नवलाणेच्या आनंदा बागूलांनी ठिबक सिंचनाद्वारे साधली किमया

महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेतून विहीर खोदण्यासाठी एक लक्ष 90 हजार रुपयांचे अनुदान मिळाले होते. त्यातून विहीर खोदली. या विहिरीसह सामायिक विहिरींच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे पुरेपूर नियोजन करीत आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील नवलाणे येथील 46 वर्षीय शेतकरी आनंदा सीताराम बागूल अवघ्या 43 गुंठे (आर) क्षेत्रातून दरवर्षी किमान तीन लाख रुपयांचे उत्पन्न घेतात…

धुळे शहरापासून वलवाडी- गोंदूर- निमडाळे- मेहेरगावमार्गे लामकानीकडे जाताना नवलाणे हे गाव लागते. धुळे शहरापासून या गावाचे अंतर सुमारे 20 किलोमीटर आहे. या गावात शिरल्यावर एक हिरवेगार शेत व वेलवर्गीय फळभाजीपाल्यासाठी उभारलेला मांडव लक्ष वेधून घेतो. हे शेत आहे नवलाणे येथील शेतकरी आनंदा सीताराम बागूल यांचे. त्यांनी अवघ्या 43 आर क्षेत्रात भाजीपाल्याचे नंदनवन फुलविले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही एवढी प्रगती करीत श्री. बागूल यांनी आपल्या शेतीतून परिसरातील शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. श्री. बागूल यांच्या कुटुंबाची वाटणी झाल्यावर त्यांच्या वाटेला गावाजवळील 43 आर क्षेत्र आले. चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या श्री. बागूल यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला कांदा, कपाशी आदी पिके घेऊन पाहिली. त्यानंतर त्यांनी पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला.

भाजीपाल्याची लागवड करताना श्री. बागूल यांनी 43 आर क्षेत्राचे नियोजन केले. या क्षेत्रातील काही भागात फ्लॉवर काही भागात पालक तर काही भागात वांगी, कारले, गिलक्यांचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. त्यासाठी सुमारे 40 हजार रुपये खर्चून संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचनाने जोडून घेतले. गेल्या दहा वर्षांपासून श्री. बागूल भाजीपाला पिके घेत असून त्यातून दरमहा किमान 25 ते 30 हजार रुपयांचे उत्पादन घेत असल्याचे ते सांगतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी, मुले नेहमीच मदत करतात. त्यामुळे त्यांचा मजुरीचा खर्चही वाचतो. भाजीपाला पिकांना कमीत कमी रासायनिक खते, कीटकनाशके आणि नियमितपणे भाजीपाल्याची निगा आणि लागवड ते काढणीपश्चात कमीत कमी खर्च यामुळे भाजीपाला घेणे परवडते, असे ते नमूद करतात.

गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या फळे व भाजीपाला विक्रीसाठी आश्वासित, विश्वासार्ह, स्पर्धात्मक बाजारपेठेचे पर्याय खुले करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियम) अधिनियम 1963 मधील काही कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार शेतकऱ्यांचे व्यापक हित साध्य करणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांना विक्रीचे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांचा शेतीमाल खरेदी करण्यासाठी अनेक खरेदीदार पुढे येतील. त्यातून स्पर्धा निर्माण होवून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळेल. तसेच व्यापाऱ्यांकडून अडत वसूल करण्याची तरतूदही त्यात समाविष्ट करण्यात आली आहे. त्याचाही श्री. बागूल यांना लाभ झाला आहे. भाजीपाल्याचे दर्जेदार उत्पन्न घेतानाच श्री. बागूल यांनी स्वत:ची विक्री व्यवस्था निर्माण केली आहे. ते किंवा मुले स्वत:च भाजीपाला विक्रीसाठी नेतात. कधी- कधी धुळे शहरातही भाजीपाला विक्रीसाठी आणतात. याशिवाय कुसुंबा, लामकानी, मेहेरगाव, आनंदखेडेसह परिसरातील गावात भाजीपाला विक्रीसाठी नेतात. भाजीपाल्याचे उत्पन्न दर्जेदार घेत असल्याने त्यांचे ग्राहकही ठरलेले आहेत. त्यामुळे भाजीपाला विक्रीसाठी बाजारात त्यांना जास्त वेळ बसावे लागत नाही.

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर श्री. बागूल आपल्या शेतात करतात. दर दोन वर्षांनी शेतात भरपूर शेणखत टाकतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी भाजीपालाबरोबरच आंब्याच्या 41 रोपांची लागवड केली आहे. ही रोपे आता चांगलीच मोठी झाली आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजीपाल्याबरोबरच आंब्यांचेही उत्पन्न श्री. बागूल घेवू शकतात. याशिवाय श्री. बागूल विहिरी बांधण्याचे काम करतात. त्यांची या कामातील प्रगतीमुळे विहिरी बांधण्याचे काम त्यांच्याकडे येते.

श्री. बागूल यांची मुले पंकज व राकेश सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. पंकज प्रथम वर्ष कला शाखेत, तर राकेश द्वितीय वर्ष विज्ञान शाखेचे शिक्षण घेत आहेत. मात्र, महाविद्यालयातून घरी परतल्यावर ते शेती कामाला प्राधान्य देतात. वडिलांबरोबर शेतीत भाजीपाला लागवड, निंदणी, काढणी आणि विक्री ही सर्व कामे ते करतात. एवढेच नव्हे, तर वडिलांच्या विहिरी बांधण्याच्या कामासही ते मदत करतात. यामुळे श्री. बागूल यांचा शेतीतील मजुरीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. मुलांच्या मदतीमुळे श्री. बागूल यांना शेती करणे सोपे झाले आहे. आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा मनोदय ही भावंडे व्यक्त करतात.

– गोपाळ साळुंखे, जिल्हा माहिती कार्यालय, धुळे