कृषी पर्यटनातून तरुणाने गावाला दिली आंतरराष्ट्रीय ओळख

जुन्नर तालुक्यातील पराशर कृषी पर्यटन केंद्राचे नाव आता देशात आणि परदेशातही झाले आहे. कृषी पदवी मिळविल्यानंतर शेती आधारित कृषी पर्यटन केंद्राचा आगळा मार्ग निवडून जुन्नरचे युवा शेतकरी मनोज हाडवळे यांनी तो यशस्वीही केला. त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊ यात.

प्रथमदर्शनी तात्विक जरी वाटत असलं तरी माझा आजपर्यंत प्रवास हा फ़क़्त व्यावसायिक नाही तर स्वतःच्या शोधातील धडपड आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. मी कोणी ग्रेट वगेरे नाही. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना जेवढा न्यूनगंड असतो, तेवढाच न्यूनगंड माझ्याही मनात, भविष्याला घेऊन होता. पण बेदरकार वृत्ती मात्र नव्हती. हळव्या मनाच्या भावनिक आंदोलनांना प्रतिसाद देत, आयुष्याची फरपट अडखळत सुरू होती.

माझं गाव राजुरी. पुणे जिल्ह्यात, जुन्नर तालुक्यातील गाव. अर्थव्यवस्था शेती आधारित. आम्ही तिघे भाऊ, मी सर्वात लहान. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण. दहावीपर्यंत गावातच शिकलो, पुढे काय करावं? हे मला सुचत नव्हतं. शाळेतील सरांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या मुलासोबत मलाही प्रवरानगरला रयतच्या महात्मा गांधी कॉलेजमध्ये शेतकी शिक्षणाला घातले. १० वी पर्यंत घरगुती कोषात वाढलेल्या माझ्यासारख्या मुलाला  हे बदललेलं विश्व खुणावत होतं. अभ्यास करता करता नवनवीन गोष्टींशी ओळख होत होती. सर्वात मोठा भाऊ मोहन, वडिलांना शेतीत व इतर कामात मदत करत असे. मधला भाऊ मंगेश, पुणे विद्यापीठात शिकायला होता. आई वडिलांना आम्ही नानी-नाना म्हणत असू. नाना फार जिद्दी अन मेहनती होते. नानी समर्पणाच्या भूमिकेत होती, तर असं सगळं सुरु असताना १२ वीची परीक्षा महिन्यावर राहिली होती, तेव्हा नानांना अर्धांगवायूचा झटका आला. चालत्या गाड्याला खीळ बसली. १२ वी च्या परीक्षेवर व्हायचा तोच परिणाम झाला, मार्क कमी मिळाले. नानांचे उपचार सुरु झाले. कौटुंबिक जबाबदारी मोठ्या भावावर आली. माझ्यावर कितीही कर्ज होऊ दे पण तू शिक!  असा धीराचा सल्ला अन् प्रोत्साहन त्याने मला नेहमीच दिले. कमी गुणांसोबत, कृषी पदवीच्या शिक्षणासाठी मला, जालन्यातील, बदनापूरचे कॉलेज मिळाले. अतिशय दुर्गम भाग,  नुकतेच शैक्षणिक वातावरण रुजायला लागलेलं. नवीन कॉलेज, त्यामुळं सुविधा नसल्या सारख्याच.

कॉलेजचं नवंपण आमच्या पथ्यावर पडलं. पश्चिम महाराष्ट्रातील शेती अनुभवलेल्या माझ्यासारख्या शेतीचे शिक्षण घेत असलेल्या मुलाला, मराठवाड्यातील शेती समजून घेण्याची संधी या निमित्ताने मिळाली होती. शिक्षण सुरु झालं, कमी मुलं अन नावं कॉलेज याचा फायदा असा झाला कि शिक्षकांसोबत छान जुळलं. आमच्यासाठी अभ्यास अन टाईमपास एकच, त्यामुळं शेती शिक्षणाशी छान गट्टी जमली. कृषी पदवीच्या ४ वर्षाच्या शिक्षणात अनेक विषयांशी ओळख झाली, प्रत्येक सेमेस्टरला विषय बदलायचे अन त्याचसोबत माझी करिअरची दिशा सुद्धा. मृदाशास्राच्या बाबतीत  भारतातील विविध मातीचे संग्रहालय करावे वाटायचे. पॅथोलोजीच्या बाबतीत झाडांचा डॉक्टर झाल्यासारखे वाटायचे. फळ भाज्या प्रक्रिया उद्योगाच्या बाबतीत कंपनी मालक झाल्यासारखे वाटायचे. असाच एक शेती अभियांत्रिकी विषय होता. त्यात तुमच्याजवळील जमिनीचे लेआउट करायचे असायचे. मला तो चळ लागला होता. मग त्यात गायी कुठं, शेळ्या कुठं, कोंबड्या कुठं, मासे कुठं, शेततळे कुठं, फळबागा कुठं, भाजीपाला कुठं, प्रक्रिया उद्योग कुठं, पॅकेजिंग कुठं, फार्म आउटलेट कुठं, याचं सगळं नियोजन असायचं. तेव्हा डोक्यात विचार आला कि, जर असा फार्म बघायला लोकंही आले तर किती भारी होईल ना? मला वाटतं,  माझ्या कृषी पर्यटनातील कामाची ही सुरवात होती, जी २००४ साली झाली होती.

ठिणगी तर पडली होती पण त्याचा विस्तव व्हायला अजून वेळ होता. कृषी पदव्युत्तर पदवीसाठी परभणी येथील कृषी विद्यापीठात आलो. उपलब्ध शिक्षण पद्धतीत, नव्याने ज्ञानात काही भर पडणार नाही हे एव्हाना लक्षात आले होते. मग स्वतःचीच धडपड सुरु झाली. म्हणता म्हणता शिक्षण संपलं, इतर मुलांसारखी मलाही नोकरी बाबत असुरक्षितता होतीच. २-३ संधी समोर होत्या, मी शेतकरी आत्महत्या प्रश्नांवर काम करायला वर्धा इथं गेलो. पगार अतिशय कमी होता पण घेतलेलं शिक्षण कामी येतंय का? हे पहायचं होतं. वर्ध्याला सेवाग्राम व पवनारचा परिसर आहे. तिथं गांधीजी व विनोबांच्या विचारधारेने प्रेरित झालेले भारतीय तसेच विदेशी लोकं मोठ्या प्रमाणात येत असत. त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली कि ती मंडळी भारतात येतात ती भारताची संस्कृती अनुभवायला. भारतीय संस्कृती जी गाव खेड्यात आहे. कृषी प्रधान भारताची संस्कृती ही शेतीत आहे, मातीत आहे. विचार बांधणी सुरु होती. भारतातील सर्वात मोठे कृषी व ग्रामीण पर्यटन उभारायचे हे स्वप्न बघायला सुरवात २००७ मध्ये केली होती अन ते प्रत्यक्षात उतरायला २०११ उजाडले.

या ५ वर्षात, कृषी पर्यटनाची संकल्पना स्पष्ट व्हायला अनेक लोकं भेटली, अनेक ठिकाण मी भेट देवून आलो, आधीची नोकरी सोडून स्टेट बँकेत कृषी अधिकारी म्हणुन रुजू झालो, संधींचा आयाम वाढू लागला. आधीच्या नोकरीत २ वर्ष अन बँकेत २ वर्ष अशी ४ वर्ष नोकरी केली. बँकेतील नोकरी ज्यावेळेस सोडली त्यावेळेस पुढं काय? हा प्रश्न अनुत्तरीतच होता, पण जे करतोय ते करायचे नाही ही भूमिका होती. जेव्हा नोकरी सोडली तेव्हा चाचपडत असताना, काही महिने बेरोजगार होऊन फिरलो, तर ७-८ महिने कोचीनला कांदा विकण्याचा व्यवसाय केला. गावागावातला दक्षिण भारत समजून घेतला, कृषी एक संस्कृती म्हणून किती जुनी आहे हे अभ्यासायला पुण्यात दीड महिना थांबलो. तिथंच पराशरऋषी कळले. अन मग हेच नाव आपण आपल्या कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राला ठरवलं.

डोक्यातील कृषी पर्यटन संकल्पना आकाराला, तर आली पण प्रत्यक्षात कशी उभारायची हे धाडस नव्हतं. एका प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालो, त्यामुळे ती भीतीही पळाली. पुढं काय म्हणता, एक अभिनव संकल्पना समोर आली, द्राक्ष महोत्सव.  महाराष्ट्रातील पहिला द्राक्ष महोत्सव आपण २०११ साली राहत्या घरून आयोजित केला. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. आत्मविश्वास वाढला. घराची जमीन फारच कमी, अन तीही शेतीयोग्य. दुसरीकडं कुठं जमीन घेऊन काम सुरु करावं असं ठरलं. जवळच एकरभर जमीन भाडेतत्वावर घेऊन कामाला सुरवात केली. अडचण अर्थातच पैशाची होती. गावातील पतसंस्थेकडून कर्ज घेऊन साडे तीन महिन्यात काम पूर्ण झाले.

त्यात घरातील सर्वच सदस्यांनी माझं नवखेपण सांभाळून घेतलं. ग्रामीण पद्धतीची राहण्याची व्यवस्था उभारली, फ़क़्त शाकाहारी जेवण, फक्त पुरुषांच्या सहली मुक्कामासाठी नको, असे अनेक नियम लावून पर्यटन केंद्र चालवायचे म्हणजे तारेवरची कसरतच होती अन तरीही ही कसरत करायला मी तयार होतो. कारण आयुष्यात काहीच करता आले नाही म्हणून मी हे करत नव्हतो तर समजून उमजून या आवडीच्या क्षेत्रात मी उतरलो होतो. त्यामुळे या कामात येणाऱ्या अडचणी मला कधी अडचणी वाटल्याच नाहीत. समोर येईल ते काम करत गेलो, पडेल ती जबाबदारी उचलली. हे करताना अरे मी आधी साहेब होतो अन् आता हे कसं करू ही जनमानसातील रूढ प्रथा मी कधीच पळवून लावली होती. एका अर्थाने मी माझ्या आधीच्या चौकटीतून बाहेर पडून अमिबाचा आकार घेतला होता. प्रत्यक्ष पर्यटनाला सुरवात सप्टेंबर २०११ मध्ये झाली अन् ऑक्टोबर २०१२ च्या आऊटलूक ट्रॅव्हलरने भारतातील ग्रामीण पर्यटन केंद्रांच्या यादीत पराशर कृषी पर्यटन केंद्राला प्रथम क्रमांक दिला. जुन्नरमधील राजुरी गावात आपले पराशर कृषी पर्यटन सुरु झाले.

राजुरी हे जुन्नरच्या पूर्वेकडील गाव. आपण कधीच पराशर कृषी पर्यटन राजुरी असं लिहिलं नाही तर पराशर कृषी पर्यटन, जुन्नर असाच नामोल्लेख आपण आवर्जून करत आलो. जुन्नरची अर्थव्यवस्था शेती आधारित. पर्यटनाच्या दृष्टीने अनेक संधी.  पण या संधी नेमक्या कोणत्या हे काही स्पष्ट नव्हते. तेव्हा आपण कृषी पर्यटन आधारित एका तालुक्याचे पर्यटन मॉडेल मांडण्याचा प्रयत्न केला.

जुन्नर पर्यटन विकास संस्था हे व्यासपीठ सुरु करून, जुन्नरमधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना एका व्यासपीठावर आणून, जुन्नरची पर्यटन चळवळ सुरु केली. मग त्यामध्ये जुन्नर जागर, क्लीन जुन्नर, जुन्नर पर्यटन आराखडा, जुन्नर पर्यटन नकाशा, पर्यावरण साक्षरता कार्यशाळा, जबाबदार पर्यटन कार्यशाळा असे अनेक उपक्रम राबवले. जुन्नर पर्यटन चळवळीने चांगलाच जोर पकडला होता. २१ मार्च २०१८ ला शासनाने जुन्नरला विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला. माझ्या मनातील स्वप्न पूर्ण होण्यास सुरवात झाली. इकडं पराशर कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्रात नवनवीन बदल होतच राहिले.

गेल्या ८ वर्षात ८००० पेक्षा जास्त लोकांनी आपल्या पराशर कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राला भेट दिली मग त्यात भारतभरातून लोकं आले. जगातील जवळपास २१ देशातून लोकं आले. शाळा कॉलेजच्या सहली आल्या. सुरवातीला लोकं आपल्याला हसत होते. इतके नियम अटी लावून कोण येईल म्हणत होते. पण पराशर आता संवेदनशील व जबाबदार पर्यटनासाठी एक ब्रँड झालाय. मला ज्या अडचणी आल्या, पर्यटनाविषयी माझे जे अनुभव होते, जे मला शिकायला मिळाले ते विविध व्यासपीठांवर जावून मला सांगण्याची संधी मिळाली. मग ते प्रशिक्षण कार्यशाळा असु द्या, राज्यस्तरीय सेमिनार असुद्या, महाविद्यालयातील मुलांशी भविष्यातील करिअरच्या संधी असूद्यात किंवा सामान्य शेतकऱ्यांच्या शेतावर जावून त्यांना अनुभवाचे बोल सांगणं असुद्यात. जिथं जिथं मला बोलावलं तिथं तिथं मी, माझा प्रवास प्रामाणिकपणे सांगितला. कुठं चुकलो कुठं ठाम राहिलो, काय करावे काय करू नये असं सगळंचं मनमोकळं व्यक्त झालो.

सकाळ प्रकाशनने कृषी पर्यटन संकल्पनेवर आपल्या अनुभवाचे पुस्तक प्रकाशित केले, त्याचाही फायदा झाला. शेतकऱ्यांना कृषी पर्यटनासाठी सल्लागार म्हणून काम करता यायला लागले. ग्रामीण भागातील एक तरुण शेती शिक्षण घेऊन, शेती व पर्यटनाची सांगड घालतो अन त्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देतो हे इतरांसाठी खूप काही वाटते पण मला विचाराल तर हा माझा माझ्या जगण्याचा शोध आहे…जो अविरत आहे. दरवेळी नव्या लोकांना भेटायला मिळते, त्याचं जगणं समजून घेता येतं अन त्यातून आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. पर्यटनातून माझी मिळकत काय असेल, तर ती आहे खूप सारी माणसं.

मनोज हाडवळे, जुन्नर