कृषी सल्ला : मौसमी पाऊस 75 ते 100 मिमी झाल्याशिवाय पेरणी करू नये

दिनांक 09 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 08 जून रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयात तर दिनांक 09 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व परभणी जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी मौसमी पाऊस 75 ते 100 मिमी झाल्याशिवाय पेरणी करू नये.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 13 जून ते 19 जून, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

बीटी कपाशीमध्ये कापूस + तूर (4-6:1 किंवा 6-8:2), कापूस + सोयाबीन (1:1), कापूस + मूग (1:1) रुंद ओळींमध्ये कापूस + मूग (1:2), कापूस + उडीद (1:1), कापूस + ज्वारी + तुर + ज्वारी (6:1:2:1) ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर ठरते.कापूस पिकाची लागवड मौसमी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी.तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेचे जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तुर + बाजरी (1:2 किंवा 2:4), तुर + ज्वारी (3:3 किंवा 2:4), तुर + कापूस (1:6 किंवा 1:8) आणि तुर + सोयाबीन/मुग/उडीद (1:2 किंवा 2:4) असे ओळीचे प्रमाण ठेवून फायदेशीर आंतरपीक पध्दतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो. तूर पिकाची पेरणी मौसमी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी.आंतरपीक म्हणून मुग/उडीद या पिकांना ‍विशेष महत्व प्राप्त आहे, ते या पिकांच्या कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात. मूग/उडीद पिकाची पेरणी मौसमी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी.भुईमूगापासून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शाश्वती नसल्यास भुईमूग + तीळ (6:2), भुईमूग + सुर्यफूल (6:2), भुईमूग + कापूस (2:1), भुईमूग + तुर (6:2) या प्रमाणात पेरणी करून दोन्ही पिकांचे अधिक उत्पादन मिळते. भुईमूग पिकाची पेरणी मौसमी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी.मका या पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी आंतरपीक महत्वाचे आहे. आंतरपिकासाठी कडधान्ये (उडीद, मुग, चवळी), तेलबिया (भुईमूग, सोयाबीन), भाजीपाला (मेथी, कोबी, कोथिंबीर,पालक) इत्यादी पिकांची लागवड करता येते. मका पिकाची पेरणी मौसमी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन केळी लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. बागेतील वाळलेली पाने काढून टाकावीत.नवीन आंबा लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी जेणेकरून बागेत वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही.द्राक्ष बागेत पानांची विरळणी करावी.नवीन सिताफळ लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी.

भाजीपाला

पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकले नसल्यास टाकून घ्यावे. बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे.

फुलशेती

पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामी फुलपिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्श्यावर बी टाकून रोपे तयार करावी.

 पशुधन व्‍यवस्‍थापन

पशुधनास तज्ञ पशुवैद्यकाकडून घटसर्प, फऱ्या रोग  प्रतिबंधक लसी द्याव्यात.

सामुदायिक विज्ञान

गर्भावस्थेत घ्यावयाची मानसिक काळजी:  स्वत:ला आनंदी ठेवावे व दु:खदायक बाबींकडे दुर्लक्ष करावे. गर्भवतीस तिच्या कुटुंबियांनी व मित्र-मैत्रिणींनी मानसिक व नैतिक आधार द्यावा. मानसिक तणावापासून दूर राहावे.

सौजन्‍य :  डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी