हिरव्या सोन्यातून पैसे कामविण्याची शेतकऱ्यांसाठी अशी आहे योजना

बांबू हे एक बहुपयोगी वनोपज असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास “हिरवे सोने” (green gold) असे संबोधले जाते. मानवाच्या लाकूड विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध होणारे व परवडणारे वनोपज असल्याने बांबूला ” गरीबांचे लाकूड ” (timber of poor) असेही म्हटले जाते. बांबू ही जलद वाढणारी, सदाहरीत व दिर्घायु प्रजाती आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱयांना आर्थिक सुरक्षा (economic security) मिळण्याची क्षमता आहे.

असा आहे वाव :
देशात बांबूची बाजारपेठ सुमारे रु.२६,००० कोटीची असून त्यामध्ये बांबू फर्निचर, बांबू पल्प, बांबू मॅट बोर्ड, कार्टेज इंडस्ट्रीज, प्लाय बोर्ड इत्यादी समाविष्ठ आहे. बांबूमध्ये जास्त गतीने कार्बन शोषण करुन ग्लोबल वार्मिंगलाही मात देण्याची अमर्यादित क्षमता आहे. या सर्व बाबींचा विचार करुन बांबूचा समुचित विकास करणे तसेच बांबूच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग गरीब जनतेच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता करणे व त्यायोगे संपूर्ण देशाचा विकास साधण्याकरिता केंद्र शासनाने राष्ट्रीय बांबू मिशन (National bamboo mission ) ची स्थापना केलेली आहे.

हा आहे योजनेचा उद्देश :
बांबू लागवडीमुळे शेतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे. त्याकरीता शेतक-यांना उत्तम बांबू रोपांचा पुरवठा होणे आवश्‍यक आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्राबाहेरील राज्यांमधून बांबूची टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध होतात.
उत्तम गुणधर्म असलेल्या टिश्यू कल्चर बांबू रोपांची निर्मिती राज्यामध्येच करून ती शेतक-यांना होत जमिनीवर तसेच शेताच्या बांधावर लागवडीकरिता सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेत शेतजमिनीतील मातीचा पोत, सिंचनाची सोय, जवळची बाजारपेठ, स्थानिक पातळीवरील बांबूची असलेली मागणी इत्यादी बाबी विचारात घेऊन बांबू प्रजातींच्या लागवडीबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.

उद्दीष्ट :-
१. शेतक-यांना टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे.
२. शेतीतून मिळणा-या उत्पन्नाला जोड देण्यासाठी होत जमिनीवरील बांबू लागवडी खालील क्षेत्र वाढविणे.
३. बांबू लागवडीमुळे शेतक-यांस उपजिवीकेचे साधन निर्माण करणे व होतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे.

बाजारपेठ :
बांबूपासून उत्पन्न होणाऱया उत्पादनासाठी शेतकऱयांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे दृष्टीने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.

अशी होईल लाभार्थ्यांची निवड :-
लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहे:-
शेतकऱयांनी सवलतीच्या दराने बांबू रोपे मिळण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने विहीत केलेल्या नमुन्यात खालील दस्तावेजासह अर्ज सादर करणे आवश्‍यक राहील.
(१) शेतीचा गाव नमूना ७/१२, गाव नमूना आठ, गाव नकाशाची प्रत.
(२) ग्राम पंचायत / नगरपरिषद / नगरपंचायत यांचेकडून रहिवासी असल्याबाबतचा दाखला.
(३) बांबू लागवड करावयाच्या शेतामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळण्यासाठी ठिबक सिंचन व बांबू
रोपे लहान असतांना डूकरापासून रोपे सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षक कुंपणाची सोय असल्याबाबतचे हमीपत्र.
(४) आधार कार्डची प्रत.
(५) बँक खात्याचा तपशील व पासबुकची प्रत/कोर्‍या धनादेशाची छायांकित प्रत.
(६) अर्जदार शोतकऱ्याने त्याचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्‍यक राहील आणि त्याकरीता त्याने बँकेला दिलेल्या पत्राची व बँकेकडून मिळालेल्या पोहोच पावतीची प्रत.
(७) शेतामध्ये विहीर/शेततळे/बोअरवेल असल्याबाबतचे विहीत प्रपत्रात हमीपत्र.
(८) बांबू रोपांची निगा राखणे व संरक्षण करण्यासंदर्भात विहीत प्रपत्रात हमीपत्र/बंधपत्र.
(९) जिओ टॅग / जीआयएसद्वारे फोटो पाठविण्याबाबत हमीपत्र.
(१०) ज्या होतजमिनीवर तसेच शोताच्या बांधावर बांबू लागवड करावयाची आहे ते क्षेत्र नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविणे.

संपर्क :
जवळचे वनविभाग कार्यालय, किंवा महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर