अधिक फायद्यासाठी डाळिंबावर करा प्रक्रिया

 सध्या बाजारातील तीव्र चढउतारांमुळे उत्पादन व शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न यांचे व्यस्त प्रमाण पाहायला मिळत आहे. त्यात सातत्य राखायचे असेल तर डाळींब प्रक्रियेकडे वळायला हवे. डाळींबामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे बाजारपेठेत या फळास चांगली मागणी आहे. सध्या डाळिंब लागवड महाराष्ट्राव्यतिरिक्त मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक राज्यात वाढत आहे. उत्पादन सातत्याने वाढत असल्याने दरामध्ये स्थिरता यावी, यासाठी डाळींब काढणीपश्चात प्रक्रिया, मूल्यवर्धित उत्पादने व औषध निर्मितीद्वारे उद्योजकता विकास साधून रोजगार निर्मिती करण्यास भरपूर वाव आहे. आरोग्याबद्दलच्या वाढत्या सतर्कतेमुळे डाळींबापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचे विपणन अधिक सोपे झाले असून, रोजगाराचे नवीन मार्ग निर्माण होत आहेत.

• डाळींबातील घटक :

डाळींब हे एक बहुगुणी आरोग्यवर्धक फळ आहे. डाळींबात ४८ ते ५२ टक्के खाण्यायोग्य भाग असतो. यात ७८ टक्के पाणी, १.९ टक्के प्रथिने, १.७ टक्के स्निग्ध पदार्थ, १५ टक्के शर्करा व ०.७ टक्के खनिजद्रव्ये असतात. डाळींबामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, झिंक ही खनिजे असतात. डाळिंब हे तंतुमय पदार्थ आणि काँज्यूगेटेड लिनोलोनिक अॅसिड याचा महत्वपूर्ण स्रोत आहे. डाळींबामध्ये क, के ही जीवनसत्वे व फोलेट विपुल मात्रेमध्ये आढळतात. डाळींबाच्या फळामध्ये सरासरी ६० ते ६७ टक्के दाणे निघतात. पूर्ण पिकलेल्या डाळींबापासून ४५ ते ६० टक्के रस निघतो. डाळींबापासून अनेक उत्तम, चवदार पौष्टिक पदार्थ तयार करता येतात. डाळींबापासून रस, अनारदाना, डाळींब सरबत, डाळींब स्क्वॅश, जेली, जाम, डाळींब मद्य (वाईन) हे पदार्थ तयार करता येतात.

१. डाळींब रस :

डाळींबाचा रस तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली, साधारण आम्ल, गोड चव, मोठ्या गराचे दाणे व टॅनीनचे प्रमाण ०.२५ टक्केपेक्षा कमी असलेली फळे निवडावीत. पिकलेली डाळींब फळे स्वच्छ करून दाणे काढावेत. बास्केट प्रेस या यंत्राने किंवा मलमलच्या कापडात बांधून हाताने त्यांचा रस काढावा. ज्यूस तापवून नंतर थंड करून चोवीस तास स्थिर ठेवावा. गाळणीने गाळून रसातील घनपदार्थ वेगळे करावेत. प्रक्रियायुक्त पाश्चराईज्ड डाळींब रसाची काच/पॉलीप्रोपीलीन बाटलीमध्ये सहा महिन्यांपर्यंत ४ अंश सेल्सिअस तापमानाला सुरक्षित साठवण करता येते. डाळिंब रसापासून रेडी टू सर्व्ह ड्रिंक बनवण्यासाठी २० टक्के रस व उर्वरित पाणी या प्रमाणात वापर करता येतो. या पेयात रसाव्यतिरिक्त पाणी, साखर, सायट्रिक अॅसिड व परिरक्षक या घटकांचा वापर केला जातो.

२. अनारदाना :

आंबट चव असलेल्या डाळींब फळातील दाणे सुकवून तयार केलेल्या पदार्थास ‘अनारदाना’ असे म्हणतात. हा अनारदाना आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून पचनासाठी व पोटाच्या विकारासाठी उपचार म्हणून अनेक आशियाई देशांमध्ये उपयोगात आणला जातो. अनारदाना बनविण्यासाठी डाळींबाचे दाणे वाळविले जातात. साधारणपणे १० टन डाळींबापासून १ टन अनारदाना तयार होतो. डाळींबाच्या दाण्यांना ग्रीनहाऊस ड्रायरमध्ये (१ दिवस) किंवा ट्रे ड्रायरमध्ये (५५ अंश सेल्सिअस तापमानाला ७ तास) सुकवण्यात येते. हा पदार्थ अन्न शिजवताना चिंच, आमसूलऐवजी अनेक अन्नामध्ये वापरता येतो. त्यामुळे अन्नाची चव सुधारते व अन्न अधिक स्वादिष्ट, रुचकर व पौष्टिक बनते.

३. डाळींब वाईन :

डाळींबापासून वाईनची निर्मिती करता येऊ शकते. डाळींबाच्या वाईनमध्ये मेलॅटोनीन नावाचे न्युरोहार्मोन आढळले आहे, जे डाळींबाच्या रसात आढळत नाही. व्यावसायिक द्राक्षांपासून बनविलेल्या वाईनच्या तुलनेत पाचपट अधिक अँटीऑक्सडंट मिळतात. डाळींब वाईनमध्ये फिनोलिकची घटकांची मात्राही अधिक प्रमाणात आढळते. वाईन तयार करण्यासाठी निरोगी व परिपक्व डाळींबाची फळे फळे निवडली जातात. ती स्वच्छ धुऊन त्याचे दाणे काढले जातात. बास्केट प्रेसच्या साह्याने फळांचा रस काढला जातो. सायट्रिक अॅसिड टाकून रसाची आम्लता ०.७ टक्के केली जाते. त्यामध्ये ०.०५ ग्रॅम प्रति १०० मिली डायअमोनियम फॉस्फेट टाकून हे मिश्रण तापवून थंड केले जाते. त्यानंतर त्यामध्ये २ टक्के यीस्ट (सॅकॅरोमायसेस सेरेव्हीसी) घालून मिश्रण रबरी नळी व घट्ट बुच असलेल्या काचेच्या भांड्यात १५ ते २० दिवसांपर्यंत आंबविण्यास ठेवले जाते. मिश्रणाचा ब्रिक्स अधूनमधून तपासाला जातो. ब्रिक्स ५ ते ६ अंश इतका कमी झाला कि वाईन तयार झाली, असे समजले जाते. यानंतर हे मिश्रण सेंट्रीफ्युज मशिनच्या साह्याने स्वच्छ करून गळून घेतले जाते. तयार झालेली वाईन स्वच्छ व घट्ट बुच असलेल्या काचेच्या रंगीत बाटल्यांत भरले जाते.

४. जेली व जाम :

डाळिंबाचा रस व साखर १:१ प्रमाणात घेऊन तसेच सायट्रिक अॅसिडचा अॅसिड्युलंट म्हणून वापर करून जेली बनवता येते. अशा प्रकारे तयार झालेल्या डाळिंबाच्या जेलीस उत्तम रंग, चव आणि गुणवत्तेमुळे ग्राहकांकडून पसंती मिळते. तसेच डाळिंबापासून जाम बनवण्यासाठी डाळिंबाच्या रसाला मंद आचेवर ठेवले जाते आणि ६८ ते ७o अंश ब्रिक्सपर्यंत गेल्यावर चांगला घट्टपणा येतो. अशा प्रकारे तयार केलेल्या जॅमची एक वर्षापर्यंत सुरक्षितरीत्या साठवण करता येते.

५. रंग निर्मिती :

डाळींबाच्या सालीत मोठ्या प्रमाणात टॅनीनचे प्रमाण आहे. डाळींबाच्या सालीत रंगाचा स्त्रोत ग्रेनाटोनीन आहे आणि तो एन-मिथाईल ग्रेनाटोनीन नावाच्या अल्कालॉईडच्या स्वरुपात असतो. ग्रेनाटोनीन डाळींबाच्या सालीला रंग प्रदान करतो. याचे विलगीकरण विविध प्रकारच्या सोल्वंट्सचा उपयोग करुन करता येते. सालीपासून मिळणारा रंग डाईंग उद्योगामध्ये तसेच लिपस्टिक किंवा इतर कॉस्मेटीक इंडस्ट्रीमध्ये उपयोगी पडतो.

प्रा. रेश्मा शिंदे, कृषी महाविद्यालय, बारामती