Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

‘हनी मिशन’ योजनेतून स्वयंरोजगाराची संधी

 दर्यापूर तालुक्यातील तरूणीची प्रगतीशील मधकेंद्रचालक म्हणून निवड

‘मधकेंद्र योजने’त मधूवसाहती व साहित्याचे वाटप

अमरावती : जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मधकेंद्रचालकांना मधुमक्षिकापालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून, ग्रामीण भागात पूरक रोजगाराची चांगली संधी निर्माण झाली आहे. याचअंतर्गत दर्यापूर तालुक्यातील योगिता इंगळे या युवतीने ‘गॉर्जेस रॉ हनी’  या नावाने मधाचा ब्रँड विकसित केला असून, त्यातून त्यांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध झाला आहे. प्रगतीशील मधकेंद्रचालक म्हणून या युवतीची निवड करण्यात आली आहे.

दर्यापूर तालुक्यातील योगिता प्रभाकर इंगळे ह्यांनी ‘हनी मिशन’ योजनेतून तीन वर्षापूर्वी मधमाशापालनास सुरुवात केली होती. त्या स्थलांतरित मधमाशापालनाचा व्यवसाय करत आहेत. एकूण 130 मधुवसाहतींचे संगोपन त्या करत आहेत.

मधुमक्षिकापालन हा व्यवसाय स्थलांतरित असल्याने पीक फुलो-याच्या ठिकाणी मधमाशा वसाहती स्थलांतर करुन विविध प्रकारच्या फुलांवरील मकरंद-पराग मिळवला जातो. मधुबनातील मधमाशा वसाहतीतून मिळविलेला मध मोहरी, ओवा, सुर्यफुल ,जांभूळ, निलगिरी, अकेशिया, तुलसी या मधाची बाटल्यांत पॅकेजिंग करुन स्थानिक बाजारात विक्री केली जाते.

योगिता इंगळे यांनी ‘गॉर्जेस रॉ हनी’ या नावाने मधाचा ब्रँड तयार केला आहे. त्यांची व्यवसायाप्रती निष्ठा व प्रयत्न पाहून राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ माध्यमातून विदर्भातील तसेच अमरावती जिल्ह्यातील पहिली युवती मधकेंद्र चालक म्हणून त्यांची निवड झाली आहे.

कु. इंगळे यांनी महाबळेश्वर येथील मध संचालनालयात मधकेंद्रचालकाचे वीस दिवसीय मधुमक्षिकापालन व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून शासकीय योजनेनुसार 50 टक्के अनुदान तत्वावर एकुण 50 एपिस मेलिफेरा जातीच्या पाळीव मधुवसाहती मधुकोठीसह मधयंत्र व व्यवसायातील इतर साहित्याचे वाटप जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांच्या हस्ते घातखेडच्या कृषी विज्ञान केंद्र येथील प्रक्षेत्रावर करण्यात आले.

राज्यात नवीन मधपालक व बेरोजगार युवकांसाठी ही बाब मार्गदर्शक ठरली आहे.  विदर्भातील समृद्ध जंगले व शेती पिकांच्या फुलावरील मकरंद-पराग गोळा होतो. देशातील विविध राज्यांमध्ये मधमाशीपालन वसाहतीचे स्थलांतर करुन मध, मेण-परागकण व इतर मधमाशा पालनातील उत्पादने मिळविली जातात. शेती पिकांच्या परागीभवनासाठी मधुवसाहती भाडेतत्त्वावर तसेच विक्रीसाठी परपरागीभवन सेवा शेतक-यांना फळबागायतदार यांना पुरवली जातात.

कु. इंगळे यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजिलेल्या मधमाशा पालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.

Exit mobile version