Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

ऊस लागवडीची सुधारित पद्धत

यांत्रिकीकरण व आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. बेणे प्रकारानुसार डोळा पद्धतीचाही अवलंब करता येईल. ऊस पिकासाठी कोणत्या प्रकारची जमीन असावी, उसाची कोणती जात निवडावी, बेण्यांची निवड, बेणे छाटणी, बेणे प्रक्रिया, लागवड पद्धत आदींविषयी माहिती देणारा हा लेख…

जमिनीची निवड
ऊस लागवडीसाठी १ मीटर खोली असलेली, मध्यम ते भारी पोताची निचरायुक्त जमीन निवडावी. हेक्टरी २० टन शेणखत द्यावे. १० टन जमीन तयार करताना व १० टन लागवडीच्या वेळी द्यावे. चोपण जमिनीसाठी ५-१० टन जिप्सम प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे. हेक्टरी ४०-६० किलो युरिया, ५० टक्के ७५ किलो एसएसपी व ५ किलो जिवाणू खत द्यावे.

लागवड हंगाम व उसाच्या जाती (वाण)
पूर्व हंगाम (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) –
कोसी ६७१, कोसी ८०१४, कोसी ८६०३, कोसी ७८१९, कोसी ७४०, कोसी ९४०१
सुरू हंगाम (जानेवारी ते फेब्रुवारी) –
कोसी ८९०३, कोसी ६७१, कोसी ७५२७, कोसी ७४०, कोसी ९४०१२, कोसी ४३४
आडसाली (जुलै ते ऑगस्ट) –
कोसी ८६०३२, कोसी ८०१४, कोसी ६७१, कोसी ७२१९, कोसी ७४०
खोडवा –
कोसी ८६०३२, कोसी ६७१, कोसी ७२१९, कोसी ७४०

बेणे निवड
* उसाचे बेणे जाड, रसरशीत, जोमदार असावे.
* ऊस लागवडीच्या वेळी, बेण्याचे वय १०-११ महिने असावे.
* बेणे रोग व कीडमुक्त असावे.
* मुळ्या फुटलेला, पांग फुटलेला व तुरा आलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये.
* डोळ्यांची वाढ चांगली (पूर्ण झालेली नसावी) व डोळे फुगीर असावेत.
* खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये.
* डोळे जास्त जुने व निस्तेज नसावेत. जास्त वयाचे बेणे वापरणे भाग पडत असेल तर बुडाकडील जुन्या कांड्या काढून टाकाव्यात. कारण त्याचे डोळे कठीण व तपकिरी रंगाचे झालेले असावेत. हिरवट रंगाचे डोळे असलेला उसाचा वरचा भाग घ्यावा.

ऊस बेण्यांची घ्यावयाची काळजी
* पाचट काढू नये.
* बेणे तीक्ष्ण धारेच्या कोयत्याने तोडावे व कोयता अधूनमधून फिनेलच्या द्रावणात बुडवून निर्जंतूक करावा.
* शिळे झाल्यास ५०० ग्रॅम चुना २०० लिटर पाण्यात लागणीपूर्वी २४ तास अगोदर बुडवून नंतर बेणे प्रक्रिया करावी.

बेणे निवडीचे फायदे
* बेण्याची उगवण ९० टक्क्यांपेक्षा जास्त होते. खर्चात बचत होते.
* तोडणीच्या वेळी वजनदार उसाची एकरी संख्या ४५,००० ते ९०,००० पर्यंत राहते.
* खत, पाणी व मशागतीस ऊस चांगला प्रतिसाद देतो.

बेणे छाटणी
* दोन डोळ्यांच्या बेणे टिपर्‍या धारदार कोयत्याने कराव्यात.
* बेणे टिपरी तयार करताना बुडक्याकडील बाजूच्या डोळ्याचा खालचा भाग २/३ ठेवावा व शेंड्याच्या बाजूच्या डोळ्याचा वरचा भाग १/३ ठेवून बेणे टिपरी तोडावी.

बेणे प्रकिया
* लागवडीपूर्वी ५०० ग्रॅम चुना २०० लिटर पाण्यात २४ तास अगोदर बुडवून नंतर बेणे प्रक्रिया करावी.
* एक किंवा दोन डोळ्याची टिपरी १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम (बाविस्टीन/नेकेस्टीन) १०० लिटर पाण्यात व ३०० मि. लि. मॅलॉथियान द्रावणात मिसळून १०-१५ मिनिटे बुडवून लावावीत.
* ५० लिटर पाण्यात + ५ किलो बायोबा मिसळून रबडीयुक्त द्रावण करावे. (एक टन बेण्यासाठी)

ऊस लागवडीच्या पद्धती
(जमिनीतील ओलाव्यानुसार)
कोरडी लागण
मध्यम ते भारी जमिनीत २ ते ३ इंच खोल व योग्य अंतरावर टिपरी लावून मातीने झाकून घ्यावे. नंतर २ ते ३ वेळा हलके पाणी द्यावे.

फायदे
* बेणे योग्य खोलीवर व अंतरावर लावता येते.
* उगवण १०-२० दिवसांत पूर्ण होते.
* लवकर उगवणीने कोंब जोरदार येतो.
* एकरी उसाची संख्या ४५,००० राखण्यास मदत होते.
* उत्पन्नात वाढ होते.

ओली लागण
हलक्या जमिनीत अशी लागवड करावी. सरीमध्ये पाणी देऊन पाण्यातच सरीच्या चळीत २-३ इंच खोलीवर बेणे टिपरी दाबून लावावी.

बेणे डोळा लागवड पद्धत
(टिपरीवरील डोळ्यांच्या संख्येनुसार)
उसाच्या संख्येचा विचार करता १ चौरस फुटात १ ऊस असावा.
१ एकर = ४३,५६० चौरस फूट, एकरी ४३५६० = ४५०००

तीन डोळा टिपरी (पारंपरिक पद्धत)
या पद्धतीत बेणे जास्त लागते. खर्च जास्त येतो. एकरी ४५००० ऊस संख्या राखता येत नाही. ऊस जाडीस लहान पडतो, उत्पन्नात घट येते.

दोन डोळा टिपरी
दोन डोळ्याच्या टिपर्‍याची लागण करताना दोन टिपर्‍यांतील अंतर ६ ते ८ इंच (१५ ते २० सें. मी.) ठेवावे व बेणे टिपरीचे डोळे वरंब्याच्या बाजूस राहतील असे मातीत दाबावे. पट्टा पद्धतीत- एकरी ७००० ते ८५०० टिपरी.

फायदे
* ३३ टक्के बेणे व खर्चात बचत होते.
* दर एकरी अपेक्षित उसाची संख्या राखता येते.
* सर्व लागवड हंगामात लागणीस योग्य.

एक डोळा टिपरी
लागण १ फूट व १.५ फूट अंतरावर सरीस आडवी करावी. आडसाली व पूर्व हंगामासाठी ही पद्धत योग्य आहे. सुरू हंगामात जास्त तापमान, पाण्याची कमतरता व खोड किडीचा प्रादूभार्र्व यांमुळे नांग्या पडून उत्पन्नात भर पडते. एकरी ९,००० एक डोळा बेणे लागते. फुटवे वाढविण्यासाठी जाड कोंब दीड महिन्यांनी मोडावा.

फायदे
* ६६ टक्के बेणे लागते व खर्चात बचत होते.
* काळजी घेतल्यास एकरी ४५,००० ऊस संख्या मिळते.
* ऊस जाडीस चांगला पोसतो व उत्पन्नात वाढ होते.

तोटे
* टिपरी तयार करताना जास्त काळजी घ्यावी लागते.
* नांग्या पडण्यास न भरल्यास उत्पन्नात वाढ

ऊस पुनर्रोप लागवड
लागवडीपूर्वी १ ते १.५ महिने अगोदर एक डोळा बेणे वरीलप्रमाणे तयार करून लागवडीच्या वेळी ४५ रोपांची, खत दिलेल्या सरीत पुनर्रोप लागवड करावी. जमिनीत करावयाच्या आराखड्यानुसार ऊस लागण करावी. पारंपरिक पद्धतीत दोन सरीतील अंतर २.५ ते ३ फूट ठेवून कट वाफा (७ बाय ७/१० बाय १० मीटर) पद्धतीने वाफे तयार करून लागण करतात.

तोटे
* पाण्याचा जास्त वापर करावा लागतो.
* आंतरपीक घेण्यास अयोग्य, घेतल्यास उत्पन्नात घट येते.
* पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही.

लांब सरी पद्धत
* दोन सर्‍यांतील अंतर ४ ते ४.५ फुटांपर्यंत ठेवावे.
* लांबी ४०-६० मीटर ठेवावी.
* पाणी देताना २-० सर्‍यांना एकत्र पाणी द्यावे.

फायदे
* पिकास आवश्यक तेवढेच पाणी देता येते.
* पिकाची वाढ जोमदार होते, उत्पन्नात वाढ होते.
* जमिनी खराब होण्याचे प्रमाण कमी होते.
* यांत्रिकीकरणास ही पद्धत योग्य आहे.

पट्टा पद्धत/जोड ओल पद्धत (२.५ बाय ५ फूट) (३ बाय ६ फूट)
एक किंवा दोन सरी आड पट्टा ठेवून उसाची लागवड करावी. रिजर अथवा ट्रॅॅक्टरच्या सहाय्याने तीन फूट अंतरावर सर्‍या सोडाव्यात. ऊस लागण करताना दोन सर्‍यात लागण करावी व एक सरी मोकळी सोडावी. सरीचा पट्टा सहा फूट रुंदीचा राहतो, तो आंतरपीक लागवडीसाठी वापरता येतो.

पट्टा पद्धतीचे फायदे
* भरपूर सूर्यप्रकाश, खेळती हवा मिळते.
* आंतरपिकाचे बोनस उत्पन्न मिळते.
* ठिबक सिंचन पद्धतीसाठी योग्य.
* पाटाने पाणी दिल्यास पाण्यात बचत होते.
* रिकाम्या जागेमुळे पीक संरक्षण चांगले होते.
* तणाचा प्रादूर्भाव कमी होते.
* यांत्रिकीकरणासाठी योग्य पद्धत.
* खोडवा ठेवल्यास पाचट आच्छादनासाठी योग्य पद्धत.

रुंद सरी पद्धत
दोन सरीतील अंतर ५ फूट ठेवावे व सरीची लांबी ४० ते ६० मीटर ठेवावी. दोन डोळा किंवा एक डोळा पद्धतीची लागण करावी.

फायदे
* सरीतील अंतर जास्त असल्याने ऊस भरण्याचे प्रमाण कमी असते.
* वाढ जोमदार होते.
* उत्पन्नात वाढ होते.

आंतरमशागत
बाळ बांधणी

ऊस लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांनी बाळ बांधणी करावी. अवजाराने किंवा मजुराच्या सहाय्याने उसाच्या बुडाला ३ ते ४ इंच माती लावावी.

फायदे
* फुटवे वाढण्यास मदत होते.
* खताचा दुसरा हप्ता माती आड करता येतो.
* खोड किडीचे व तणाचे नियंत्रण करता येते.

मोठी बांधणी
लागणीनंतर चार ते साडेचार महिन्यांनी उसाच्या बुंध्याशी असलेली वाळलेली रोगर पाने उशिरा आलेले फुटवे काढून टाकावेत. सरीत शिफारशीतील खताची शेवटची मात्रा देऊन काढलेले पाचट सरीआड पसरावे.

फायदे
* खताच्या मात्रा मातीआड करता येतात.
* फुटवे कमी करण्यास मदत होते.
* जुनी मुळे काढली जातात, नवीन मुळांची वाढ चांगली होते.
* जमिनीत हवा खेळती राहते.
* तण नियंत्रण होते.
* ऊस तोडण्याचे प्रमाण कमी होते.

आंतरपिके
आडसाली उसामध्ये

भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, पाखड, राई, कोथिंबीर, मेथी, कांदा ताग
पूर्व हंगामी उसामध्ये
कोबी, फूलकोबी, कांदा, बटाटा, हरभरा, गहू, पालक, मेथी, ताग
सुरू उसामध्ये
भुईमूग, सोयाबीन, पालक, गवार, ताग, काकडी, कलिंगड इत्यादी आंतरपिके घ्यावीत.

घ्यावयाची काळजी
आंतरपीक हे ४ महिन्यांच्या आत निघणारे असावे. जास्त उंचीचे व जास्त पसरणारे नसावे. मुख्य पिकाव्यतिरिक्त खताच्या मात्रा द्याव्यात. आंतरपिकास व ऊस पिकास योग्य त्या तणनाशकाची निवड करून वेगवेगळ्या फवारण्या कराव्यात.

फायदे
* आंतरपिकाचे पूरक उत्पन्न मिळते.
* जमिनीचा ओलावा पुरेपूर वापरला जातो.
* तणांचा बंदोबस्त करण्यास मदत होते.
* बांधणीच्या वेळी आंतरपिकाचा पालापाचोळा गाडावा, सेंद्रिय खत म्हणून वापरावा.

खत व्यवस्थापन
सेंद्रिय खताचा वापर

ऊस पिकासाठी साधारणतः हेक्टरी २० टन किंवा कम्पोस्ट खताचा वापर करावा. पूर्वमशागतीच्या वेळी हेक्टरी १० टन शेणखत शेतात पसरून नांगरट करून चांगले मिसळावे. नंतर ऊस लागणीअगोदर राहिलेले हेक्टरी १० टन शेणखत व रासायनिक खताचा पहिला हप्ता द्यावा.

फायदे
* सेंद्रिय खतामुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते.
* जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
* निचरा सुधारतो. जिवाणूंची वाढ होते.
* रासायनिक खताचा कार्यक्षमतेने वापर होतो. याशिवाय हिरवळीची खते, प्रेसमककेक, कोंबडी खत, बार्पोकम्पोस्ट उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी, पाचटाचे आच्छादन होते.
* गांडूळ खत २ टन प्रति एकर, शेणखतात मिसळून वापरावे.

रासायनिक खतांचा वापर
शास्त्रीय दृष्टिकोनातून रासायनिक खताचा वापर केला जात नाही. किफायतशीर वापर होण्यासाठी खताचे योग्य प्रकार निवडावेत. नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे ठरते.

खताची योग्य निवड
ऊस पिकास दुसर्‍या व तिसर्‍या खताच्या हप्त्याच्या वेळी फक्त नत्रयुक्त खते द्यावीत. मिश्रखते, ऊस लागणीच्या वेळी आणि मोठ्या बांधणीच्या वेळी देणे योग्य आहे. युरिया, एस. एस. पी. आणि एम. पी. यांसारखी खते योग्य प्रमाणात मिसळून घ्यावीत. खारवट व चोपण जमिनीसाठी सरल खतांची निवड करावी.

मायक्रोबाची मात्रा
पहिली फवारणी १० व्या आठवड्यात एकरी ५०० मि. लि. २०० लिटर पाण्यात करावी.
दुसरी फवारणी १५ व्या आठवड्यास करावी.
तिसरी फवारणी २० व्या आठवड्यास करावी.

खते देण्याचा कालावधी
उगवणीसाठी मुळाच्या व अंकुराच्या जोमदार वाढीसाठी स्फूरद व पालाश ५० टक्के या प्रमाणात द्यावे. फुटवे फुटताना व वाढीसाठी ६ ते ८ आठवड्यांना ४० टक्के नत्र, १२ ते १४ आठवड्यांना १० टक्के नत्र, मोठ्या बांधणीच्या वेळी ४० टक्के नत्र द्यावे. खोडवासाठी तोडणीनंतर १५ दिवसांच्या आत ३० टक्के नत्र + ५० टक्के स्फूरद + पालाश, ६ ते ८ आठवड्यांनी ३० टक्के नत्र, मोठी बांधणीसाठी ४० टक्के नत्र + ५० टक्के स्फूरद + पालाश द्यावे.

खते देण्याची पद्धत
खते जमिनीवर पसरून द्यावीत. जमिनीतून देणे फायदेशीर आहे. युरिया व निंबोळी पेंडीची भुकटी ६ः१ या प्रमाणात मिसळावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे व मिश्रण चांगले घुसळून घ्यावे. नत्रीकरण मरगतीने होते व त्यातील नत्र पिकास योग्य प्रमाणात हळूहळू उपलब्ध होते. २५ टक्के युरियाची बचत होते. स्फूरद खते मुळाच्या सान्निध्यात किंवा कम्पोस्ट खतात मिसळून द्यावीत. सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत.

पाणी व्यवस्थापन
पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन व व्यवस्थापन करावे. योग्य प्रमाणात पाणी वापरून कमीत कमी पाण्यात व खर्चात जमिनीची सुपिकता व उत्पादनक्षमता कायम ठेवून अधिकाधिक उत्पादन कसे मिळविता येईल हे पहावे. ऊस पिकास पाणी देण्याची पद्धत, पाणी केव्हा द्यावे व प्रत्येक भरणीच्या वेळी किती पाणी द्यावे, या तीन बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

लांब सरी पद्धत
हलकी जमीन असल्यास सर्‍यांची लांबी ३० मीटर, मध्यम जमिनीत सर्‍यांची लांबी ५० मीटर ठेवावी. हलक्या जमिनीत पाणी लवकर मुरते. त्यामुळे पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर कमी करावे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास एका वेळी एकाच सरीत पाणी न देता दोन ते तीन सर्‍यांमध्ये प्रवाह सारख्या प्रमाणात विभागून द्यावा. बाष्पीभवन विरोधी आच्छादनाचा (उसाचे पाचट/पालापाचोळा हेक्टरी ८ ते १० टन) वापर केल्यास बाष्पीभवन कमी होते. लेओबीन (१४ टक्के) बाष्पीभवन विरोधी द्रावणाच्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात. उन्हाळ्यात ८-१० दिवसांनी, हिवाळ्यात १२-१५ दिवसांनी, तर पावसाळ्यात १५-२० दिवसांनी फवारण्या कराव्यात.

ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे
उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होते. पाण्याची ३५ ते ५५ टक्क्यांपर्यंत, तर खताच्या मात्रेत ३० टक्के बचत होते. तणांचा प्रादूर्भाव कमी व पर्यायाने खुरपणीचा व तणनाशकांचा खर्च कमी होतो. रान बांधणीची आवश्यकता नाही. पिकाच्या गरजेनुसार पाणी दिल्यामुळे कालांतराने जमीन नापीक होण्याची शक्यता नाही.

– डॉ. एस. बी. पवार

Exit mobile version