किटकनाशके विकत घेण्यापूर्वी…

पिकांवर रोग आणि कीड येऊन पिकाचे उत्पादन कमी येते. परिणामी, शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळायचे असेल तर किटकनाशके वापरून किडींचे, रोगांचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक असते. किटकनाशके विषारी असल्यामुळे ते विकत घेताना, त्याची वाहतूक करताना, हाताळताना काळजी घेणे आवश्यक आहे.

कीडनाशक खरेदी करताना शिफारस केलेलेच घ्यावे. प्रत्येक कीडनाशकाच्या डब्यावर किंवा पुड्यावर त्याचे रासायनिक आणि व्यावसायिक नाव लिहिलेले असते. त्याची बारकाईने खात्री करून घ्यावी. फुटलेला किंवा मोहोर नसलेला कीडनाशकाचा डबा किंवा पुडा विकत घेऊ नये. वाहतूक करताना प्रचलित नियमांचे आणि कायद्यांचे पालन करावे. वाहतूक मोठ्या प्रमाणावर करावयाची झाल्यास, शक्यतो स्वतंत्र वाहनांमधून करावी. हे शक्य नसल्यास वाहतूक करताना कीडनाशकांचा अन्नपदार्थांशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.

वाहतुकीसाठी कीडनाशकांचे डबे किंवा पुडे व्यवस्थित खोक्यात बंद करावे. वाहतूक साधनात जड सामानाखाली ही खोकी ठेवू नयेत. अन्यथा, कीडनाशकांचे पुडेे अथवा डबे फुटून गळती होईल. वाहतूक करताना कीडनाशकांचा डबा अथवा पुडा फुटला तर सांडलेल्या औषधांवर माती किंवा भुसा टाकावा, म्हणजे त्यात औषध शोषले जाईल. औषधाने माखलेला वाहनाचा भाग पाण्याने स्वच्छ धुवावा. सांडलेल्या कीडनाशकांनी अन्नधान्य भिजले असल्यास ते पुरून अथवा जाळून नाश करावे.

कीडनाशके नेहमी थंड आणि कोरड्या जागी साठवावी. कीडनाशके साठविण्यासाठी जागा शक्यतो स्वतंत्र असावी. अशा जागेस कुलूप लावावे. त्या ठिकाणी लहान मुले आणि पाळीव प्राणी पोहोचू शकणार नाहीत याची काळजी घ्यावी. कीडनाशके आणि खाद्यपदार्थ किंवा अन्नधान्य एकत्र साठवू नयेत. कीडनाशके नेहमी त्यांच्या मूळ डब्यात अथवा पुड्यातच साठवावीत. ती दुसर्‍या कोणत्याही बाटलीत किंवा डब्यात ओतून ठेवू नयेत. साठविलेल्या डब्यांची अधूनमधून पाहणी करून त्यांचे काही नुकसान झाले आहे काय किंवा त्यातून औषधाची गळती होते काय, याची पाहणी करावी. फवारणी/धुरळणीसाठी कीडनाशकांची मात्रा ठरवणे ः कीडनियंत्रणात जी कीडनाशके शिफारस केलेली असतात ती बहुधा प्रवाही, आंतरप्रवाही, भुकटी किंवा दाणेदार स्वरूपात मिळतात. त्यांच्या डब्यावर अथवा पुड्यावर त्याची तीव्रता टक्क्यांमध्ये दिलेली असते. शेतकर्‍यांच्या माहितीस्तव पुढे उदाहरण दिले आहे.

ज्यावेळी शिफारस केलेली तीव्रता टक्क्यांमध्ये न देता किटकनाशकाचा क्रियाशील घटक (किलो) प्रतिहेक्टरी या प्रमाणात दिलेली असल्यास किटकनाशकांची मात्रा काढणे.

उदा. पाच हेक्टर भात पिकात १० टक्के दाणेदार फोरेट १ किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात वापरायचे असेल तर किती फोरेट वापरावे लागेल?

कीडनाशके मिश्रण तयार करताना घ्यावयाची काळजी ः कीडनाशके हाताळताना संरक्षक कपडे आणि रबरी हातमोजे इत्यादी साधनांचा वापर करावा. कीडनाशक ज्या डब्यांतून अथवा पुठ्ठ्यांंच्या खोक्यांमधून विकत मिळतात, त्यावरील कीडनाशके हाताळण्याविषयीच्या सूचनांचे पालन करावे. औषधांचे डबे अथवा खोकी हाताने फोडणे टाळावे. त्यासाठी चाकू किंवा तत्सम साधनांचा वापर करावा. मिश्रण तयार करण्यासाठी खोल भांड्याचा उपयोग करावा. कीडनाशक मिश्रण हातांनी ढवळू नये.

त्यासाठी काठीचा उपयोग करावा. औषध मोजण्यासाठी योग्य साधनांचा उपयोग करावा. फवारणीच्या वेळी लागेल तेवढेच मिश्रण तयार करावे. मिश्रण फार काळ तसेच ठेवू नये. भुकटी किंवा दाणेदार कीडनाशके डब्यातून अथवा पिशवीतून काढण्यासाठी लांब दांडीचा चमचा वापरावा. उघड्या हातांनी ही कीडनाशके डब्यातून काढू नयेत. धुरळणी यंत्राच्या टाकीत विशिष्ट खुणेपर्यंतच भुकटी करावी. फवारणीकरता मिश्रणे तयार करण्यासाठी वापरावयाचे पाणी स्वच्छ आणि गाळलेले असावे म्हणजे नोझल चोंदणार नाही. मिश्रण टाकीत भरताना जाळीचा उपयोग करावा. हे करीत असताना वार्‍याच्या विरुद्ध दिशेला उभे राहू नये आणि मिश्रण अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यावी. मिश्रणासाठी वापरलेली भांडी, औषध मोजण्याची साधने वगैरे इतर कोणत्याही कामासाठी वापरू नयेत. ती पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवावीत. त्यामधून गळती होणार नाही, याची काळजी घ्यावी. कीडनाशकांचे डबे नंतर सुरक्षित जागी ठेवावेत.

(सौजन्य : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)