हवामान अंदाज व कृषि सल्ला; दि. २१ ते २६ मे २०२१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 24 व 25 मे रोजी औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद  जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पूढील ‍तिन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 3 ते 4 अं.सें. ने वाढ होईल. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 मे ते 01 जून, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची तर  किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असलेली जमीन निवडावी.खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामु 5.5 ते 8.4 पर्यंत असावा.बाजरी या पिकाच्या पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी.अडसाली ऊस लागवडीसाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची, खोल (60 ते 120 से. मी.) जमिन निवडावी. पूर्व हंगामी व हंगामी लागवड केलेल्या ऊस पिकास पाणी व्यवस्थापन करावे.हळद लागवडीसाठी मध्यम, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी.  सध्‍याच्‍या काळात हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. सध्‍याच्‍या काळात हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी लागवडीसाठी मध्यम ते खोल भारी उत्तम निचऱ्याची व 1 मी. खोलीची चांगली जमिन निवडावी.  अतिआम्ल तथा क्षारयूक्त, चुनखडीयुक्त जमिन निवडू नये. आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.डाळींब लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी (3 – 5 %) उताराची जमिन निवडावी. हलकी परंतु सामु 7.5 पेक्षा कमी असणारी जमिन योग्य असते. आंबे बहार धरलेल्या डाळींब फळबागेत पाणी व्यवस्थापन करावे.चिकूच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची खोल, मध्यम काळी जमिन निवडावी, चुनखडीयुक्त जमिनीची निवड करू नये. जून्या चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे.

 भाजीपाला पिके

खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज इत्यादींची काढणी करून घ्यावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

खुल्या शेतातील गुलाब लागवडीसाठी मध्यम ते हलकी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी.

तुती रेशीम उद्योग

उन्हाळयात शक्यतो पट्टा पध्दत तुती लागवडीत शेंद्रिय पदार्थांचे किंवा पॉलिथीन (ब्लॅक) अच्छादन करावे. शेंद्रिय अच्छादनात गवत, काडीकचरा पिकांचे अवशेष झाडांची पाने, उसाचे पाचट इत्यादी किंवा साखर कारखान्यातील मळी (मोलेसीस) चा वापर करावा. आवकाळी पावसाने किंवा उन्हामुळे पाने वाळून त्याचा खत होतो. पट्टा पध्दत तुती लागवडीत एकास आड एक पट्टयात 2 X 2.5X 1.5 फुट आकाराचा चर खदून त्यात वरील शेंद्रिय पदार्थ भरावेत असे केल्याने जमिनीचा पोत सुधारणा होते व कार्बन : नायट्रोजन चे प्रमाणात सुधारणा होते. 200 गेज काळे पॉलिथीन अच्छादनास एकरी आठ हजार रूपये लागतात परंतू 1 ते 1.5 एकर तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी असे अच्छादन करणे म्हणजे 2 ते 3 वर्ष निंदनीच्या खर्चात बचत होऊ शकते.

चारा पिके

खरीप हंगामात ज्वारी या चारा पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, बाजरीसाठी हलकी ते मध्यम, मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.

 सामुदायिक विज्ञान

दोन टक्के आवळयाच्या पानाच्या अर्काचा वापर सुती कापडावर केल्यास ग्राम पोझीटिव्ह या सूक्ष्मजीवाची सुती कापडावरील वाढ प्रतिबंघित करता येते. आवळयाच्या पानाच्या अर्कासह 6 % सीट्रिक ॲसिड घेऊन सुती कापडावर संस्करण केले असता ग्राम पोझीटिव्ह या सुक्ष्मजीवाच्या वाढीला होणारा प्रतिबंध कापडाच्या  पाचा धुण्यानंतर कमी झाल्याचा आढळून आला. आवळयाच्या पानाच्या अर्काचे संस्करण काही वैशिष्टयपूर्ण कपडयांना उदा. अवगुंठन, पायमोजे, लंगोट, जखमेवर बांधावयाच्या सुती पटृटया यावर केले असता सूक्ष्मजीवांपासून होणारी हानी टाळता येऊ शकते.

(सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )