Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

Video: …म्हणून घटली सोयाबीनची उत्पादकता !

कृषी पंढरी विशेष

यंदाचा खरीप शेतकºयांना त्रासदायक ठरला, तो दोन गोेष्टींमुळे त्यातील पहिली म्हणजे खरिपाच्या तोंडावरच आलेले कोव्हीड-19 साथीचे संकट आणि दुसरे म्हणजे पेरलेल्या सोयाबीनची उगवण न होणे. राज्यात सुमारे 40 लाख हेक्टरवर सोयाबीनचे पिक घेतले जाते. मराठवाडा, विदर्भातील शेतकरी मुख्यत: सोयाबिनकडे वळला आहे.

उत्तर महाराष्ट्रातही सोयाबीनची लागवड होत आहे. यंदा पाऊस चांगला पडला. सुमारे 15 ते 20 हजार रुपये प्रति एकर खर्च करून शेतकºयांनी सोयाबीनच्या पेरण्याही केल्यात. मात्र बियाणे उगवलेच नाहीत. परिणामी खर्च वाया गेल्याने काही शेतकºयांनी आत्महत्या केल्यात, तर अनेकांपुढे दुबार पेरणीचे संकट आहे. महाबीजसह काही खासगी कंपन्यांची ही बियाणे होती आणि त्यांची उगवणक्षमता 25 टक्कयांपेक्षाही कमी असल्याने हा प्रकार घडला. याबद्दल सरकारी पातळीवरून चौकशी वगैरे सोपस्कार सुरू राहतील. पण शेतकºयांचे झालेले नुकसान कसे भरून येणार?

म्हणून घटली उगवणक्षमता

सोयाबीनची उगवणक्षमता नेमकी कमी कशी झाली? याचा उहापोह आजच्या या व्हिडिओतून करणार आहोत. कृषी महाविद्यालय पुणे येथील निवृत्त फार्म अधीक्षक प्रा. भीमराव तुसे यांच्याशी नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. प्रा. तुसे हे एमस्सी (अ‍ॅग्री) आहेत. त्यांचा 33 वर्षांचा अनुभव आहे. ते म्हणाले की तुर, मुग, सोयाबीन सारख्या द्विदल पिकापैकी केवळ सोयाबिन हे असे कडधान्य आहे की त्याचा अंकूर हा टरफलाच्या आवरणाखाली लगेचच असतो. मात्र तुर, मटकी, मुग अशा कडधान्यांत हाच अंकूर बीजाच्या मध्यभागी असतो. त्यामुळे सोयाबीनची वाहतुक करताना त्याची आदळआपट झाल्यास सोयाबीनच्या अंकुराला इजा पोहोचते. पर्यायाने बियाणाची उगवणशक्ती कमी होते. मात्र बियाणे कंपन्यांनी शॉकप्रुफ( बबल्ड बॅग) बॅगमध्ये पॅकिंग केल्यास ही समस्या कमी होईल असेही प्रा. तुसे यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर ठामपणे सांगितले आहे.

या महत्त्वाच्या विषयावर त्यांच्यासोबत केलेल्या बातचितीचा व्हिडिओ आपल्यासाठी इथे देत आहोत.

दरम्यान सोयाबीनच नव्हे, तर कुठल्याही बियाणांची पेरणीपूर्वी उगवणक्षमता तपासणे आवश्यक असते, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी विद्यापीठांतर्फे मे महिन्यात उगवण क्षमता तपासणीची प्रात्यक्षिकेही घेण्यात आली होती. मात्र पुढच्या वेळी शेतकरी पेरणीपूर्वी बियाणांची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करावी असा सल्लाही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

(व्हिडीओ सौजन्य : जितेंद्र भावे, नाशिक )

Exit mobile version