सद्य:परिस्थितीत महाराष्ट्रात जास्तीत जास्त भागात कापसाची सलग लागवड करतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती, तसेच रोग आणि किडीचा प्रादूर्भाव यामुळे कापसाचे होणारे नुकसान टाळणे अशक्य आहे; परंतु सलग पिकाऐवजी कापूस आधारित पीकपद्धतीचा शेतकर्यांनी अवलंब केला तर असे होणारे नुकसान काही अंशी टाळता येते व प्रति एकरी शेतकर्यांना पैसेरूपी जास्त फायदा होऊ शकतो.
पीकपद्धतीचे फायदे
* अतिवृष्टी किंवा पावसाचा ताण, तसेच रोग व किडी यामुळे होणारे नुकसान काही अंशी भरून निघते.
* उत्पादनात स्थिरता निर्माण होऊन प्रति एकरी जास्त नफा मिळतो.
* पीकपद्धतीत कडधान्य पिकांचा अंतर्भाव होत असल्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म वाढते.
* आंतर पिकापासून शेतकर्यास लवकर पैसा मिळतो व हा पैसा शेती व्यवहारासाठी मध्यंतरीच्या काळात वापरता येतो.
* थोडक्यात, विविध पीकपद्धतींमुळे उपलब्ध असलेल्या जमीन, पाणी, हवा व प्रकाश यांचा पुरेपूर फायदा होतो.
मागील काही वर्षांत कृषी विद्यापीठ स्तरावर कापूस आधारित पीकपद्धतीवर बरेच संशोधन झाले आहे. या संशोधनातच काही कोरडवाहूसाठी अंतर्गत पीकपद्धती व बागायतीसाठी काही दुबार पद्धतीच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत.
कापूस + सोयाबीन
ही अंतर्गत पीकपद्धत मध्यम ते भारी व हमखास पावसाच्या प्रदेशासाठी शिफारस करण्यात आली आहे. या पीकपद्धतीत कापसाच्या दोन ओळींमध्ये सोयाबीनची एक ओळ म्हणजेच १ः१ या प्रमाणात पेरावी. त्यासाठी कापसाची लागवड ही ९० बाय ६० सें.मी. करावी. दोन ओळींतील अंतर ९० सें.मी. ठेवावे. यामध्ये एक ओळ सोयाबीनची सरत्याने पेरून घालावी. या अंतर्गत पीकपद्धतीसाठी सोयाबीनच्या लवकर तयार होणार्या जाती एमएयूएस-४७ परभणी सोना आणि जेएस-३३५ च्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. सोयाबीन पिकाची शारीरिक पक्वतेला काढणी करावी, जेणेकरून शेंगा फुटण्याचा प्रादूर्भाव कमी होतो.
कापूस + उडीद
वर दर्शविलेल्या आंतर पीकपद्धतीप्रमाणेच या पीकपद्धतीत अवलंब करावा. यासाठी उडीदाच्या टीएयू-१, टीएयू-२ या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. या पीकपद्धतीमध्ये कापसाची जर जोडओळ पद्धतीने लागवड केल्यास दोन जोडओळीमध्ये उडीदाच्या दोन ओळी पेरू शकता येतात.
कापूस + मूग
ही आंतर पीकपद्धतसुद्धा कापूस + सोयाबीन किंवा कापूस + उडीद या अंतर्गत पीकपद्धतीसारखीच घेता येते; पण मुगाचा विस्तार हा उडीदापेक्षा जास्त होतो. या कारणास्तव मुगाच्या एकाच ओळीची म्हणजे १ ः १ प्रमाणाची शिफारस करण्यात आली आहे. या पीकपद्धतीसाठी मुगाच्या एस-८ बीपीएमआर-१४५, बीएम-२००२-०१, कोपरगाव या जाती निवडाव्यात.
कापूस + तूर
कापसाच्या सर्वसाधारण ६ किंवा ८ ओळींनंतर तुरीची १ किंवा २ ओळी घेण्याची ही परंपरागत पद्धत आहे. तुरीच्या १ किंवा २ ओळी घेण्याविषयी काही प्रयोग घेण्यात आले होते. तुरीच्या दोन ओळींऐवजी एकच ओळ घेणे अधिक फायदेशीर आहे. या पीकपद्धतीत तुरीच्या बीएसएमआर-७३६ व ८५३, बीडीएन ७०८ या जाती चांगल्याप्रकारे आढळून आल्या आहेत.
आंतर पीकपद्धतीत खत व्यवस्थापन
आंतर पीकपद्धतीत खत व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे; कारण यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिकांचा अंतर्भाव होतो. सहाजिकच एकाच क्षेत्रावर पिकांना लागणारे अन्नद्रव्यरूपी लागणारे खत हे जास्तच लागणार. त्यासाठी कापसासाठी शिफारस केलेली खताची मात्रा द्यावी व सोयाबीन, उडीद व मूग या पिकांस शिफारस केलेल्या खताच्या मात्रांपेक्षा निम्मी मात्रा द्यावी.
दुबार पीकपद्धत
बागायती परिस्थितीतच ही पीकपद्धत घेता येते. या पीकपद्धतीत कापसानंतर उन्हाळी भुईमूग ही दुबार पीकपद्धत अत्यंत फायदेशीर आहे, असे प्रयोगाअंती आढळून आले आहे. या पीकपद्धती कापसाची संपूर्ण वेचणी डिसेंबरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी व तद्नंतर लगेच भुईमुगाची पेरणी करावी. यासाठी टीएजी-२४, टीएजी-२६ या भुईमुगाच्या जाती घ्याव्यात.
उत्पादन आणि नफा
वर शिफारस केलेल्या आंतर पीकपद्धतीत मुख्य पिकाचे म्हणजेच कापसाचे काही प्रमाणात सलग कापसापेक्षा कमी उत्पादन येते; पण याव्यतिरिक्त आंतरपिकाचे अधिकतर उत्पादन मिळते. जर दोन्ही पिकांचे बाजारमूल्याचे परिमापन पाहिले असता, एकंदरीत प्रति हेक्टर-पासून ४०००-५००० रुपये जास्तीचे उत्पादन मिळते. एकंदरित अंतर पीकपद्धतीतून पैसेरूपी जास्त फायदा तर होतोच, त्याचबरोबर जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक संरचनेत वाढ होऊन जमिनीची सुपिकता वाढते.
– प्रा. दिनेश लोमटे
कार्यक्रम समन्वयक,
कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद
दू. क्र. ०२४०-२३७६५५८