पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविणार

महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता शासनाने विशेष भूमिका घेतली आहे. त्यांना विशेष आरोग्य यंत्रणा मिळावी यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पोलिसांकरिता 39 रोगांवर उपचार केले जात आहे. या योजनेत जवळपास 10 हजार पोलीस व कुटुंबांवर उपचार केले असून या उपचाराच्या खर्चापोटी या वर्षात 60 कोटी रूपयांची प्रतिपूर्ती दिली आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

सध्या पोलीसांकरिता 39 प्रकारच्या रोगांवर उपचार केले जात आहे. भविष्यात आणखी काही रोगांवर उपचार करण्याचा अंतर्भाव करण्यासंदर्भात बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतले जाईल. केंद्र सरकारच्या योजना आणि महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्याबरोबर यात असलेल्या काही त्रुटीही दूर करण्यात येतील, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

राज्यातील पोलीस आणि कुटुंबियांच्या आरोग्य सेवेबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य सर्वश्री सुनील शिंदे, शशिकांत शिंदे, डॉ.रणजीत पाटील यांनी उपस्थित केला होता.