Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

  जनावरांमध्ये लाळया खुरकृतचा प्रादुर्भाव; असा आहे उपाय

पाळीव जनावरे निरनिराळया रोगांनी आजारी पडतात. आजारी जनावराला प्रत्येक वेळी ताबडतोब पशुवैद्यकाची मदत मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत पशुपालकास जनावरांना होणारे सर्व सामान्य रोग व त्यावरील प्राथमिक उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाय माहिती असल्यास जनावरातील मृत्युचे तसेच अनुउत्पादकाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. जनावरांत सर्व साधारणपणे आढळणारे रोग खालील प्रमाणे आहेत.

(१) हगवण : हगवणीचे प्रमाण नवजात वासरात जास्त आढळते. विशेषत: म्हशीच्या वासरामध्ये हगवणीमुळे होणा-या मृत्युचे प्रमाण जास्त आढळुन आले आहे. ज्या वासरांना जन्मानंतर एका तासाच्या आत चिकाचे दुध मिळत नाही, अशी वासरे हगवणीमुळे दगावण्याची शक्यता जास्त असते,  हा रोग जिवाणुमूळे होतो. कुजलेले अन्न खाणे, घाणेरडे पाणी पिणे किंवा हिरवा चारा प्रमाणाबाहेर खाणे यामुळेही रोग होण्यास चालना मिळते. या रोगाने आजारी असलेले वासरु करडी, पांढरी संडास करते. दुध पीत नाही, अशक्त होत जाते. त्याचे डोळे खोल जातात व शेवटी ते मृत्युमूखी पडतात.

उपाय : आजारी जनावराला इतर जनावरांपासुन वेगळे ठेवावे. वासराला सल्फाडीमिडीन किंवा नेफ्टीनच्या १ ते २ गोळया तीन दिवस दयाव्यात. मोठया जनावराला खडुची पावडर १०० ग्रॅम, कात ३० ग्रॅम व डिंक १५ ग्रॅम पाण्यात मिसळुन पाजावे. वासराला ग्लुकोज, साखर किंवा इलेक्ट्रोल पावडर पाण्यात मिसळुन ते पाणी दिवसातुन ५ ते ७ वेळेतस पाजावे.

(२) पोटफुगी : जनावराने हिरवे गवत प्रमाणाबाहेर खाल्यास किंवा जनावराच्या खाद्यात अचानक बदल केल्यास पोटफुगी उदभवते.  या रोगामध्ये जनावराची डावी कूस नगा-यासारखी फुगते, ते बेचैन होते. खाणे व रवंथ करणे बंद करते, सारखे ऊठबस करते व पोटावर लाथा मारते. वेळीच उपाय योजना न केल्यास श्सवनेंद्रियावर असहय दाब पडुन जनावर प्राणावायु अभावी मृत्युमूखी पडते.

उपाय : मोठया जनावाराला ३० ते ६० मि.ली. टर्पेन्टाईन तेल अर्धा लिटर गोडतेलात मिसळुन ते मिश्रण तोंडावाटे हळुहळु पाजावे किंवा अर्धा लिटर गोडतेल तोंडावाटे पाजावे.

(३) स्तनदाह : या रोगात कास दगडासारखी टणक होते. त्यामुळे या रोगाला दगडी असेही म्हणतात.  यात कसेला सुज येऊन कास लाल होते. सडातील दुध अतिशय पातळ किंवा लालसर तर कधी पुमिश्रीत येते. जनावर कासेला हात लावु देत नाही.

उपाय : ज्या सडातुन खराब दुध येते त्या सडातील संपुर्ण दुध काढुन टाकावे व त्या सडात प्रतिजैविकाची टयुब सोडावी, असे किमान ४ ते ५ दिवस करावे. दुध काढण्यापुर्वी कास सेव्हलॉनच्या द्रावणाने धुवून सडावर काही जखमा असल्यास त्यांची योग्य ती देखभाल करावी.

(४)  फ-या : हा एक जीवाणुपासुनच होणारा रोग वयाच्या दोन वर्षापर्यंतची जनावरे या रोगाला जास्त प्रमाणात बळी पडतात, हा रोग अचानक उदभवतो. जनावराला खुप ताप येतो, ते लंगडु लागतात. त्यांचा खांदा किंवा पुठठा सुजतो व तेथे दाबलयास करकर असा आवाज येतो व जनावर १ – २ दिवसात मृत्युमूखी पडते.

उपाय : या रोगावर तातडीने पशुवैद्याच्या सहायाने उपचार करणे आवश्यक आहे. प्रतिजैविकाची इंजेक्शन पशुवैदयकाच्या सल्याने दयावीत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन दरवर्षी पावसाळयाच्या सुरुवातीला जनावरांना लस टोचुन घ्यावी.

(५) घटसर्प : हा जीवाणुजन्य रोग आहे. घटसर्प झालेले जनावर अचानक आजार पडते. खाणे पिणे बंद होवुन त्याला खुप ताप येतो. त्यांच्या जबडयाखाली सुज येते. जनावर लाळ गाळु लागते व त्याच्या घशातुन घरघर असा आवाज येतो. त्याला श्सवनास त्रास होऊ लागतो व जनावर १ ते २ दिवसात मृत्युमुखी पडते.

उपाय : या रोगावर पशुवैदयकाकडुन तातडीने उपचार करुन घेणे आवश्यक आहे. सल्फा आणि टेट्रॉसायक्लीनची इंजेक्शने ४ ते ५ दिवस दयावीत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन दरवर्षी पावसाळयापुर्वी जनावरांना लस टोचुन घ्यावी.

(६) लाळया खुरकूत : हा एक विषाणुजन्य रोग होय. या रोगाचा अत्यंत त्वरेने फैलाव होऊन गावातील बहुसंख्य गाई – म्हशी व बैलांना एकाचवेळी रोगाची लागण झाल्याचे आढळुन येते. या रोगात जनावरांच्या तोंडात व खुरात जखमा होतात व त्यामुळे जनावर चारा खाऊ शकत नाही. लाळ गाळते व लंगडते, त्याला ताप येतो व वेळीच औषधोपचार न केल्यास खुरात अळया पडतात.

उपाय : जनावरांच्या जखमांना बोराग्लिसरीन लावावे तर खुरातील जखम टर्पेन्टाईनने धुवून त्यावर जंतुनाशक मलम लावावे. तसेच जनावरांच्या जखमाना बोराग्लिसरीन लावावे तर खुरातील जखम टर्पेन्टाईनने धुवून त्यावर जंतुनाशक मलम लावावे. पशुवैद्यकाच्या सहायाने ५ ते ६ दिवस प्रतिजैविकाची इंजेक्शने दयावीत. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी गुरांचे गोठे सोडयाने किंवा फिनॉईलने धुवावेत. आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासुन वेगळे ठेवावे. जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पाजु नये. प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जनावराला या रोगावरील प्रतिबंधात्मक लस टोचुन घ्यावी.

(७) रेबिज (पिसाळणे) :हा एक विषाणुजन्य रोग असुन यावर निश्चीत अशी औषध योजना नसल्यामुळे या रोगाची लागण झाल्यास जनावर किंवा मनुष्य निश्चितपणे दगावतो. यामुळे मुळातच हा रोग होऊ नये म्हणुन काळजी घेणे आवश्यक ठरते. मुख्यत : कुत्रा – लांडगा व कोल्हा यांना हा रोग होतो व त्यांच्या चावण्यामुळे इतर जनावरांत पसरतो. पिसाळलेले कुत्रे चावल्यापासुन लक्षणे दिसेपर्यंतचा कालावधी अत्यंत अनियमित असुन चावल्यामुळे झालेली जखम मेंदुपासुन किती दुर आहे यावर अवलंबुन असते. हा रोग दोन प्रकारात आढळतो.

. सुस्त प्रकार : यात कुत्रा शुन्यात नजर लावून बसतो व मालकाला ओळखत नाही. चालतांना त्याचे मागील पाय एकमेकांत अडखळतात व झोक जातो. कुत्रयाचे शेपुट लुळे पडते. तोंडातुन सतत लाळ गळते. कुत्रा ओरडु शकत नाही व शेवटी त्याचे संपुर्ण शरीर लुळे पडुन ३ – ४ दिवसात मृत्यु ओढवतो.

. आक्रमक प्रकार : कुत्र्याच्या वागणुकीमध्ये अचानक बदल होतो. धन्याला ओळखत नाही. तो अतिसंवेदनशील होतो त्याचा आवाज घोगरा होतो. थोडा आवाज झाल्यास आवाजाच्या दिशेने तो पळत सुटतो. इतर जनावरांवर व माणसांवर विनाकारण धावुन जातो व त्यांना चावतो. कुत्र्याचे शरीर हळुहळु ३ – ४ दिवसांत लुळे पडते व तो मृत्यु पावतो.

उपाय : एकदा रेबिजची लक्षणे दिसु लागल्यास हा रोग बरा करता येत नाही पिसाळलेले कुत्रे जनावराला चावल्यास जखम ताबडातोब साबणाने धुवून टाकावी. नंतर जखमेवर नायट्रिक आम्ल किंवा कार्बोलिक आम्ल टाकून जखम जाळुन टाकावी व त्वरीत पशुवैदयकाच्या सहायाने जनावरांना लस टोचणीस सुरुवात करावी. या रोगाचा फैलाव होवु नये म्हणुन पाळीव कुत्रयांना रोगप्रतिबंधात्मक लस टोचुन घ्यावी. तसेच रस्तोरस्ती फिरणारी बेवारशी कुत्री नष्ट करावीत. आपले पाळील जनावर पिसाळलेले आहे, असे वाटल्यास त्याला इतर जनावरांपासुन दुर बांधुन ठेवावे. अशा प्रकारे पशुपालकाला विविध रोगांबददल प्राथमिक माहिती असल्यास तो आपल्या पशुधनाची योग्य प्रकारे काळजी घेवु शकेल यात दुमत नाही.

पशुधनासाठी व्यवस्थापन लसीकरण व रोग नियंत्रण कार्यक्रम :

(१)   नवजात वासरांना गाईचा / म्हशीचा चीक (व्याल्यानंतर पहिल्या ३ दिवसातील कच्चे दुध) वासराच्या जनावरांच्या किमान दहा टक्के (दर २४ तासाला) आणि जन्मल्याबरोबर जेवढया लवकर होईल तेवढा लवकर पाजणे आवश्यक आहे.

(२)   घटसर्प / फ-या या दोन्ही रोगाची लस वयाच्या चौथ्या महिन्यात व त्यानंतर दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात दयावी.

(३)  लाळया खुरकूत रेागाची पॉलिव्हॅलंट लस देशी वासरांसाठी वयाच्या ६ व्या महिन्यात व संकरित वासरांसाठी वयाच्या तिस-या महिन्यात व त्यानंतर दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात देणे आवश्यक आहे. एखादया भागात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर पशुवैद्यकाच्या सल्‍ल्‍यानुसार मोनोव्हॉलंट, ए/ओ/एशिया – १ किंवा ए-२२ एमएमडी लस टोचवावी.

(४)   बुळकांडी रोग महाराष्ट्रात सध्या आढळत नाही व त्यावरील लसीकरणही बंद करण्यात आले आहे. पण काही गुरांना पिचकारी सारखी हगवण, ताप येणे व तोंडात व्रण येणे अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब पशुवैद्यकांना कळवावे.

(५)   फाशी (काळपुळी किंवा ॲन्‍थ्रॅक्स) रोगाचा प्रादुर्भाव आपल्या भागात असल्यास फाशी रोगाची लस दयावी.

(६)   सर्व दुभत्या गाई, म्हशी, शेळया व मेंढया विकत आणल्यावर सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेलोसिस) होऊ नये म्हणुन रक्‍त तपासणी करावी.

(७)   सर्व लहान वासरे, करडे यांना वयाच्या दुस-या महिन्यापासुन दर तीन महिन्यांनी जंतुनाशके पाजण्याचा कार्यक्रम राबवावा.

 

कृमिनाशक औषधी पाजण्याचे (डिवर्मींग) चे वेळापत्रक

 

कृमीचा प्रकार वेळापत्रक
. गाय व म्हैस
. गोलकृमी पहिली मात्रा वासराच्या वयाच्या १० व्या दिवशी व नंतर प्रत्येक महिन्यास, ६ महिने वयापर्यंत, वर्षातुन सर्वसाधारणपणे तीन वेळेस ६ महिन्यापेक्षा जास्त वयाच्या गुरांसाठी
. यकृत कृमी रोगाची लागण असलेल्या क्षेत्रामध्ये वर्षातुन दोन वेळेस (पावसाळयापुर्वी व नंतर)
. पट्टकृमी वर्षातुन दोन वेळेस वासरांसाठी (मोठया गुरांसाठी नाही) जानेवारी व जुनमध्ये
. शेळी व मेंढी
. गोलकृमी महिन्यातुन एक वेळेस ६ महिने वयापर्यंत दोन महिन्यातुन एक वेळेस ६ ते १२ वयोगटासाठी वर्षातुन तीन वेळेस म्हणजेच जुन, ऑक्टोबर व मार्च (१ वर्ष आणि त्यापेक्षा मोठया शेळी व मेंढीसाठी)
. यकृत कृमी रोगाची लागण असलेल्या क्षेत्रामध्ये वर्षातुन दोन वेळेस
. पटटकृमी कोकरु व करडांसाठी जानेवारी व जुन महिन्यामध्ये

 

(८)   उवा, गोचीड व गोमाशी यापासुन संरक्षण करण्यासाठी जनावरांची व गोठयाची नियमितपणे किटकनाशकाने फवारणी पशुवैद्याच्या सल्‍ल्‍याने करावी.

Exit mobile version