दोन एकरात ५० टन वांगी

लिंबू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव (लोणी) हे गाव आता भरतासाठी लागणारी वांगी पिकवू लागले आहे. 

अहमदनगर जिल्हा म्हटले की, डोळ्यांसमोर दिसते ती उसाची शेती. याच नगर जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनाचे नवनवीन प्रयोग शेतकरी करू लागले आहेत. गुलटेकडी आणि वाशी मार्केटचा अभ्यास करून भाजीपाला पिकविणारे शेतकरी संख्येने वाढू लागले आहेत. नगर-दौंड रस्त्यावर पारगाव (लोणी) आहे. या गावचे प्रगतशील शेतकरी बाळासाहेब जगताप यांनी वांगी लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. टप्प्याटप्प्याने लागवड करत वांग्याची शेती करणार्‍या बाळासाहेबांकडे आज पावसाच्या अगोदर पुनर्लागवड केलेला दोन एकर आणि दिवाळीआधी लागवड केलेला एक एकर, असा तीन एकरांचा फड आहे.

वांग्याचे भरीत व त्यासोबत भाकरी, हा अस्सल गावरान मेनू सर्वांच्या आवडीचा आहे. पारगाव (लोणी) येथील बाळासाहेब जगताप हे गेल्या पाच वर्षांपासून भरतासाठी लागणार्‍या विशिष्ट प्रकारच्या वांग्याचे उत्पादन घेतात. यंदा त्यांनी आपल्या शेतात तीन एकर क्षेत्रात अशा वांग्याची लागवड केली आहे. टप्प्याटप्प्याने लागवड करत वांग्याची शेती करणार्‍या बाळासाहेबांकडे आज पावसाच्या अगोदर पुनर्लागवड केलेला दोन एकर आणि दिवाळीआधी लागवड केलेला एक एकर, असा तीन एकरांचा फड आहे. त्यांच्या चवदार वांग्यांना बाजारात चांगला भाव मिळतो. वांग्यापासून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असून, जगताप कुटुंबियांच्या प्रगतीत वांगी या पिकाचा मोठा हातभार लावला आहे.

तीन फुटांवर केली लागवड
बाळासाहेब जगताप यांनी वांग्याच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम काळी जमीन निवडली. सात फुटांवर ठिबकच्या नळ्या अंथरून तीन फुटांवर झाडाची लागवड केली. वेळोवेळी बगल फुटवे आणि अवास्तव वाढ काढून घेतली. कायम वाढीसाठी पाच ते सहा चांगल्या फळफांद्यांची निवड केली. प्रत्येक फांदी सुतळीने बांधून झाडास वळण दिले. दोन ते अडीच महिन्यांत त्यांच्या शेतात वांग्याचा पहिला तोडा सुरू झाला.

वांग्यांची माळ

लागवडीचे अंतर बदलल्यामुळे हवा खेळती राहिली. मुळांमध्ये होणारी स्पर्धा टाळल्यामुळे पानांचा आकार चांगला मिळाला. पर्यायाने वांग्याच्या झाडाची उंची साडेपाच ते सहा फुटांपर्यंत वाढली. प्रत्येक फुटीला ३५० ते ५०० ग्रॅमचे वांगे अशी झाडावर वांग्यांची माळ तयार झाली. जास्तीचा पाऊस पडूनही झाड निरोगी आणि सशक्त राहिले.

कीड व्यवस्थापन
पिकांची गरज आणि त्रास देणार्‍या किडी यांचा अभ्यास करून जगताप यांनी फवारणीचे नियोजन केले. फवारणीचे शेड्यूल बांधूनच दर आठवड्याला फवारणी केली. सारखे-सारखे एकच औषध फवारल्यामुळे किडीवर त्याचा प्रभाव पडत नाही. तसेच झाडावरही दुष्परिणाम जाणवतात म्हणून एकदा फवारलेले औषध त्यांनी दुसर्‍यांदा एक ते दीड महिन्यानेच फवारले.

खत व्यवस्थापन
लागवडीच्या अगोदर उन्हाळ्यात रानभर पसरून दिलेले शेणखत, लागवडीच्या वेळी दिलेल्या संतुलित रासायनिक खतांच्या मात्रा आणि ठिबकद्वारे दिलेली विद्राव्य खते यांचा योग्य ताळमेळ बसल्यामुळे उत्पादन वाढीस फायदा झाला. एकूणच पिकाची अनुवांशिक उत्पादकता खेचून आणणे जगताप यांना शक्य झाले.

( टीप : हा लेख कोव्हीड आधीच्या काळातला आहे. )