शेळीपालन केल्यामुळे रोजगाराची वणवण संपली

गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यात मुधोळी गावच्या सुनील हजारे यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला. पूर्वी त्यांना रोजगारासाठी दुसºया जिल्ह्यात जावं लागे, आता ते सन्मानानं स्वत:चा व्यवसाय सांभाळत आहेत.

दुर्गम समजल्या जाणाºया गडचिरोली जिल्हयातील मुधोळी हे सुनील हजारे यांचं गाव. चार्मोशी तालुक्यात ते येतं. दहावी पर्यंत शिक्षण केल्यानंतर पुढे 12वीलाच त्यांनी शिक्षण सोडलं आणि घरच्या शेतीची वाट धरली.

त्यांना केवळ 6 एकर शेती. तीही पावसावर अवलंबून धान आणि कापूस पिकवणारी. ते सांगतात की शेतीचं उत्पन्न हे पावसावर अवलंबून, बागायती शेतीसाठी विहिर किंवा इतर सिंचनाची सोय नाही. त्यामुळे या उत्पन्नावर कुटुंबाचा खर्च भागत नव्हता. परिणामी मी 12वी पर्यंत शिकलो खरा, पण परिस्थितीमुळे मला रोजगारासाठी जावं लागलं आणि शिक्षण संपलं.

सुरूवातीला त्यांनी शेतीसोबतच बांधकामावर मेस्त्रिकाम सुरू केलं. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चाले. पण नंतर रोजगाराच्या या कामासाठी शेजारी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दूरवर जावं लागलं आणि वाट्याला वणवण आली. हे सर्व सुरू असताना आपणही काही करावं, आयुष्यातील हा त्रास दूर करून स्वत:च्या पायावर उभं राहावं असं त्यांना फार वाटे, पण मार्ग सापडत नव्हता.

अशातच सुमारे दोनेक वर्षांपूर्वी त्यांच्या तालुक्यात स्थानिक आमदारांच्या पुढाकाराने शेळी पालनाचे प्रशिक्षण झाले. त्याची माहिती सुनील यांना समजल्यावर त्यांनीही भाग घेतला. स्थानिक रोजगार अधिकारी मेश्राम यांनीही मार्गदर्शन केलं.

प्रशिक्षणात त्यांना शेळीपालनाची संपूर्ण माहिती मिळालीच शिवाय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा कर्ज योजनेबद्दलही समजले. झालं, त्यांना आपल्या कष्टमय आयुष्यात आशेचा किरण दिसू लागला. त्यांनी शेळीपालन करायचे ठरवले.

त्यासाठी त्यांच्याकडे जागा होतीच. तेथील अधिकाºयांच्या मदतीने त्यांनी बॅँक आॅफ इंडियाकडून 95 हजार रुपयांचे कर्ज मिळवले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेअंतर्गत हे कर्ज त्यांना मंजूर झाले आणि त्यांचा शेळीपालन व्यवसाय सुरू झाला. पहिली बॅच 7 शेळ्यांची होती.

ते सांगतात की हा व्यवसाय सुरू झाल्याबरोबर रोजगारासाठीची माझी वणवण थांबली. शिवाय शेतीला चांगला जोडधंदाही मिळाला. मागच्या दीड वर्षात त्यांनी बºयापैकी उत्पन्न या व्यवसायातून मिळवले आहे.

त्यातून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही सुधारली आहे. पावसावरच्या शेतीला जोडधंदा असेल, तर शेती फायद्याची होते, हा मंत्र गवसलेल्या हजारे यांनी आता इतर तरुणांनाही व्यवसायउद्योगाची प्रेरणा देणे सुरू केलंय. आता त्यांच्याकडे नऊ शेळ्यांची पुढची बॅच आहे.

आज सुनील हजारे हे दीड वर्षांच्या शेळीपालन व्यवसायानंतर एक चांगले आयुष्य जगत आहेत. त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना स्वत:चा हक्काचा रोजगार घरीच मिळाला आहे, त्यासाठी त्यांना दुसरीकडे वणवण करण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

-पंकज जोशी

(लेखक वरिष्ठ कृषी पत्रकार आहेत.)