विद्यमान महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोककलांच्या माध्यमातून देण्याच्या मोहिमेस जिल्ह्यात आजपासून सुरुवात झाली आहे.
शाहीर प्रकाश गणपती लोहार यांनी सडोली खालसा, ता. करवीर येथे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे सरंपच आमित मारुती पाटील यांच्या हस्ते व वडणगे, ता. करवीर येथे सरपंच सचिन यशवंत चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
शाहीरी पोवाडा कलामंच यांनी ठिकपुर्ली येथे गावचे सरपंच दत्ता शिवाजी कांबळे यांच्या हस्ते व धामोड, ता. राधानगरी येथे सरंपच अशोक सुतार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आदित्य लोककला मंचच्या माध्यमातून देखील गावांमध्ये गर्दीच्या ठिकाणी लोककला सादरीकरणास आजपासून सुरुवात करण्यात आली.
कोरोना महामारीची साथ असताना महाविकास आघाडी शासनाने दोन वर्षात विविध जनकल्याणकारी निर्णय घेतले आहेत. रात्रीचा दिवस करून कोरोना महामारीत शासनाने नागरिकांना सेवा दिली. कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून नागरिकांच्या जीविताची काळजी घेतली. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, पीक विमा येाजना, शिवभोजन थाळी, दिव्यांगांसाठीच्या योजना, रमाई आवास योजना राबविण्याबरोबरच आपत्ती काळात मदतीचा हात दिला.
शासनाच्या निवडसूचीतील सर्वोत्कृष्ठ तीन कलापथकांमार्फत शासनाच्या विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. लोकांसाठीच्या योजना साध्या, सोप्या भाषेत सांगितल्या की त्या लोकांपर्यंत लवकर पोहोचतात, या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे 9 मार्च ते 17 मार्च पर्यंत कलापथकाचे कार्यक्रम होणार आहेत.
आज पासून कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारपेठा आणि निवडक गावांमध्ये हा लोकजागर होत आहे. शासनाच्या योजना अत्यंत सोप्या व बोली भाषेत लोकगीतं, भारुड, गवळण आदी माध्यमातून पोहचवण्यात येणार आहेत. या लोककला जागराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.