आजची वासरे ही उद्याची दुध देणारी व शेती काम करणारी भावी पिढी होय. वासरांच्या सर्वांगिन विकासासाठी व वाढीसाठी उत्तम संगोपन आवश्यक आहे.
वासरु जन्मल्यानंतर त्यांचे अंग आईस चाटु दया. नाक, तोंड व कानातील चिकट पदार्थ काढुन स्वच्छ करा. कोरडया स्वच्छ फडक्याने किंवा बारदाण्याने अंग पुसुन काढा. पिवळे नरम खुर काढुन टाका. नाळ पिळुन कापुन टाका आणि त्या ठिकाणी आयोडीन किंवा तुरटीचे द्रावण लावा.
सशक्त वासरु आपोआप उभे राहिल. नाळ पिळुन वासराला श्वासोच्छवास घेणे अवघड होत असल्यास त्यास कोरडया बारदाण्यावर आडवे झोपवुन छाती हळुवार चोळा, दाब दया व सोडा, वासरु श्वासोच्छवास चांगले करु लागेल. वासरास पहिल्या अर्ध्या तासात चीक पाजा.
त्यामुळे त्यास रोगप्रतिबंधक शक्ती मिळेल. आईस चीक येत नसेल तर दुस-या गाईचा चीक पाजा. तेही नसेल तर पाऊण लिटर दुध उकळुन थंड करा, त्यात एक अंडे फोडुन टाका, अर्धा चमचा एरंड तेल टाका आणि चांगले ढवळा.
३० मि. ग्रॅम ॲरोमायसिन औषध मिसळुन सकाळ संध्याकाळ तीन दिवस पाजा. वासराचे जन्मत: वजन २० ते २५ किलो असते. जर वासरास आई पाजीत नसेल तर वासराच्या वजनाच्या १० टक्के दुध तापवुन, कोमट करुन दोन भागात सकाळ संध्याकाळ स्वच्छ पाण्यातुन पाजवावे. वासरास दर तीन महिन्यांनी जंताचे औषध पाजावे.
वासरांना आहार असा दया :
वासराचे वय | दुध / मलई विरहित दुध | वासराचा खुराक | हिरवा चारा | कडबा |
१ – ५ दिवस | २ किलो चीक | – | – | — |
२ – ४ आठवडे | दीड किलो दुध | १०० ग्रॅम | – | — |
२ – ४ महिने | १ किलो दुध | ५०० ग्रॅम | अर्धा ते १ | १ कि |
५ – ६ महिने | – | १.० कि | २ – ४ कि | १ कि |
६ – १२ महिने | – | १.५ कि | ५ – ६ कि | १ – २ कि |
१३ महिने | – | १.५ कि | ५ – १० कि | ५ – ६ कि |
अ. पौष्टिक चारा
(अ) पौष्टिक चारा तयार करण्यासाठी वाळलेल्या चा-यासोबत हिरव्या चा-याचीही कुटटी ३ : १ या प्रमाणात मिसळा.
(ब) त्यास अधिक पौष्टीक करण्यासाठी २ भाग तृणधान्य हिरवा चारा तसेच ज्वारी – मका – ओट गवत, पॅरा गवत वगैरे आणि १ भाग डाळवर्गीय चारा बारसीम – लुसर्न – दशरथ – गवत – सुबाभूळ वगैरे मिसळा.
(क) जेव्हा हिरवा चारा खास करुन डाळवर्गीय चारा नसतो तेंव्हा युरियाच्या सहायाने वाळलेल्या चा-याची पौष्टिकता वाढविता येते. सारवलेल्या स्वच्छ जागेवर कडबा सरमाड – काड – तणस – धांडे गवत वगैरेची १०० मिलो कुटटी पसरुन ठेवा. २० लिटर पाण्यात २ किलो खताचा युरिया विरघळुन टाका. नंतर १ किलो मीठ विरघळुन घ्या.
त्यानंतर १० किलो उसाची मळी किंवा ५ किलो हलक्या प्रतीचा गुळ मिसळुन घ्या. झारीने हे मिश्रण कुटटीवर सारखे टाकावे व दाताळयाने मिसळुन घ्यावे. असे मिश्रण पावसाळयात २ – ३ दिवस, हिवाळयात ८ दिवस तर उन्हाळयात १० – १२ दिवस चांगले राहते.
हे मिश्रण भाकड जनावरे, बैल व वळु व ३ – ४ लिटर दुध देणा-या गाईंना रोज ८ – १० किलो दयावे. शरीर रक्षणासाठी सर्व पोषकतत्वे त्यांना मिळतात. त्यांना खुराक किंवा हिरवा व कोरडा चारा द्यावा लागत नाही. जर ६ लिटर दुध देणा-या जनावरास दयावयाचे तर त्यात एक किलो क्षार मिश्रण व जीवनसत्वे टाकावीत किंवा २ – ४ कि. हिरवा चारा द्यावा. वाळलेल्या चारा म्हणुन तुरीची, भूईमुगाची, मुगाची सोयाबिनची गुळी रोज ५ – ६ किलो देता येईल.
क. मुरघास : हिरवा चारा ऑगस्ट ते नोव्हेंबर पर्यंत जास्त असतो. तेंव्हा त्यास खडडयात किंवा बुरजात (टावर) मध्ये दाबुन हवाबंद करुन साठवुन ठेवा. ४५ दिवसात चारा चांगला मुरतो, आंबट गोड चविष्ट मुरघास तयार होता. उन्हाळयात हिरवा चारा नसतो, तेंव्हा मुरघास उघडावा व हवे तेवढे मुरघास रोज काढुन जनावरांना खाऊ घालावे.
मुरघास तयार करण्यासाठी :
१. तृणधान्य चारा, ज्वारी फुलो-यात व मका दुधात असतांना कापावी. डाळवर्गीय चारा फुलो-यात असतांना कापावा, त्याचे प्रमाण ४ : १ घ्यावे. मिश्रणाच्या कुटटीचा मुरघास केल्यास तो संतुलित व पौष्टिक बनतो.
२. फक्त तृणधान्य चा-यापासुन मुरघास तयार करता येतो, पण त्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यावर १ टक्का युरियाचे पाणी शिंपडावे व नंतर तो मुरघास पौष्टिक असतो.
३. फक्त डाळवर्गीय चा-याचा मुरघास करण्यासाठी त्यावर एक ते दीड टक्के गुळाचे पाणी शिंपडावे. तिन्ही प्रकारचे मुरघास संतुलित, पौष्टिक व चवदार बनतात.
गव्हाणीचा वापर : शक्यतो चारा गव्हाणीत खाऊ घालावा. गव्हाण माती, चुना, सिमेंट, विटा, दगडाची, झाडाच्या ओंडक्याची, तक्त्याची / लाकडी फाळयाची करता येते किंवा पोते, टोपले, डाली वापरुनही चारा वाया जाणार नाही अशा रितीने खाऊ घालावे. यामुळे सर्वसाधारण ६ – ८ जनावरांमागे १ जनावाराचा चारा वाचतो. (१५ टक्के चा-याची बचत होते).