत्नीच्या जीद्धीला खंबीर साथ म्हणून राहुरी येथील महात्मा फुले कृषि विदयापीठ, येथे फळे व भाजीपाला प्रक्रिया बाबत प्रशिक्षण करिता पाठविले. फळावरील प्रक्रियेच्या एक महिन्याच्या प्रशिक्षणातून हर्षना यांच्या आत्मविश्वासाला पतीची साथ मिळाली.

विविध प्रक्रिया पदार्थ
प्रशिक्षणाचा अनुभव व त्यावर कुटीर उद्योग विभागातून आर्थिक सहाय्यच्या मदतीने हर्षना यांनी स्वताच्या फर्ममधून १० प्रकारचे पदार्थ तयार करून बाजारपेठेत आवळ्याचे लाडू, अचार, मुरंबा, स्वीट कॅन्डी, मसाला कॅन्डी, आवळा पावडर, आवळा पाचक सुपारी, आवळा रस, मुखशुद्धी, व सरबत अशी दहा उत्पादने तयार करून, विक्रीकरिता पाठवली जात आहेत. आवळ्याचे आरोग्यदायी लाभ व त्याचे गुणधर्म, यांचा सखोल अभ्यास करून हर्षना यांनी आपल्या उत्पादनांना ख्याती प्राप्त करून दाखवली आहे. व्यवसाय शहरातूनच नाही तर ग्रामीण भागातूनही करता येतो हे त्यांनी दाखवून दिले  आहे.

बांधकाम, यंत्रे व त्याकरिता आर्थिक मदत
आवळ्याच्या प्रक्रिया उद्योगाला खादी ग्रामोद्योग मंडळ, भंडारा यांच्या माध्यमातून बँक कडून २५ लाखाचे लोन त्यांना मिळाले यामध्ये १३ लाख रुपयांचे बांधकाम खर्च, ७ लाख रुपये यंत्र सामुग्री आणि ५ लाख रुपये खेळते भांडवल करिता खर्च आला तसेच यामध्ये त्यांना खादी ग्रामोद्योग मंडळ, भंडारा यांच्या कडून ३५ टक्के अनुदान मिळाले. लागणारी यंत्र सामुग्री त्यांनी फरीदाबाद, पुणे आणि नागपूर वरून खरेदी केले. लागणारे कच्चे सामान ते एमआयडीसी, नागपूर वरून घेतात.

इतरांना रोजगार
आपल्या कल्पनेतून साकारलेल्या आवळ्याच्या व्यवसायातून त्यांनी ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्याचही काम केले आहे. फर्म मध्ये ६ महिला व दहा पुरुष कर्मचारी काम करतात. उत्पादन तयार करण्याची प्रक्रिया घरच्या स्वयंपाकगृहातून सुरु केलेला प्रयोग, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नांदेड, मुंबई, मध्य प्रदेश व छत्तीशगड पर्यंत पोहोचविण्याचे श्रेय हर्षना यांनी आपल्या पतीच्या सहकार्याला दिले आहे.

मार्केटिंग
सुरुवातीला त्यांनी सभोवतालच्या गावांमध्ये जाऊन विक्री केली, हळूहळू विक्री वाढत गेली नंतर त्यांनी तालुकास्तरावर वितरक ची नेमणूक केली व त्यांच्या माध्यमातून विक्रीचे नियोजन केले आहे. सध्या १२ जिल्हामध्ये वितरक नेमले असून विक्री सुरु आहे. हर्षना यांनी आपल्या उत्पादनांना विदर्भ, महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशात ख्याती प्राप्त करून दाखवली आहे. माल पोहोचविण्याकरिता त्यांनी चारचाकी वाहन ग्रामीण बँक च्या सहकार्याने खरेदी केले असून त्यांमधून माल पोहोचउन देतात.

पतीचे सहकार्य
उत्पादनाची वाढती मागणी व पत्नीच्या कामाला हातभार म्हणून दुर्गाप्रसाद यांनी नौकरीतून स्वेछा निवृत्ती स्वीकारली व समाजापुढे एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले आहे. उत्पादन तयार करण्यापासून ते विक्रीकरिता पाठविन्यापर्यंत दुर्गाप्रसाद यांनी पत्नीला पाठबळ दिल. सन २०१६ मध्ये कृषि विभागातील नौकरीचा त्याग करून पत्नीला पूर्णवेळ सहकार्य करून त्यांच्या ससक्तीकरणाचा पाया त्यांनी रचला.

आवळ्याची आयात
विविध पदार्थकरिता लागवडीतून अपुऱ्या पडणाऱ्या आवळ्याची पूर्तता मध्य प्रदेशातील डोंगरगढ तसेच उत्तर प्रदेशातील प्रतापगढ या ठिकाणावरून करतात.

आर्थिक नफा
सर्व मार्गाने देवाणघेवाण करून प्रती वर्ष ४० ते ४५ लाखांची उलाढाल होत आहे, यामधून प्रती वर्ष 8 ते १० लाख रुपये नफा आवळ्याच्या उद्योगातून मिळत आहे.

आवळा प्रक्रिया व्यवसायात मुलीचे करियर
आईच्या आवळ्याच्या उद्योगाला मदत म्हणून मुलगी आचल हिने आवळा प्रक्रिया व्यवसायातच आपले करियर करण्याचा निश्चय केला आहे.याकरिता आचल अन्नप्रक्रिया व विज्ञान शाखेतून पदवी द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.आजच्या युगात आपले भविष्य घडवण्याकरिता शासकीय नौकरीच्या मागे न लागता व्यवसायाच्या माध्यमातून करीयर घडविण्याचा मार्ग आचल हिने दिला आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी यातून आदर्श घेऊन शेतीला पूरक जोडधंदया च्या माध्यमातून यश मिळवावे. सौ. हर्षना दुर्गाप्रसाद वाहणे यांनी आवळ्याच्या शेतीतून प्रगती साधून इतरांना एक आदर्श दिला आहे.

(टीप : या यशकथेचे रिपोर्टिंग लॉकडाऊन पूर्वी, सुमारे वर्षभर आधी केलेले आहेत.)

Exit mobile version