राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे. या पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केल्यास खरिपाबरोबरच रब्बीच्या हंगामाला त्याचा उपयोग होईल. त्यादृष्टीने विहीर पुनर्भरणासारखे प्रयोग शेतकर्यांनी जरूर करावेत. शेतात बाहेरून मोठ्या प्रमाणात पाणी येत असेल किंवा शेतात विहिरीच्या बाजूला पाणी साठत असेल अथवा विहिरी जवळून छोटासा ओहळ वाहत असेल तर विहीर पुर्नभरण करता येते.
शेतामधून वाहून जाणारे पावसाचे पाणी शेतचारीद्वारे एकत्रित करून विहिरीत सोडण्यात येते, यालाच विहिरीद्वारे भूजलाचे कृत्रिमरीत्या पुनर्भरण म्हणतात. त्यासाठी विहिरीपासून काही अंतरावर ८ बाय ६ बाय ६ फूट आकाराचा खड्डा खोदावा. याला गाळ साठवण हौद म्हणतात, या खड्ड्यात पाणी आल्यानंतर काही काळ पाणी तेथे थांबेल व पाण्यामध्ये आलेला गाळ, काडीकचरा खड्ड्याच्या तळाशी बसेल व नंतर हे पाणी पाईपद्वारे म्हणजेच चाळणीच्या खड्ड्यात सोडण्यात येते. गाळ साठवण खड्ड्याच्या उताराकडील विहिरीच्या दिशेने आणखी एक लहान खड्डा ४ बाय ४ बाय ६ फूट आकाराचा खोदावा. याला चाळणी खड्डा (फिल्टर) म्हणतात. हा खड्डा खोदताना विहिरीपासून त्याचे अंतर १० फूट असेल याची काळजी घ्यावी, नंतर हा चाळणी खड्डा हा स्थानिकरीत्या उपलब्ध असलेल्या मोठे गोटे, छोटे गोटे, विटा व जाड वाळू, बारीक वाळू या क्रमाने तळापासून वरपर्यंत भरून घ्यावा. त्यानंतर या खड्ड्यातून विहिरीस जोडणारा पाईप बसवावा. हा पाईप शक्यतो ९ इंच व्यासाचा सिमेंटचा असावा. पाईप विहिरीच्या भिंतीपासून १ फूट पुढे आणावा, तसेच या पाईपास खड्ड्याच्या आतल्या बाजूने जाळी घालावी, त्यामुळे कचरा विहिरीत पडणार नाही.
हे लक्षात ठेवा…
विहिरीद्वारे भ्ाूजलाचे कृत्रिमरीत्या पुनर्भरण करताना काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्या विहिरींना रब्बी हंगामाच्या शेवटी पाणी कमी पडते किंवा ज्या विहिरींमधील ऑक्टोबर महिन्यातील पाण्याची पातळी सरासरी ४ मीटरपेक्षा खाली असेल अशाच ठिकाणी ही योजना राबविण्यात यावी. त्यामुळे पावसाळ्यात विहिरीत पाणी मुरवणे शक्य होते. गावातील जास्तीत जास्त विहिरी एकत्रिपणे या योजनेसाठी निवडल्यास त्याचा फायदा लगेचच गावाला मिळेल. प्रत्येक पाणलोटांतर्गत साठवण क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र व सर्वात शेवटी अपधाव क्षेत्रांतर्गतच्या विहिरींचा विचार करून एकत्रितपणे ही योजना राबविल्यास तात्काळ परिणाम दिसून येईल.
अशी निवडा विहीर
विहिरीची निवड करीत असताना त्याची खोली पुरेशी असावी. जेणेकरून त्या भागात अस्तित्वात असलेला जलधारक खडक पूर्णपणे भेदलेला असावा. यासाठी ज्या विहिरी कठीण खडकात आहेत, अशाच विहिरींची निवड करावी; तसेच बोअरवेल/ट्युुबवेल यांचा योजनेंतर्गत विचार करण्यात येऊ नये. पहिल्या पावसाचे पाणी किंवा अति गढूळ पाणी फिल्टरमध्ये कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. फिल्टरच्या माध्यमातून विहिरीत जाणारे पाणी हे कोणत्याही परिस्थितीत गाळविरहीत असावे. त्याचबरोबर प्रदूषित घटकांचा अंतर्भाव होणार नाही. यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. यामध्ये उकिरड्यावरील पाणी, सांडपाणी अथवा प्रदूषित पाणी फिल्टरमध्ये येणार नाही, याची काळजी घ्यावी. फिल्टर हा विहिरीच्या वरील बाजूसच करण्यात यावा. फिल्टर करीत असताना तो मजबूत व टिकावू असेल याची दक्षता घ्यावी. त्याच्या खोदकामाच्या वेळी अथवा विहिरीला पाईपद्वारे जोडत असताना विहिरीला धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी चाळणी खड्डा (फिल्टर) व विहीर यामध्ये योग्य अंतर ठेवावे. अंतर कमी असल्यास फिल्टरमधील पाण्याच्या दाबामुळे विहीर ढासळण्याची शक्यता असते.
शेतामधील जास्तीत जास्त पाणी विहीर पुनर्भरणासाठी उपलब्ध व्हावे, याकरिता आवश्यकतेनुसार चरांसाठी व्यवस्था करण्यात यावी, तसेच पावसाचे पाणी, जमिनीवरील पाणी अथवा ओढ्याचे पाणी खूप जास्त प्रमाणात येण्याची शक्यता असल्यास जादा पाणी फिल्टरपासून दूर काढावे. त्यामुळे फिल्टरमधून पाणी येण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी वाळू स्वच्छ करून पुन्हा चाळणी खड्ड्यात टाकता येते किंवा वाळू बदलताही येते आणि त्यामुळे नीतळ स्वच्छ पाणी विहिरीत सोडता येते. पावसाळ्यापूर्वी विहिरीद्वारे कृत्रिमरीत्या भूूजलाचे पुनर्भरणाचे काम केल्यास निश्चितच आपणाला व आपल्या बरोबर सर्वांना फायदा होतो.
- कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा