पीएम स्वनिधी अंतर्गत 10,000 रुपयांचे तारणाशिवाय कार्यरत भांडवली कर्ज
आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेज जाहीर केल्यानंतर, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने 01 जून 2020 रोजी पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजनेची (पीएम स्वनिधी) सुरुवात केली. या योजनेअंतर्गत एका वर्षाच्या कालावधीसाठी 10,000 रुपयांचे विनातारण कर्ज, देशातील 50 लाख रस्त्यावरील विक्रेत्यांना उपलब्ध करुन देण्यात आले. नियमित कर्जाचा भरणा केल्यास 7% वार्षिक व्याज अनुदान दिले जाते तसेच निर्धारीत डिजीटल व्यवहार केल्यास 1,200 रुपये वार्षिक परतावा (कॅशबॅक) दिला जातो. याव्यतिरिक्त, वेळेवर किंवा लवकर परतफेड केल्यास विक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील भांडवली कर्जासाठी पात्र ठरतात. योजनेच्या अंमलबजावणीसाठी भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या (सिडबी) सहाय्याने माहिती तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आले आहे.
02 जुलै 2020 पासून योजनेअंतर्गत कर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.