असे करा व्यवस्थापन टोमॅटोवरील कीड व रोगांचे

शरीरासाठी पोषक असलेल्या अ, ब आणि क जीवनसत्वांसह चुना, लोह व विविध प्रकारच्या खनिजांनी संपन्न असलेल्या टॉमेटोला वर्षभर मागणी असते. या पिकांवर करपा, फळसड, भुरी, मर, देवी आदी विषाणूजन्य रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रोगांच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते. त्यासाठी पुढीलप्रमाणे एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन करावे.

करपा (अर्लीब्लाईट/लेट ब्लाईट) व फळसड
लवकर येणारा करपा सोलॅनी नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाने सुरुवातीस जमिनीलगतच्या पानांवर गोलाकार किंवा आकारहीन वलयांकित तपकिरी काळपट ठिपके येतात. हे ठिपके एकमेकांत मिसळून चट्टे तयार होतात. करपलेली पाने गळून फांद्या कमकुवत होऊन मोडतात. तसेच फळांवरही नंतर असेच डाग पडतात. उशिराचा करपा फायटोप्थेरा बुरशीमुळे होतो. या रोगाने पानथळ ते फिक्कट तपकिरी रंगाचे ठिपके पाने, खोड, फांद्या व फळांवरही येतात. ढगाळ हवामानात हा रोग वाढतो. यामुळे बुरशीची वाढ वेगाने होते. तसेच पाने, फांद्या व फळे सडतात. जमिनीतून होणार्‍या दोन्ही करपा रोगांचा प्रसार किटकांमार्फत होतो. हवेतील आर्द्रता वाढल्यास फळसड रोगाचा प्रादूर्भावही वाढतो. या बुरशीजन्य रोगात हिरव्या फळांवर पुढच्या टोकाला तपकिरी डाग दिसतात. हे डाग वाढून फळांचा गर रंगहीन होऊन फळे सडतात. जमिनीसह सदोष बियाण्यांतून होणार्‍या या रोगाचा प्रादूर्भाव हवा व पाण्यामार्फतही होतो. तसेच फळांच्या देठास किंवा काळपट डांगांमुळे फळसड होते.

नियंत्रण : टोमॅटोनंतर बटाटा, मिरची, वांगी किंवा पुन्हा टोमॅटो घेऊ नयेत. निरोगी बियाणे वापरून पेरण्यापूर्वी ३ ग्रॅम कॅप्टन किंवा थायरमसह ६ ग्रॅम मेटॅलॅक्झिल
३५ टक्के बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. लागवडीच्या वेळी एकरी २ किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखतासह द्यावी. लवकरचा करपा दिसताच झाडाचा रोगग्रस्त भाग जमिनीत गाडून नष्ट करावा. रोगाची लक्षणे दिसताच २५ ग्रॅम मँकोझेब व १० मिली टेब्यूकोनॅझोल या बुरशीनाशकांची १० लिटर पाण्यातून दहा दिवसांच्या अंतराने चार फवारण्या द्याव्यात. उशिराचा करपा व फळसड रोगाच्या नियंत्रणासाठी या बुरशीनाशकांव्यतिरिक्त मेटॅलॅक्झिल एम. झेड. ७२ किंवा फोसेटील ए. एल. प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून आवश्यकतेनुसार आलटून-पालटून फवारावेत.

भुरी
लव्हेलुला टावरिका बुरशीची पानांच्या वरून-खालून वाढ होते. पिठाप्रमाणे दिसणार्‍या या बुरशीमुळे पाने पिवळी पडून गळतात. नियंत्रणासाठी २५ ग्रॅम पाण्यात मिसळणारा गंधक अथवा डिनोकॅप/ट्रायडेमॉर्फ/ट्रायडिमेफॉन/टेब्युकोनॅझोल/पॅकानाझोल ५-१० मिली किंवा ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून आलटून-पालटून १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

मर रोग
बुरशी व जिवाणूजन्य मर रोगामुळे झाडे खालून वरपर्यंत पिवळे पडून झाडांची वाढ खुंटते. कोमेजलेल्या झाडांचा रंगही उडतो. या रोगाची लक्षणे दिसताच ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड/कॅप्टन अथवा १० ग्रॅम ब्रोमिल/कार्बेन्डॅझिम १० लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड ५० ते १०० मिली या प्रमाणात बुंध्याशी गोलाकार ओतावे.

देवी रोग
जमिनीतून होणार्‍या या जिवाणूजन्य रोगामुळे पाने खाली वाळून वाकडी दिसतात. झाडावर फि कीट हिरवे ठिपके व तपकिरी रेषा दिसतात. रोगग्रस्त खोडाला कापल्यास पिवळसर पदार्थ बाहेर येतो. फळांवरही काळे व खडबडीत डाग दिसतात. फळधारणेपासून १०-१५ दिवसांच्या अंतराने १ ग्रॅम स्ट्रिप्टोसायक्लिन अधिक २५ ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड १० लिटर पाण्यातून २-३ वेळा फवारावे. रोगट पाने व फळे तोडून नाश करावा.

विषाणूजन्य रोग
टोमॅटो स्पोटेड विल्ट व्हायरस, पर्णगुच्छ अथवा बोकड्या व मोझॅक हे प्रमुख विषाणूजन्य रोग मोठ्या प्रमाणात आढळतात. टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस  रोगाची सुरुवात प्रथम शेंड्याकडून होते. शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान तांबूस काळसर ठिपके चट्टे दिसतात. रोगाचे प्रमाण वाढून तीन-चार दिवसांत कोवळी पाने करपून काळी पडतात. या रोगाचा प्रसार फुलकिडे  (थ्रिप्स) या किडीमार्फत होतो. पर्णगुच्छ किंवा बोकड्या या विषाणूजन्य रोगाचा प्रादूर्भाव लीफकर्ल व्हायरस या घातक लसीमुळे होतो. बोकड्या रोगामुळे पाने बारीक, वाकडी-तिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात. पानांचा रंग फिक्कट हिरवा पिवळसर होतो. यामुळे झाडाची वाढ खुंटते. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढरीमाशीमुळे होतो. टोमॅटो मोझॅक व्हायरस, कुकुंमबर मोझॅक व्हायरस, पोटॅटो मोझॅक व्हायरस या विषाणूंमुळे टोमॅटोवर मोझॅक रोग आढळून येतो. या रोगामुळे पाने फिक्कट हिरवी होतात. ती बारीक राहून त्यामध्ये हिरवट पिवळसर डाग दिसतात. हा रोग संसर्गजन्य असल्यासमुळे टोमॅटोची  लागवड करताना तसेच आंतरमशागतीची कामे करते वेळी स्पर्शाने आणि मावा या किडीमार्फत रोगाचा प्रसार अतिशय वेगाने होतो.

विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासूनच काळजी घेणे गरजेचे असते. बियाणे पेरण्यापूर्वी कार्बोसल्फान अधिक ट्रायकोडर्मा प्रत्येकी ५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने १५ मिली एन्डोसल्फान किंवा मिथील डेमिटॉन १० मिली किंवा कार्बोसल्फान १० मिली या किटकनाशकांच्या प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.

ब्लॉझम एंड रॉट (फळाच्या टोकाची कूज)
कॅल्शियमची कमतरता असणार्‍या जमिनीत ही विकृती दिसून येते. पाण्याचा कमी-अधिक पुरवठा, तापमानातील फरक, अतिरिक्त नत्राचा डोस, कमी निचर्‍याची जमीन, अमोनिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम यांच्या कमी-अधिक उपलब्धतेमुळे कॅल्शिअमचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे हिरव्या टोमॅटो फळाच्या टोकाला मोठा काळपट डाग पडतो. या विकृतीच्या नियंत्रणासाठी डायकॅल्शियम फास्फेट २ ते ३ ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात जमिनीतून मिसळून द्यावे. याऐवजी कॅल्शिअम क्लोराईड किंवा कॅल्शिअम नायट्रेट प्रत्येकी ५० ग्रॅम १० लिटर पाण्यातून तीन ते पाच दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

– डॉ. ज्ञानेश्‍वर क्षीरसागर
टोमॅटो सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.