भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी…!

लॉकडाऊनमध्ये बहुतांशी उद्योग-व्यवसायांचे शटर डाऊन असताना, रेणुका स्वयं-सहाय्यता समुहाच्या दारावर मात्र भाजीपाल्याने ‘नॉक’ केले. गडहिंग्लज तालुक्यातील हिटणीमधील या समुहाने लॉकडाऊनच्या काळामध्ये भाजीपाला आणि फळे विक्री करून 1 लाख 20 हजाराची उलाढाल केली.

गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असल्याने येथे मराठीबरोबरच कन्नड भाषासुध्दा बोलली जाते. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि स्वर्ण जयंती ग्रामस्वरोजगार योजना अंतर्गत हा समूहकार्यरत आहे. 1 नोव्हेंबर 2007 रोजी या समुहाची स्थापना झाली. तसेच 25 नोव्हेंबर 2018 समुहाचे पुन:गठनही करण्यात आले. रेखा शंकर माने या समुहाच्या अध्यक्ष तर सविता अप्पासाहेब देवगोंडा या सचिव आहेत. 10 सदस्यांचा हा समूह प्रती सदस्य 100 रूपये मासिक बचत करतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज येथे या गटाचे खाते आहे. या गटास 80 हजार, 2 लाख आणि 5 लाख असे अर्थसहाय्य करण्यात आले होते. त्याची नियमित परतफेडही केली आहे. सध्या 2 लाखाचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. त्याचीही परतफेड सुरू आहे.

कोविड-19 मुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये या समुहाने भाजीपाला व फळे विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात जोपासला. कोबी, वांगी, फ्लॉवर, शेवगा, शिमला मिरची, टोमॅटो, लिंबू, आले, कोथिंबीर, दोडका, कारली, मेथी, पोकळा, हिरवी मिरची, लसूण, कडीपत्ता या भाजीपाल्याबरोबरच केळी, पपई, आंबे व कलिंगड या फळांची विक्री करत आहेत. गटातील काही सदस्य स्वत: उत्पादक आहेत तर इतर सदस्य भाजीपाला घाऊक खरेदी करून विक्री करीत आहेत.

या भाजी-पाला विक्रीमध्ये एकूण 1 लाख 20 हजार इतकी उलाढाल झाली असून गटास 18 हजार रूपयांचा नफा झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात ‘डाऊन’ होऊन हताशपणे न बसता या समुहाने आलेल्या संधीचे नफ्यात रूपांतर केले. यामधून उपजीविका निर्माण करणारा हा गट इतरांसाठी निश्चित प्रेरणादायी ठरेल.

प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर