मी तुकाराम सखाराम वाशिमकर, केकतउमरा ता.जि.वाशिम येथील शेतकरी. कोरोना महामारीमुळं मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळं आठवडी बाजार, भाजी मंडई बंद झाल्यानं आमच्या शेतातील शेतमाल विक्रीचा प्रश्न निर्माण झाला. वाशिम शहरापासून माझं केकतउमरा गाव 11 कि.मी. आहे. मी सेंद्रीय फळबागेसह ऊस लागवड केली. दरवर्षी उन्हाळ्यात रसवंती गृहांना ऊस विकणं आणि आठवडी बाजारात फळांची विक्री करण्यावर आमचा भर असतो. मात्र, सेंद्रीय शेतीतील चिकू विक्रीसाठी येत असतानाच मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानं शहरातील आठवडी बाजार बंद झाले. रसवंती गृहसुद्धा बंद करण्यात आली.
चिकू आणि ऊस विक्री कशी करायची, असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला. यादरम्यान प्रशासनाने शेतकरी ते ग्राहक थेट माल विक्रीची संकल्पना राबविण्यात येत असल्याचं जाहीर केलं. कृषि विभाग व वाशिम नगरपरिषदेच्या माध्यमातून वाशिम शहरामध्ये शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. याठिकाणी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. या संधीचा लाभ घेऊन आम्ही वाशिम शहरातील सुंदरवाटिका परिसरातील भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणी चिकूची विक्री सुरु केली. तसेच शेतातील ऊस इतर जिल्ह्यातील गुऱ्हाळात नेऊन त्यापासून सेंद्रीय गुळाची व गुळ पाकाची निर्मिती करून याठिकाणी विक्रीसाठी ठेवला.
शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्यानं रास्त किमतीत, 50 ते 60 रुपये प्रतिकिलो दराने चिकू आणि 60 रु.प्रतिकिलो दराने गूळ, ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला. मे ते जून 2020 या तीन महिन्याच्या कालावधीत 35 ते 40 क्विंटल सेंद्रीय चिकू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविले. यामधून साडेतीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळाले. तसंच 16 क्विंटल सेंद्रीय गुळाची विक्री केली. शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीमुळं आम्हाला आमचा शेतमाल ग्राहकांपर्यंत रास्त भावात पोहोचविता आला. त्यामुळं आमचे होणारे नुकसान टळले, आणि ग्राहकांनाही कमी दरात सेंद्रीय माल उपलब्ध झाला. कोरोना काळात शासन मदतीला धावून आल्यानं माझ्यासारख्या हजारो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ झाला. त्यामुळं शासनाला धन्यवाद देतो.